Pandurang Shastri Athavale Social Reformer and Founder of Swadhyaya Parivar | मनुष्य गौरव दिन! स्नेहभावाने फुललेलं पारिवारिक कार्य

मनुष्य गौरव दिन! स्नेहभावाने फुललेलं पारिवारिक कार्य

राजेंद्र खेर

जात, आदर्श आणि धर्माच्या नावाखाली आज माणसा-माणसांमध्ये हेतुपुरस्सर भेद पाडला जात असताना पू. पांडुरंगशास्त्री आठवले उपाख्य दादांचे एकविचारी परस्पर स्नेहभावाने फुललेलं पारिवारिक कार्य प्रकर्षाने उठून दिसते. ‘देह झाला चंदनाचा’ ही कादंबरी लिहीत असताना मला चरित्र-नायक साक्षात पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सान्निध्यात जायचे महत्भाग्य लाभले. सुमारे तीन वर्षे मी वेगवेगळ्या दिवशी दादांना भेटलो, त्यांचे जीवन जाणून घेतले. त्यासाठी तासन्तास त्यांच्यासमोर बसलो. पू. दादांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याचा संकल्प माझे वडील ज्येष्ठ साहित्यिक कै. भा. द. खेर यांनी १९७२ सालच्या दरम्यान सोडला होता. त्याला कारण झाले होते पू. अनंतराव आठवले तथा स्वामी वरदानंद भारती. अनंतराव आठवले तेव्हा माझ्या वडिलांना म्हणाले होते, पांडुरंगशास्त्री म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य! मानवतेचे कार्य करण्यासाठीच जणू ते अवतरले आहेत. गुजरात-सौराष्ट्र आदी ठिकाणी ते गावोगाव, झोपडी-झोपडीत, वाड्यावस्त्यांवर स्वत: जात आहेत. मानवामानवाला सिद्वचारांनी सिद्वचारांनी आणि प्रेमाने जोडत आहेत. त्यांच्या जीवनात दैवी आनंद निर्माण करीत आहेत.

४० सामाजिक कादंबऱ्या लिहिल्यानंतर माझ्या वडिलांनी तेव्हा वीर सावरकरांच्या जीवनावरील ‘यज्ञ’ कादंबरीच्या रूपाने चरित्रात्मक कादंबरी प्रकार मराठीत प्रथम आणला होता. पाठोपाठ त्यांची लाल बहादूर शास्त्रींच्या जीवनावरील ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. आता वरदानंदजींच्या मुखातून जेव्हा त्यांनी पू. दादाजींविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी ऐकले होते, तेव्हाच त्यांनी पू. दादाजींवर चरित्रात्मक कादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला होता... १९७२ च्या दरम्यान! पण तो योग तेव्हा आला नाही. १९७६ साली त्यांना हिरोशिमावर कादंबरी लिहिण्यासाठी जपान फाउंडेशनचे स्टेट-गेस्ट म्हणून निमंत्रण आले. जपानहून परतल्यानंतर पुढची आठ वर्षे हिरोशिमा लिहिण्यात व्यतीत झाली. ते कार्य करीत असताना माझ्या वडिलांची दृष्टी खालावत गेली. हिरोशिमाची उद्ध्वस्त मानवता लिहिता लिहिता मनावर आणि दृष्टीवरही विपरीत परिणाम झाला. ते मुंबईला जाऊ शकले नाहीत. पू. दादाजींच्या जीवनावरील कादंबरी-लेखनाचा संकल्प राहून गेला. दरम्यान १९७९ च्या सुमारास पू. दादा पुण्यात आले होते. शिवाजी मराठा हायस्कूलच्या मैदानावर रात्री ९ वा. प्रवचनाचा कार्यक्र म होता. वडील मला म्हणाले, दादाजी पुण्यात आले आहेत. त्यांना माझ्या या महाभारतावरील ‘कल्पवृक्ष’ कादंबरीचे खंड नेऊन दे. मी तेव्हा १७ वर्षांचा होतो. पू. दादाजी किती महान आहेत हे समजण्याइतकी पोच माझ्यात निश्चितच नव्हती. मी रात्री सायकलवरून गेलो. प्रवचन ऐकले आणि सरळ आत जाऊन दादाजींना ‘कल्पवृक्ष’ चे खंड दिले. पू. दादा मला म्हणाले, वडिलांना सांग, तुम्ही मला प्रसादच पाठवला! त्यावेळी मी प्रथमच पू. दादाजींना बघितले, दर्शन घेतले. भक्कम शरीरयष्टी आणि आत्यंतिक तेजस्वी पण प्रेमळ नेत्र मला अजूनही आठवतात.

पुढे १९९४-९५च्या सुमारास पुण्यात निगडीमध्ये कृतज्ञता समारोह झाला. त्यावेळी अनेक वर्तमानपत्रांतून स्वाध्यायविषयी आणि त्या कार्यक्रमाविषयी फोटोसह वार्ता छापून आल्या होत्या. विशेषत: त्यावेळी अचानक मोठा वादळी पाऊस झाला होता आणि स्वाध्यायच्या कार्यक्रमावर पाणी फिरले होते. तथापि एकही स्वाध्यायी जागेवरून उठला नव्हता. पू. दादाजीसुद्धा तिथेच वा-यावादळात उभे होते. दुस-या दिवशी वर्तमानपत्रांनी स्वाध्यायींच्या निष्ठेवर पानेच्या पाने फोटोसह छापली होती. ते पाहून माझे बाबा म्हणाले, दादाजी साक्षात सूर्य आहेत. त्यांचे कार्यही असेच लख्ख तळपणारे आहे. या महामानवावर कादंबरी लिहिण्याचा मी पूर्वीच संकल्प केला होता. आता तर त्यांचे कार्य जगभर प्रकाशित होत आहे. त्यांचे जीवन शब्दबद्ध केले पाहिजे. पुन्हा माझ्या बाबांना (तेव्हा त्यांचं वय ८०च्या घरात होते) स्फूर्ती आली. श्रीमती कल्याणीताई नामजोशी यांनी तेव्हा वडिलांना खूप मदत केली. मध्ये अनेक गाठी-भेटी आणि निर्णय झाले. सरते शेवटी पू. दादाजींवर मी कादंबरी लिहावी असे ठरले. १९७२ सालापासून ठरवलेले हे लेखनकार्य जणू माझ्या हातूनच होणार होते. तीच ईश्वरेच्छा होती! तोपर्यंत माझा लेखनाशी फारसा संबंध नव्हता. नेपोलियनच्या जीवनावर ‘दिग्विजय’ ही कादंबरी आणि ‘हॉलिवूडचे विनोदवीर’ अशी दोन पुस्तके माझ्या खात्यात जमा होती. मी तेव्हा एका दूरचित्रवाणीवर दिग्दर्शक म्हणून काम करीत होतो. त्यापूर्वी मी काही वर्षे मुंबईला सिनेमा क्षेत्रातही कार्यरत होतो. तिथे कारकीर्द करणे ही माझी महत्वाकांक्षा होती. पण माझे बाबा मला म्हणाले, ते काम सध्या सोडून दे. पू. दादाजींवर लेखन करायला मिळणे ही महत्भाग्याची गोष्ट आहे. सारी कामे सोडून दे आणि ही कादंबरी लिही. मला वडिलांची इच्छा पूर्ण करायची होती. मी माझ्या चित्रपट-टेलिव्हिजन सारख्या झगमगत्या कारकीर्दीला राम राम ठोकला आणि पू. दादाजींवरील कादंबरी-लेखनात सुमारे तीन वर्षे स्वत:ला झोकून दिले. माझे वडील धार्मिक वृत्तीचे आणि मानवतावादीही होते. म्हणूनच ते ‘हिरोशिमा’सारखी कादंबरी लिहू शकले होते. सुनील दत्त, ए. के. हंगल, कैफी आझमी, के. ए. अब्बास यांच्यासह ते महाराष्ट्र वर्ल्ड पीस कौन्सिलचे  काही काळ उपाध्यक्षही होते. लेनिन हे त्यांचे अतिशय आवडते व्यक्तिमत्व होते. लेनिनवर ते कादंबरी लिहिणार होते. १९६८ साली रशियात जाऊन त्यांनी त्यासंबंधात पुष्कळ माहिती मिळवली होती. पण कादंबरी लेखनाचं काम होऊ शकले नाही. पू. दादाजींच्या जीवनावर कादंबरी-लेखनाचा त्यांचा संकल्प आणि आत्यंतिक इच्छा मी पुरी करू शकलो याचा मला निश्चितच परमानंद आणि समाधान आहे.

या लेखनकाळात प. पू. दादाजींनी मला पूर्ण वेळ दिला होता. तासन्तास मी त्यांच्यापुढे बसत असे. त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी आणि किस्से मी त्यांच्या मुखातूनच ऐकले. त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान समजून घेतले. ते ऐकता ऐकता मी त्यांचा - त्यांच्या विशाल परिवाराचा केव्हा होऊन गेलो ते समजलेच नाही. दादाजींचे विचार माझ्याकडून ऐकून माझी पत्नी सौ. सीमंतिनी हिने हे कार्य तेव्हाच उचलले. कारण पू. दादाजी भावमयतेबरोबरच बुद्धीलाही साद घालत. त्यांच्या विचारात कमालीची शक्ती होती, आहे. तरीपण ते आग्रही नसत. आधुनिक काळातील या क्रांतदर्श ऋषीने धर्म आणि भक्तीचे संदर्भच बदलून टाकले. आपले जाज्वल्य विचार मांडतानाही त्यांनी कोणत्याही विचारसरणीचा किंवा धर्माचा कधी द्वेष केला नाही किंवा उपमर्द केला नाही. उलट ते म्हणायचे जितका मला कृष्ण आवडतो तितकाच लेनिनही आवडतो. मार्क्सला तर ते ऋषी मानायचे. जगातले तत्त्वज्ञान त्यांच्यामध्ये पुरेपूर मुरले होते. वेद-वेदांग, दर्शनशास्त्र, व्याकरणशास्त्र - त्या शास्त्रातले प्रौढ मनोरामा, परिभाषेन्दू शेखर, लघुशब्देदू शेखर, लघुमंजुषा परमलघुमंजुषा व्याकरणमहाभाष्य अशा गहन व्याकरणशास्त्राबरोबरच न्याय-मीमांसा-वेदान्त या शास्त्रांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. या शास्त्र-ग्रंथांमधली परिभाषा त्यांना अवगत होती. सारे काही मुखोद्गत होते. जणू दादा हे प्रातिभज्ञानच घेऊन आले होते. श्री हर्ष, विद्यारण्य, मधुसूदन सरस्वती, वाचस्पती मिश्रा, मध्वाचार्य, वल्लभाचार्य आणि अर्थातच शंकराचार्य आदी असंख्य संस्कृत पंडितांच्या ग्रंथांचे ते भाष्यकार होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुलसीदास, नरसी मेहता आदी संतांच्या साहित्याचेही ते अभ्यासक होते. कालिदास, भवभूतीबरोबरच शेक्सपिअरच्या नाटकांचेही ते समर्थ भाष्यकार होते. मुंबईतल्या रॉयल एशियाटिक लायब्ररीतल्या तत्वज्ञान आणि इतिहासविषयक सर्व ग्रंथांचे त्यांनी वाचन-चिंतन केले होते. फोटोग्राफी मेमरीची देण असल्यामुळे त्यांच्या प्रवचनातून असंख्य संदर्भ लीलया सांगितले जात. संस्कृत मंत्र-श्लोक तर प्रस्फुरित होतच; पण अनेक देशी-विदेशी विचारवंतांचे विचार आणि त्यावर दादांचे चिंतन ऐकण्यासारखे असे. वेल्स, विल ड्युरांड, बर्ट्रान्ड रसेल, व्हॉल्टेअर, कान्ट, हेगेल, व्हाईटहेड, देकार्त अशा जगातल्या असंख्य विचारवंतांच्या विचारांवर ते अधिकारवाणीने बोलत. परदेशातील असंख्य तात्त्विक सभा त्यांनी आपल्या प्रभावी विचारांनी भारावून टाकल्या होत्या. तत्वज्ञानाचा एवढा गहन अभ्यास असूनही त्यांचे मानवप्रेम वर्णनातीत होते. तत्वज्ञान का मानवप्रेम या पर्यायात ते मानवप्रेमाला अग्रमान देत. म्हणूनच शिक्षित-अशिक्षित, शहरी-वनवासी, धार्मिक-साम्यवादी-समाजवादी अशा सर्वांप्रती त्यांचा समभाव असे. त्यांच्या निळसर झाक असलेल्या नेत्रांमधून कमालीचे दैवी प्रेम ओसंडून वाहत असे. मी अनेकदा त्याचा अनुभव घेतला आहे. हा महापुरु ष इतक्या विशाल अंत:करणाचा होता म्हणूनच देशी-विदेशी तत्त्वज्ञ, धर्ममार्तंड, लेखक, विचारवंत दादांची आवर्जून भेट घेत. अनेक कार्डिनल्स, शेख पू. दादांना भेटत.

आमच्या भेटीत दादाजी नेहमी गरीब मनुष्य कसा जगतो, त्याच्या उत्कर्षसाठी आर्थिक मदत देऊन त्याला लाचार बनवण्यापेक्षा त्याला आत्मगौरव देऊन विचारांनी कसे उभे करता येईल, याविषयी विचार मांडायचे, चॅरिटी काय केवळ मोठ्या उद्योगपतींनीच करावी का? माझा आदिवासी का करू शकणार नाही? चॅरिटी करून जर खरोखरच पुण्य मिळणार असेल तर ते त्याला का मिळू नये? पू. दादाजी एकदा मला म्हणाले, चॅरिटीच्या विचारांनी मला बौद्धिक चक्कर आली. पण माझा गरीब निष्कांचन मनुष्य चॅरिटी तरी कशी करणार? त्याच्याजवळ काही नाही. हे बोलताना त्यांच्या डोळ्यांपुढे तो वंचित मनुष्य आणि त्याचे जीवन उभे राहात असे. मग दादांच्या नील-नेत्रांमधून घळा घळा अश्रू ओसंडून वाहात. अंत:करणातून खळाळलेल्या त्या निर्मल निर्झराचा मी अनेकदा साक्षात अनुभव घेतला आहे. मग सावरून दादाजी म्हणायचे, त्याच्याकडे पैसा नाही; पण देवाने  त्याला घाम तर दिला आहे! अस्मिता दिली आहे. पू. दादाजींनी आज कृतिभक्तीतून हजारो प्रयोग उभे केले आहेत. Man to man, Man to nature आणि Nature to God हा प्रवास त्यांनी समजावला. आत्मगौरव, परसन्मान आणि त्यातून ईशपूजन त्यांनी समजावले. या भावबंधनातूनच त्यांनी भावनिक आणि आध्यात्मिक क्रांती केली. त्यांचे विशाल कार्य पाहूनच त्यांना टेम्पल्टन, मॅगसेसे सारखे १०० च्यावर पुरस्कार दिले गेले. पू. दादांच्या मानवावरच्या प्रयोगांतून आज भारतभर हजारो गावांमधून माणसांचे जीवन उन्नत, समृद्ध आणि आनंदी बनले आहे. जात, आदर्श आणि धर्माच्या नावाखाली आज माणसा-माणसांमध्ये हेतुपुरस्सर भेद पाडला जात असताना पू. दादांचे एकविचारी परस्पर स्नेहभावाने फुललेले पारिवारिक कार्य प्रकर्षाने उठून दिसते.

‘देह झाला चंदनाचा’ लेखनानिमित्त मी पूजनीय दादाजींच्या सान्निध्यात पुष्कळ काळ बसलो. भारावलेल्या त्या तीन वर्षात मी साक्षात ज्ञानसूर्य पाहिला; कमालीचा तेजस्वी; पण तितकाच चंद्राप्रमाणे शीतल आणि भावरसाचे शिंपण करणारा!! मनुष्यमात्रावर प्रेमवर्षाव करणारा. दर वर्षी १९ ऑक्टोबरला पू. दादाजींची जयंती असते. स्वाध्याय परिवार हा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करतो; पण तो मनुष्य गौरव दिन म्हणून. पद-पैसा-प्रतिष्ठा यापलीकडे माणसाचे माणूस म्हणून काही मूल्य आहे. त्याच मूल्यांचा पू. दादांनी गौरव केला. या मनुष्याच्या नावानेच हा गौरव दिन साजरा केला जातो. मनुष्यगौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.  

 

Web Title: Pandurang Shastri Athavale Social Reformer and Founder of Swadhyaya Parivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.