संतापजनक! अपहरण करत नगरमधील १६ वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, ७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:19 IST2025-04-19T13:40:00+5:302025-04-19T15:19:33+5:30
काही आरोपी नशेत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

संतापजनक! अपहरण करत नगरमधील १६ वर्षीय मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, ७ जणांना अटक
अहिल्यानगर : अकरावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करत त्याला मारहाण करण्यात आली व निर्जनस्थळी नेत तीन ते चार जणांनी त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री अहिल्यानगर शहराजवळील केडगाव उपनगरात नेप्ती बाजार समितीशेजारी ही घटना घडली.
याप्रकरणी बाराजणांविरोधात गुरुवारी रात्री कोतवाली पोलिस स्टेशनला बाललैंगिक अत्याचारासह (पोस्को) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून पाचजणांना शोध सुरू आहे. मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार ऊर्फ भय्या राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय एक अल्पवयीन आरोपीही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मिरवणूक निघाली हाती. मिरवणूक संपल्यानंतर फिर्यादी मित्राच्या घरी झोपण्यासाठी गेला होता. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तिथे चारचाकीतून एक टोळके आले. त्यांनी घरात घुसून फिर्यादीला व त्याच्या मित्राला बाहेर काढले. रस्त्यावर मारहाण करत त्यांना बळजबरीने चारचाकीत बसविले. त्यांना नेप्ती बाजार समिती शेजारच्या मोकळ्या जागेत नेण्यात आले. काही वेळानंतर तेथे मोटारसायकलवरून आणखी काहीजण आले. त्यातील एकाने फिर्यादी व त्याच्या मित्राला आम्हीच ओंकार राहिंज यांची टपरी फोडली असून, मित्राच्या घरी लपून बसलो होतो, असे बोलायला सांगून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर यातील मयूर आगे याने फिर्यादीला कपडे काढायला सांगितले. त्यास विरोध केल्याने ओमकार राहिंज याने फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने घाबरून कापडे काढले. तीन ते चारजणांनी फिर्यादीवर अनैसर्गिक अत्याचार केला.
रावण साम्राज्य-शिवशंभो ग्रुपमध्ये होता वाद
आरोपींचा रावण साम्राज्य नावाचा ग्रुप आहे. मयूर आगे हा या ग्रुपचा अध्यक्ष आहे. त्यांच्याविरोधकांचा शिवशंभो ग्रुप आहे. रावण साम्राज्य ग्रुपच्या राहिंज याची काही दिवसांपूर्वी टपरी फोडण्यात आली होती. तेव्हापासून दोन टोळ्यांमधील वाद आणखी तीव्र झाले होते. फिर्यादी हा त्या ग्रुपच्या मुलांसोबत राहतो, याचा आरोपींना राग होता. या रागातूनच त्यांनी फिर्यादीला उचलून नेऊन अत्याचार केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
आरोपींनी केली होती नशा
मित्राची टपरी फोडल्याच्या रागातून १२ जणांच्या टोळीने फिर्यादी व त्याच्या मित्राचे अपहरण केले. मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी फिर्यादीला निर्जनस्थळी नेले. काही आरोपी नशेत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मित्राच्या घरून फिर्यादीला उचलले तेव्हा मित्राच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली.
'तो' मृत झाल्याचे समजून सोडून निघून गेले
आरोपींनी अत्याचार करताना मोबाईलमध्ये व्हिडीओ काढले. त्यानंतर फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादीने तो चुकविला. त्यामुळे आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या पंचाने फिर्यादीचा गळा दाबला. त्यात तो मयत झाल्याचा आरोपींचा समज झाला. सर्व आरोपी तेथून निघून गेले. फिर्यादी बुधवारी सकाळी सहा वाजता शुद्धीवर आला. तो सकाळीच घरी आला. भीतीमुळे त्याने घरी सांगितले नाही. तुझा डोळा का सुजला? असे आईने विचारले असता त्याने प्रकार आईला सांगितला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे फिर्याद दोन दिवसांनंतर दाखल झाली.
मित्राची स्कॉर्पिओ
आरोपीतील एकाच्या नातेवाइकाचा दशक्रिया विधी होता. त्यासाठी स्कॉर्पिओ आलेली होती. खोटी माहिती घेऊन आरोपींनी स्कॉर्पिओ घेतली. ती घेऊन काहीजण फिर्यादीच्या घरी गेले. फिर्यादीला उचलले व निर्जनस्थळी नेले. काही आरोपी दुचाकीवर होते.