श्राद्धाला लागणा-या सामग्रीचे हे आहे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 08:01 IST2018-10-02T08:00:24+5:302018-10-02T08:01:05+5:30
ज्या पितरांनी कष्ट सोसून आपल्याला वाढवले त्या पितरांचे ऋण काही अंशी फेडण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष.

श्राद्धाला लागणा-या सामग्रीचे हे आहे महत्त्व
ज्या पितरांनी कष्ट सोसून आपल्याला वाढवले त्या पितरांचे ऋण काही अंशी फेडण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष. या काळात करण्यात येणारे श्राद्ध मन:पूर्वक श्रद्धेने व यथासांग करावे, असे शास्त्र सांगते. त्यात लागणा-या साहित्याची यादी व त्यांचे महत्त्व खूप मोठे आहे. ती बहुतेकांना माहीत असते. त्यामुळे त्यापैकी काहींची माहिती आज घेऊ या.
१) पवित्रके :
पवित्रके दोन अथवा तीन दर्भांची केली असता चालतात. ते तयार करण्याचीही खास पद्धत असते. ती जाणकाराकडून माहीत करून घ्यावी लागते. श्राद्धाचे वेळी अथवा शांतिकर्माचे वेळी तीन-दोन दर्भांचे पवित्रक करावे. सपिंडक श्राद्धात दोनदा पवित्रके धारण करावी लागतात.
२) कूर्च :
श्राद्धप्रसंगी पितरांना उदक समर्पण करण्यासाठी दर्भापासून तयार केलेले साधन म्हणजे कूर्च होय. पहिल्या वर्षश्राद्धाला पाच दर्भांचा
कूर्च करतात. पुढे प्रतिसांवत्सरिक श्राद्धाला सात दर्भांचा कूर्च करतात. महालय श्राद्ध व तीर्थ श्राद्ध यामध्ये नऊ दर्भांचा कूर्च करतात. देवांचे कूर्च दोन दर्भांचे असतात. पहिल्या वर्षी चार दर्भांचेही कूर्च करण्याची काही ठिकाणी पद्धत आहे.
३) ब्राह्मण :
श्राद्धात भोजनाला दोन, चार किंवा जास्तीत जास्त पाच ब्राह्मण असावेत. देवस्थानीय ब्राह्मणांचे तोंड पूर्वेस व पितृस्थानीय
ब्राह्मणांचे तोंड उत्तरेस होईल, असे त्यांना बसवावे. ब्राह्मण दोन असल्यास एक देवस्थानी व एक पितृस्थानी बसवावा. तसेच पाच असल्यास दोन देवस्थानी व तीन पितृस्थानी बसवावेत.
४) पिंड :
भातामध्ये तिलोदकाचे पाणी, वडा व खीर घालून, भात मळून साधारणत: लिंबाएवढे गोल असे पिंड करावेत. ते मध्येच फुटतील असे करू नयेत. चांगले घट्ट करावेत. त्यातही पितृत्रयींकरिता जरा मोठे पिंड करण्याची पद्धत आहे. ती कृतज्ञतामूलक आहे. वस्तुत: पिंडाकरिता सर्व अन्नातील थोडा-थोडा भाग घ्यावा, असे शास्त्र सांगते. तरीही आपापल्या भागातील रूढीप्रमाणे करावे.
प्रतिसांवत्सरिक श्राद्धात तीन पिंड असतात. तर पितृपक्षात करणा-या येणा-या श्राद्धात मरण पावलेल्या पितरांचे पिंड करण्यात येतात.
५) तीळ :
काही ठिकाणी काळे तीळच श्राद्धाला वापरतात तर काही ठिकाणी पांढरे तीळही वापरतात. आपापल्या प्रदेशानुसार ते वापरावेत. हे तीळ नांगरताना सिद्ध केलेल्या भूमीमध्ये उत्पन्न केले असतील, तर अधिक चांगले.
६) तीलोदक-यवोदक :
श्राद्धसमयी तिलोदक अथवा यवोदक अर्पण करण्यात येतात. ते दोन स्वतंत्र ताम्हणात तयार करावेत. ते तयार करताना प्रत्येक ताम्हणात पाणी, तीळ किंवा यव, गंध, तुलसीपत्र, पुष्प, सुपारी, पैसा टाकावेत.
त्यात कूर्च ठेवावे.
७) फुले :
श्राद्धासाठी शक्यतो पांढºया फुलांची योजना करावी. तांबडी कमळे असल्यास हरकत नाही. सुवासिक व सुंदर फुले केव्हाही चांगलीच वाटतात. त्या-त्या काळात उपलब्ध होणारी फुले विशेष चांगली. जास्वंदी, कोरांटी, वास नसणारी किंवा उग्र वासाची फुले घेऊ नयेत.
८) धूप :
चंदन, गुगुळ, सुगंधी उदबत्त्या लावाव्यात.
९) मध :
पितरांना मध अतिशय प्रिय असल्याने मध आणून ठेवावा.
-संकलन : सुमंत अयाचित