दुराचारी माणसे मानवी जीवनाला घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 09:33 AM2019-11-11T09:33:53+5:302019-11-11T09:38:27+5:30

सदाचारी माणूस कोणतेही पाऊल टाकताना जपून टाकतो

Spiritual Intelligence and High Risk Behaviors | दुराचारी माणसे मानवी जीवनाला घातक

दुराचारी माणसे मानवी जीवनाला घातक

Next

एकूण मानवी जीवनाचा विचार करता त्याचे आचारण फार महत्त्वाचे असते. काही माणसे सदाचारी, तर काही दुराचारी असतात. सदाचारी माणसे नीतिच्या मार्गाने जगतात अन् त्यातच त्यांना आनंद मिळतो. दुराचारी माणसे नास्तिकतेने वागतात. सदाचारी माणूस कोणतेही पाऊल टाकताना जपून टाकतो. त्याच्याकडे असलेल्या मन-बुद्धीचा वापर सद्गतीने करतो. भ्रामक कल्पनांना थारा देत नाही. जीवनाची पवित्रम अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तर दुराचारी हा आपल्या मन-बुद्धीचा वापर निरर्थक गोष्टींसाठी करतो. पथभ्रष्ट मार्गावर चालतो. पातकांच्या राशी तयार करतो. भ्रामक कल्पनांनी बरबटलेला असतो. संशयीवृत्ती त्याची पाठ सोडत नाही. दुर्वर्तनाने तो उन्मत झालेला असतो. स्वैराचाराचे आकांड-तांडव करतो. स्वत:ही मरतो व दुसऱ्यालाही घेऊन मरतो.

दुराचारी माणसे मानवी जीवनात घातक असतात. सदाचारी माणसे मिळेल त्यात समाधानी असतात. मृतिका-पाषाण, वृक्षवल्ली कृतिकीटक, पशुपक्षी इत्यादींना विशिष्ट प्रकारची उपमा देऊन त्यांचा आदर करतात. सदाचारी माणूस ईश्वरनिष्ठ असतो. शरीराची कार्यक्षमता आहे तोपर्यंत तो सदाचारण करतो. स्वत:ला घालून दिलेली बंधने निष्ठेने पाळतो. निर्भयतेने जगतो. दैवी संपत्तीचा अंगीकार करतो. तो नेहमी कृतज्ञ वृत्तीने वागतो. त्याच्या मनात आदराची भावना असते. ईश्वराच्या ठिकाणी तो शुद्ध-सत्वात्मक रीतीने भाव ठेवतो. भक्तिमार्गाचा आधार घेतो. संत-महात्म्यांचा आदर करतो. परिस्थिती अनुकूल असो व प्रतिकूल त्यात तो समाधानाने जगतो.

सदाचारी माणूस अध्यात्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही मोहाला बळी पडत नाही. गरज आणि चैन यामधले अंतर जाणतो. श्रद्धा आणि विश्वास त्याचे मूळपाठीराखे असतात. मानवी जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्याचा प्रयास करतो. सर्वांचे कल्याण कसे होईल याचे चिंतन करतो. सदाचारी माणूस बुद्धीला नीट-नेटके ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही ऐहिक, पारलौकिक स्वारस्याचा मोह त्याच्या ठिकाणी रूजवत नाही. अलौकिक सामर्थ्य त्यांच्या अंगी असते. सदाचारी माणूस जीवनाचे नीजधाम गाठतो. मनामध्ये मत्सर ठेवत नाही. बाह्यविषयांचे तो आकर्षण ठेवत नाही. सदाचारी माणसे रंजल्या-गांजल्यांच्या सेवेतच देवत्व जाणतात. आपण सदाचारी व दुराचारी दोन्ही व्यक्तींच्या स्वभावाचा आढावा घेतला. माणसांचे मन ज्या संस्कारात घडले ते संस्कार त्यावर होतात. संस्कारातून माणूस सदाचारी किंवा दुराचारी होतो. काहीअंशी त्याचे कर्म त्याला तसे बनवते. परंतु सदाचारी व्हा-आनंद द्विगुणीत करा.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

Web Title: Spiritual Intelligence and High Risk Behaviors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.