श्राद्धकर्मात तीन पिढ्यांचाच उल्लेख का करतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 09:56 IST2018-10-04T09:56:05+5:302018-10-04T09:56:58+5:30
भूलोकांपासून स्वर्गात पोहोचण्यास लागणारा काल तीन पिढ्या म्हणजेच साधारणत: साठ ते शंभर वर्षांचा काल गृहीत धरलेला आहे. त्यानंतर मृताला स्वर्ग किंवा कर्मानुरूप गती प्राप्त होते.

श्राद्धकर्मात तीन पिढ्यांचाच उल्लेख का करतात?
भूलोकांपासून स्वर्गात पोहोचण्यास लागणारा काल तीन पिढ्या म्हणजेच साधारणत: साठ ते शंभर वर्षांचा काल गृहीत धरलेला आहे. त्यानंतर मृताला स्वर्ग किंवा कर्मानुरूप गती प्राप्त होते. तेव्हा त्यांना येथील कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा राहत नाही. आपला येथील अनुभवही असाच आहे. तीन पिढ्यांपेक्षा मागील पिढ्यांची आपल्याला फारशी माहिती नसते. आणि त्या दृष्टीने आपला ओढाही नसतो. या कारणांमुळे श्राद्धकर्मात तीनच पिढ्यांचा उल्लेख केला जातो.
वसू, रुद्र आणि आदित्य
पितरांचा उल्लेख करताना त्यांना आपण वसुरूप म्हणतो, आजोबांना रुद्ररूप म्हणतो तर पणजोबांना आदित्यरूप म्हणतो. मृत झाल्यावर मृतात्म्याला प्राप्त होणा-या त्या तीन अवस्था आहेत. पृथ्वीच्या आसपास असणारा म्हणजेच जो नुकताच मृत झालेला असतो त्याला वसुरूप म्हणतात. जरा दूर गेल्यावर म्हणजे भुवर्लोकांच्या आसपास गेला म्हणजे त्याला रूद्ररूप म्हणतात आणि त्याच्या वर गेला म्हणजे त्याला आदित्यस्वरूप म्हणतात. अशा त-हेने तीन स्वरूपांतून मृतांचा स्वर्गापर्यंतचा प्रवास असल्यामुळे त्यांना वसू, रूद्र व आदित्यस्वरूप असे म्हणतात. या सर्व गोष्टी अतिंद्रिय असल्यामुळे कोणीतरी कोणीतरी प्राचीन अशा ज्ञात्यांनी संशोधन करून लोकांना पटवल्या
आणि रूढ केल्या. त्या प्रचारात आहेत म्हणून आपण बोलू शकतो. अभ्यास करून अशा ज्ञानाचा पडताळा पाहून त्या ताज्यातवान्या ठेवणे कर्तव्यकर्म आहे. श्रद्धापूर्वक कर्म करणे व ज्ञात्यांनी शोधलेली तत्त्वे पुढील संशोधनाकरिता शुद्ध स्वरूपात ठेवणे एवढे केले तरी आपले कर्तव्य केले, असे होणार आहे. ही स्वरूपे पितरांना क्रमाने प्राप्त होतात व त्या स्वरूपात आपण त्यांना कृतज्ञता बुद्धीने साह्य करीत असतो. हे करीत असताना त्यांची अनेदकाबद्दलची वासना हळू हळू शांत करण्याचा प्रयत्नही आपण करीत असतो.
पुरुद्राद्रव व धूरिलोचन
पुरूरव व आर्द्रव हे देव प्रति सांवत्सरिक श्राद्धामध्ये येतात. धूरिलोचन संज्ञक देव महालयात स्वीकारण्यात येतात. या देवता पितरांच्या त्या-त्या स्थानांच्या मुख्य आहेत, असे म्हणतात. इष्टि श्राद्धात ऋतु व दक्ष, वृद्धी श्राद्धात सत्य व वसू, नैमित्तिक श्राद्धात काम आणि काल, काम्य व महालय श्राद्धात धूरिलोचन, पार्वण श्राद्धात पुरूरव व आर्द्रव आणि नवान्नलंभन श्राद्धात काम व काल, असे देव ठरलेले आहेत.
एका वर्षात ९६ वेळा श्राद्ध
पितरांचे श्राद्ध करण्यासाठी एक वर्षात ९६ प्रसंग सांगितलेले आहेत. हे आहेत १२ महिन्यांच्या १२ अमावास्या, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुगाच्या प्रारंभ तिथी, मन्वांच्या १४ आरंभ तिथी, १२ संक्रांत, १२ वैधृती योग, १२ व्यतिपात योग, महालय श्राद्धातील १३ तिथी, पाच अष्टका, पाच अन्वष्टका, पाच पूर्वेद्युह असे एकूण ९६ श्राद्ध होतात.
श्राद्धविधीत करावयाचे महत्त्वाचे विधी
स्मृतीकालीन व सध्या प्रचलित असलेल्या श्राद्धविधीत खालील गोष्टी आढळतात-
१) आचमन, प्राणायाम
२) आत्मशुद्धी व द्रव्यशुद्धी
३) देवब्राह्मणांचे आमंत्रण, विस्तृत पूजन
४) पितृब्राह्मणांचे आमंत्रण, विस्तृत पूजन, अग्नौकरण
५) अन्ननिवेदन
६) अन्न सूक्तादिकांचे पठण
७) ब्राह्मण भोजन
८) रक्षोघ्नसूक्त पठण
९) सुवासिनी भोजन
१०) पिंडदान
११) पिंडपूजन
१२) विकीर
१३) पितरांची प्रार्थना
१४) पिंडोद्धारण
- संकलन : सुमंत अयाचित