काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 11:44 IST2018-10-03T10:36:25+5:302018-10-03T11:44:08+5:30
परमार्थ करण्याकरिता बरेच लोक येत असतात. परंतु ध्येयापर्यंत क्वचितच एखादा पोहचतो.

काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥
-भागवताचार्य अशोकानंद महाराज कडीर्ले
परमार्थ करण्याकरिता बरेच लोक येत असतात. परंतु ध्येयापर्यंत क्वचितच एखादा पोहचतो. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले आहे की, मनुष्याणाम् सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानाम कश्चिनमां वेत्ति तत्वत:।।७-३।। हजारो मनुष्यामध्ये एखाद्याच्याच अंगी आत्मसिद्धीसाठी प्रयत्न करण्याचे धैर्य असते आणि अशा असंख्य धैर्यवानांपैकी एखादाच मला खऱ्या अर्थाने जाणतो. या श्लोकावर भाष्य करतांना माऊली म्हणतात, तैसे आस्थेचीया महापुरी । रिघताती कोटीवरी । परी प्राप्तीचीया पैलतीरी । विपयीला निघे ।।७-३-१३।। पाच हजार वर्षांपूर्वी भगवंताकडे हजारो जात. त्यातून एखादाच त्याला जाणत असे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज ७२५-३० वर्षांपूर्वी म्हणाले की, भक्तीच्या प्रांतांत कोट्यवधी लोक येतात पण ! भगवंताला एखादाच प्राप्त करू शकतो. विचार करा, किती तफावत पडली आहे? प्रयत्न करणारे कोट्यवधी असून ध्येय प्राप्त एखाद्याला होते असे का घडते? त्याचे कारण असे आहे की, कोणतेही कार्य घडायचे असेल तर त्याला एकंदर ९ साधारण कारणे असतात. त्यापैकी प्रतिबंधकाचा अभाव हे एक कारण आहे. कोणतेही कार्य घडायचे असल्यास त्याला कोणताही प्रतिबंध नसला पाहिजे.
अध्यात्मात नेमके असेच घडते. काम, क्रोध हे विकार परमार्थात आडवे येत असतात. अनेक ऋषी मुनींच्या कथा आपण पाहतो. ते जेव्हा तपश्चर्या करतात तेव्हा त्यांना या काम क्रोधादिकांच्या आहारी गेलेले दिसतात. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पाही वरी न ये मन ।।१।। या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान । अनुभवावाचून बडबड ते ।।२।। इंद्रिय जय, संयम महत्वाचा आहे, वासनेच्या अधीन राहून परमार्थ घडत नाही उलट आध:पतन होते. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥१॥ नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥ विश्वामित्राची हजारो वर्षांची तपश्चर्या मेनकेच्या संगतीने नष्ट झाली. रावणासारखा बुद्धिमान, श्रीमंत राजा, पण फक्त आसक्तीने तो वाया गेला. शास्त्रीय परिभाषेत शम आणि दम असे म्हणतात. ते म्हणजेच मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह. आत्म-मनाचा संयोग, मन-इंद्रियांचा संयोग, इंद्रिय विषयाचा संयोग झाला म्हणजे विषयाचा भोग घडत असतो आणि भोगातूनच पुढे तात्कालिक आनंद मिळतो. तो शाश्वत नसतो किंबहुना तो आनंद नश्वरच असतो. मृगजळ हे काही खरे पाणी नसते. परंतु हरणाला मात्र ते खरे पाणी वाटते आणि ते तहान लागल्यामुळे त्या मृगजळाच्या दिशेने धावते. शेवटी पाणी न मिळता धाप लागून त्याचा मृत्यू घडतो. अगदी असेच मनुष्याचे सुद्धा होते प्रपंचामध्ये! शब्द, स्पर्श,रूप,रस,गंध या पंच विषयायामागे धावतो आणि शेवटी नाश करून घेतो.
अर्जुनाने भगवंताला विचारले की, जे ज्ञानी म्हणवितात ते सुद्धा कधी कधी विषयामध्ये फसलेले दिसतात, असे का होते ? भगवतांने तेव्हा उत्तर देतांना काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भव: । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥गीता ३-३७ ॥ हेच सांगितले. जे स्वत:ला ज्ञानी म्हणवितात परंतु त्यांचे काम क्रोध गेलेले नसतात त्यांना जे ज्ञान असते ते दृढ अपरोक्ष नसते. तर फक्त परोक्ष ज्ञान असते आणि असेच लोक जगात जास्त दिसतात व हेच लोक समाजाची फसवणूक करीत असतात. एकदा भगवान व्यास महर्षी त्यांच्या आश्रमात त्यांचे शिष्य जैमिनी यांच्यासह चर्चा करीत बसले होते. तेव्हा व्यासांनी एक श्लोक सांगितला. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसपि कर्षति ।। तेव्हा जैमिनी म्हणाले की, ज्ञान्याला इंद्रिये कसे काय आकर्षित करू शकतील? श्लोक बरोबर वाटत नाही. व्यास म्हणाले, असू दे मी थोडा बाहेर जाऊन येतो. आल्यानंतर तुला सांगतो. व्यास बाहेर निघून गेले बराच वेळ झाला ते आलेच नाहीत. तेवढ्यात काय झाले. जोरात पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे पाणीच पाणी झाले. तेवढ्यात त्यांच्या कुटीजवळ एक जंगलातील स्त्री येऊन उभी राहिली. ती पूर्ण पावसाने भिजली होती. थंडीने कुडकुडत उभी होती. जैमिनींना तिची दया आली. त्यांनी तिला आत कुटीमध्ये येणास सांगितले. कारण आतमध्ये यज्ञकुंड होते. तेथे शेकत बसता येईल व उष्णता मिळेल. ती मुलगी नको म्हणत असताही त्यांनी आग्रहाने तिला आत घेतले. जेव्हा त्यांची दृष्टी तिच्या शरीराकडे गेली तेव्हा त्यांच्या अंत:करण्यात कामवासनेने केव्हा प्रवेश केला हे त्यांनाही समजले नाही. त्यांनी तिला विवाहाचा प्रस्ताव सांगितला. (कारण संस्कारी होते म्हणून) तिने नाही हो करत जैमिनीना सांगितले की, विवाहाच्या पूर्वी आमच्या समाजामध्ये नवऱ्याने नवरीला पाठीवर घेऊन अग्नीला पाच फेरे मारावे लागतात. कामातुराणां भयं ना लज्जा ।। या न्यायाने त्यांनी तिला पाठीशी घेतली आणि यज्ञ कुंडाला फेऱ्या मारू लागले. दोन फेऱ्या झाल्या आणि मानेला काही तर टोचते म्हणून तिला त्यांनी खाली ठेवले व पाहतात तो काय तिच्या जागी तरुणी नसून प्रत्यक्ष व्यास महर्षी होते. त्यांनीच त्या मुलीचे रूप घेतले होते. तेव्हा व्यास म्हणाले, आता सांग विद्वांस आपि कर्षति कि नापि कर्षति ? जैमिनी खजील झाले आणि म्हणाले की,महाराज तुमचेच बरोबर आहे. ज्ञानी जरी झाला तरी त्याने इंद्रियावर भरोसा ठेवू नये. जोपर्यंत मोनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह होत नाही तोपर्यंत खरा ज्ञानी होत नाही. ही कसोटी लावून बघतिलेली तर फार क्वचितच खरा साधू भेटेल म्हणूनच भागवतकार म्हणतात, दुर्लभो मानूषो देहो देहींनां क्षणभंगुर:। तत्रापि दुर्लभो मन्ये वैकुंठ प्रियदर्शन:।। मनुष्य देह दुर्लभ आहे व हा देह क्षणभंगुर आहे. शिवाय त्यातही वैकुंठ प्रिय म्हणजे भगवंताचे आवडते भक्त. संत अत्यंत दुर्लभ आहेत. खरे संत हे वासनेच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या अंत:करण्यात भगवंताशिवाय काहीही नसते. असेच संत महात्मे हे जगाचा उद्धार करू शकतात. हे संत प्रसिद्धीपराङ्मुख असतात हे महत्त्वाचे.
गुरुकुल भागवताश्रम, चिचोंडी(पा) ता. नगर.
मोबा. ९४२२२२०६०३