खर्डा परिसरात १०० ब्रास वाळू जप्त; महसूल, पोलीस प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:37 IST2020-01-05T17:36:19+5:302020-01-05T17:37:15+5:30
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पाशेजारील काही गावात शनिवारी (दि.४ जानेवारी) रोजी १०० ब्रास अवैध वाळू साठा महसूल, पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून जप्त केला.

खर्डा परिसरात १०० ब्रास वाळू जप्त; महसूल, पोलीस प्रशासनाची कारवाई
जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पाशेजारील काही गावात शनिवारी (दि.४ जानेवारी) रोजी १०० ब्रास अवैध वाळू साठा महसूल, पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करून जप्त केला. या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खैरी प्रकल्पातून लोणी, बाळगव्हाण, वाकी, सातेफळ या परिसरात खैरी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत आहे. याची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार शनिवारी दुपारी दोन वाजता सुरू केली. ही कारवाई रात्री बारा वाजेपर्यंत चालू होती. या कारवाईत तहसीलदार विशाल नाईकवाडे, निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे, विठ्ठल माने, तलाठी सुखदेव कारंडे, विजय हजारे, विकास मोराळे, हरिभाऊ कुलकर्णी, भाऊसाहेब चौधरी, विजय कटारनवरे, विजय भोरे, बाळासाहेब भोगे, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, महिला पोलीस व्यवहारे आदी या पथकात सहभागी झाले होते. दरम्यान, मागील आठवड्यात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी अशीच कारवाई करून दोन ढंपर व आठ ट्रॅक्ट्रर वाळूसह जप्त केले होते.
शासकीय दराने लिलाव करणार
वाकी येथील गट नंबर २० मध्ये कांतीलाल किसन जगताप, गणेश सतीश जगताप यांच्या शेतात असलेली ६० ब्रास वाळू साठा, बाळगव्हाण येथे २५ ब्रास वाळूसाठा, खर्डा येथे १५ ब्रास साठा असा सुमारे १०० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला वाळूसाठा तहसील कार्यालयाच्या आवारात आणला आहे. तो शासकीय दराने लिलाव करण्यात येणार असल्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.