...म्हणून गयेला जाऊन पिंडदान करण्याचं वेगळं महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 08:04 IST2018-10-05T08:01:51+5:302018-10-05T08:04:04+5:30
बिहारमधील गया येथे श्राद्ध करणे, पितरांसाठी तर्पण व पिंडदान करणे महापुण्यदायक समजले जाते. तेथे हे विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असेही मानले जाते. या ठिकाणाला एवढे महत्त्व का आले, हे आता आपण पाहू या.

...म्हणून गयेला जाऊन पिंडदान करण्याचं वेगळं महत्त्व!
बिहारमधील गया येथे श्राद्ध करणे, पितरांसाठी तर्पण व पिंडदान करणे महापुण्यदायक समजले जाते. तेथे हे विधी केल्याने पितरांना मोक्ष मिळतो, असेही मानले जाते. या ठिकाणाला एवढे महत्त्व का आले, हे आता आपण पाहू या.
बिहारची राजधानी पाटणा येथून सुमारे १०४ किलोमीटरवर गया जिल्हा आहे. हे ठिकाण हिंदू व बौद्ध धर्मासाठीही अतिशय पवित्र मानले गेले आहे. हिंदू लोक गयेला मुक्तिक्षेत्र व मोक्षप्राप्ती स्थान मानतात. तर बौद्ध धर्माचे अनुयायी या ठिकाणाला ज्ञान क्षेत्र मानतात. पुराणातील कथेनुसार गयेमध्ये गयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने घोर तपश्चर्या केली होती. त्यानंतर त्याला वरदान मिळाले होते की, जो कोणी त्याला पाहील किंवा स्पर्श करील,त्याला यमलोकी जाण्याची गरज पडणार नाही. ती व्यक्ती सरळ विष्णूलोकी जाईल.
गयासुराला हे वरदान मिळाल्यामुळे लोकांना मोक्ष मिळू लागला खरा. परंतु यमलोक रिकामा राहू लागला. या कारणामुळे यमराजांनी ब्रह्मा, विष्णू व महेश यांना काही उपाय करण्यास सांगितला. यमराजाची स्थिती लक्षात घेऊन ब्रह्मदेव गयासूराला म्हणाले की, तू निरतिशय पवित्र आहेस. त्यामुळे देवता तुझ्या पाठीवर यज्ञ करू इच्छित आहेत. गयासूर यासाठी तयार झाला. त्याच्या पाठीवर सर्व देवता व गदा धारण करून विष्णू स्थिर झाले. गयासुराला स्थिरकरण्यासाठी त्याच्या पाठीवर एक मोठी शीला ठेवण्यात आली. आजही ती शीलाप्रेतशीला नावाने प्रसिद्ध आहे. गयासुराच्या या समर्पण भावामुळे भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिले की आतापासून जेथे तुझ्या शरीरावर यज्ञ झाला आहे, ते ठिकाण गया म्हणून प्रसिद्ध होईल. येथे पिंडदान व श्राद्ध करणाऱ्यांना पुण्य मिळेल व ज्यांच्यासाठी तर्पण, पिंडदान केले जाईल, त्यांना मोक्ष, मुक्ती मिळेल. येथे आल्यानंतर कोणत्याही आत्म्याला भटकण्याची वेळ येणार नाही. त्यानंतर या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून या ठिकाणी तर्पण, पिंडदान, श्राद्ध करणे अत्यंत पुण्यकारक समजले जाऊ लागले.
हिंदू धर्म व वैदिक परंपरेच्या मान्यतेनुसार, पुत्राचे पुत्रत्व तेव्हाच सार्थक होते जेव्हा तो आपल्या माता-पित्यांची जिवंतपणी सेवा करतो व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे प्रति सांवत्सरिक श्राद्ध व पितृपक्षातील श्राद्ध विधिवत करतो. गयेला पिंडदान करण्याने मृतात्म्यांना मोक्ष मिळतो, असेही आपल्याकडे मानले जाते.
पुराणातील माहितीनुसार, गयामध्ये विविध नावांच्या ३६० वेदी होत्या व त्या ठिकाणी पिंडदान केले जात असे. आता त्यातील केवळ ४८ उरल्या आहेत. आता अनेक धार्मिक संस्थांनी पुरातन वेदी शोधून काढण्याची मागणी केलेली आहे. सध्या याच ४८ वेदींवर लोक पितरांचे तर्पण व पिंडदान करतात. विष्णुपद मंदिर, फल्गू नदीचा किनारा व अक्षयवट या ठिकाणी पिंडदाने करणे पुण्यकारक समजले जाते. याशिवाय वैतरणी, प्रेतशीला, सीताकुंड, नागकुंड, पांडुशीला, रामशीला, मंगलागौरी, कागबली आदी ठिकाणीही पिंडदान केले जाते. देशात श्राद्ध करण्यासाठी जी ५५ महत्त्वाची ठिकाणे सांगितलेली आहेत, त्यात गयेचे स्थान सर्वांत वरचे आहे.
श्रद्धेशिवाय श्राद्ध अपूर्ण आहे...
श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध. त्यामुळे श्रद्धेशिवाय केलेले श्राद्ध अपूर्ण आहे. जगातील सर्वच धर्म, संप्रदाय, लोकसमूहांमध्ये पितर,पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा कोणता ना कोणता मार्ग आहे. श्रीलंका, बर्मा, अफ्रिका, कॅलिफोर्निया, तसेच उत्तरी ध्रुवीय प्रदेश तसेच युरोपीय देशांमध्येही पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केल्या जातात. भारतात तर श्राद्ध-पितृपक्षातील विधी वैज्ञानिक संदर्भासह असल्यामुळे त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.
-संकलन : सुमंत अयाचित