जोडोनिया धन उत्तम व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 17:33 IST2018-11-06T17:29:42+5:302018-11-06T17:33:11+5:30
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे.

जोडोनिया धन उत्तम व्यवहार
धर्मराज हल्लाळे
संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सदाचारावर अनेक ठिकाणी भाष्य केले आहे. स्वार्थ आणि परमार्थ याचा अर्थ सूचक शब्दांमध्ये समजावून सांगितला आहे. संसारात राहूनही इतरांच्या भल्याचा आणि नि:स्वार्थ वृत्तीचा विचार त्यांच्या अभंगातून पेरला गेला आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे... ही त्यांची अभंगओळ बरेच काही सांगून जाते. आज आपण नेहमी म्हणतो, माणूस पैशाच्या मागे धावू लागला आहे. वाट्टेल त्या मार्गाने पैसा मिळविणे हे त्याचे ध्येय बनले आहे. पैशातून सुख आणि सुखासाठी पैसा हे जणू सूत्रच सांगितले जाते. आश्चर्य म्हणजे त्याला आपण व्यवहार म्हणतो. असा हा सगळा खोटा व्यवहार आपल्या भोवती घडत असतो. ज्याच्यामध्ये आपणही विलिप्त झालो आहोत. याचा अर्थ प्रबोधनाचा वसा घेतलेल्यांनी धनाचा लोभ सोडून द्यावा आणि घरावर तुळशीपत्र ठेवावे हे अभिप्रेत नाही. संत तुकाराम महाराजांनीही परमार्थ सांगताना जीवनार्थ सोडून द्यायला सांगितला नाही. धन जमविलेच पाहिजे. केवळ ते उत्तम मार्गाने मिळवावे, असा उपदेश अभंगातून केला आहे. जे धन तुम्ही जोडणार आहात ते उत्तम व्यवहारातून जमविलेले असावे एवढेच सांगायचे आहे.
समाजात अगदी दोन टोकांचे विचार दिसतात. ज्यांनी संत विचार मांडला अथवा अंगिकारला, त्यांच्याकडून टोकाच्या त्यागाची अपेक्षा केली जाते. अन् जे संत विचारापासून दूर आहेत, ते जणू काही दुर्व्यवहार करायला मोकळेच आहेत. तुम्ही चांगले वागता म्हणजे तुमच्यात त्यागवृत्ती असली पाहिजे. धनाचा लोभ नसला पाहिजे. इथपर्यंत ठिक आहे. पण धन मिळवूच नये असे नाही. चरितार्थ चालविण्यासाठी धन आवश्यक आहे. अनेकांना सोबत घेऊन जाण्यासाठी अधिक धनाची आवश्यकता आहे. अर्थात हे धन सद्मार्गाने मिळवावे हा अभंगातील गर्भित अर्थ आहे.
जमेल त्या मार्गाने, वाट्टेल त्या दिशेने धनासाठी भरकटणारी माणसे उत्तम व्यवहार करीत नाहीत. त्यांचा धनसंचय हा अमान्य आहे. त्यातून अपप्रवृत्तीच जन्माला येतात. भरमसाठ धनाच्या लोभातून सुखाचा शोध घेतला जातो परंतु, प्रत्यक्षात तो दु:खाच्या मुळाशी जातो. त्याचा व्यवहार अवतीभोवतीच्या माणसांवरच नव्हे तर समाजावर विपरित परिणाम करणारा ठरतो. तो धन मिळवितो, मात्र स्वत:ची ओळख गमावतो. अखेरीस धनसंचय आवश्यक असला तरी त्याचा मार्ग कोणता यावरच त्याचे भविष्य अवलंबून असते. सद्मार्ग सोडून जोडलेले धन विनाश बुद्धीला जन्म देते. उत्तम व्यवहाराने जोडलेल्या धनामुळे माणुसकी धर्माचा उदय होतो. सद्मार्गाचे धन त्याचे, परिवाराचे आणि समाजाचेही कल्याण साधते.