अहमदनगर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने गुरुवारी दुपारी वेबिनारचे आयोजन केले होते. असा प्रयोग प्रथमच राबविण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त अमिना शेख यांनी गुरुवारी वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरुवातीला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज, प्राप्त प्रकरणांची माहिती शेख यांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शेख यांनी उत्तरे दिली. पूर्वी ही समिती नाशिकला होती. पाच वर्षांपूर्वी या समितीचे कामकाज नगर येथून सुरू झाले. सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सादर केलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याने प्रमाणपत्र मिळण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. प्रस्ताव परिपूर्ण नसेल तरच तो नाकारला जातो. केवळ त्रुटी काढायच्या म्हणून काढल्या जात नाहीत, असे शेख यांनी स्पष्ट केले.
---------
विद्यार्थ्यांची ३३ टक्के प्रकरणे निकाली
जात पडताळणी वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हाभरातून १८ हजार ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर १५ दिवसांत कागदपत्रे प्रत्यक्षही सादर करावी लागतात. त्यामध्ये ९ हजार ६०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कागदपत्रे सादर केली असून, त्यापैकी ६ हजार ७८ जणांना वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दाखल प्रकरणांपैकी वैधता प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांचे हे प्रमाण ३३ टक्के आहे. मात्र, प्रत्यक्ष कागदपत्रे सादर झालेल्या प्रकरणांपैकी ६२ टक्के विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
-------------
विद्यार्थ्यांच्या तक्रारी जास्त
वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, ई-मेलद्वारे प्रमाणपत्र मिळत नाही, पोस्टाने मिळाले नाही, फाइल गहाळ झाल्याची उत्तरे दिली जातात, कार्यालयातील फोन उचलला जात नाही, त्रुटी काढल्या जातात, अनेकवेळा विद्यार्थ्यांना चकरा माराव्या लागतात, माहिती दिली जात नाही, अशा तक्रारी केल्या. त्याला शेख यांनी उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.
-----------
दाखल प्रकरणांची संख्या आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या पाहता ताण वाढला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांची प्रकरणे ऑनलाइन दाखल करावीत. काही तक्रारी असतील तर थेट ई-मेलवर पाठवाव्यात. त्रुटींबाबत ई-मेलवरच कळवले जाते. प्रमाणपत्रासाठी कोणीही मध्यस्थामार्फत अर्ज दाखल करू नयेत. पुरावे, कागदपत्रे व्यवस्थित व अनुक्रमांकानुसार अपलोड केली तर कोणालाही कार्यालयातही येण्याची गरज भासणार नाही.
-अमिना शेख, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नगर
----------
फोटो० २५ जात पडताळणी
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वेबिनारमध्ये उपायुक्त अमिना शेख.