कोपरगाव : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या देशपातळीवरील जीपीएटी या एम. फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत ‘संजीवनी’चे २३ विद्यार्थी पात्र झाले. यात महेश जावळे याने आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर देशात ४९ वा क्रमांक पटकाविला आहे.
पवन कलन याने १२०, तर चेतन जानराव याने १४० वा क्रमांक मिळवून ‘संजीवनी’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
कोल्हे म्हणाले, ग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्यूड टेस्ट (जीपीएटी) या देशातील नामांकित फार्मसी महाविद्यालयांमध्ये एम. फार्मसी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येतात. त्यानुसार २७ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या देशपातळीवर या ऑनलाइन परीक्षेत एकूण ४७ हजार ९४२ बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ४५ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील फक्त ४ हजार ४४७ ( फक्त १०. २३ टक्के) विद्यार्थी पात्र ठरले. त्यात ‘संजीवनी’च्या २३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणादरम्यान प्रत्येकी १२ हजार ४०० प्रति महिनाप्रमाणे २४ महिन्यांसाठी स्टायपेंड मिळते. हे सर्व विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्र असणार आहेत.
यात संकेत बावके, सुरेश शिंदे, शुभम कावरे, शैलेश मतसागर, जय गागरे, प्रियंका घारे, संयुक्ता हांडे, वैभव लासुरे, शिवानी आढाव, सायली सोनवणे, ऋतुजा निकम, आदित्य मोरे, आकाश जानराव, कृष्णा धोर्डे, हर्षद ताकटे, कार्तिकी वानखेडकर, नेहा बडोगे, कृष्णा धात्रक, पूजा जाधव व निकिता वायखिंडे यांचा समावेश आहे.