संतापजनक! क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 10:26 AM2022-12-07T10:26:32+5:302022-12-07T10:40:02+5:30

सीतासावंगीतील प्रकार, शिक्षकाविरुद्ध गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

crime filed against teacher for brutally beaten up student until he became unconscious, bhandara | संतापजनक! क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

संतापजनक! क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

Next

तुमसर (भंडारा) : शाळा संपल्यानंतर वऱ्हांड्यात पायावर पाय ठेवून बसल्याच्या कारणावरून नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला बेशुद्ध होईस्तोवर शिक्षकाने मारहाण केली. ही धक्कादायक घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये सोमवारी घडली. याप्रकरणी मंगळवारी शिक्षकाविरूद्ध गोबरवाही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयंक प्यारेलाल धारगावे (वय १५, रा. चिखला ता. तुमसर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे, तर कोमल मेश्राम असे शिक्षकाचे नाव असून त्यांच्याविरूद्ध भादंवि ३२३, ५०४, ५०६, सहकलम ७५ (मुलांची काळजी व संरक्षण) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयंक हा सोमवारी शाळा संपल्यानंतर चिखला येथे जाण्याची बस लागल्याची सूचना न मिळाल्याने वऱ्हांड्यात बसून होता. त्याच्यासोबत काही मित्रही होते. तेथे पायावर पाय ठेवून विद्यार्थी बसले होते.

दरम्यान, शिक्षक मेश्राम तेथे आले. पाय सरळ ठेवून बसा, असे बजावले. मात्र, शिक्षकाने मयंकला तुला समजत नाही का, असे म्हणत मारायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मयंक जोरजोराने ओरडत होता. काही वेळातच तो बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर हा प्रकार त्याच्या मित्रांनी चिखला येथे जाऊन मयंकच्या वडिलांना सांगितला, तर थोड्याच वेळात शाळा व्यवस्थापननेही मुलाला तुम्ही शाळेत येऊन घेऊन जा, असे सांगितले.

त्यावरून वडील प्यारेलाल आणि आई शाळेत पोहोचले. मयंक शाळेच्या वऱ्हांड्यात पडून होता. बाजूला शिक्षक उभे होते. वडिलाने मयंकला गोबरवाही आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर गोबरवाही ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वृत्त लिहिस्तोवर अटक झाली नव्हती.

व्हिडीओ काढल्याचा राग

शिक्षक मेश्राम मयंकला मारत असताना व्हिडीओ काढण्याची मोठी आवड आहे ना आता फोटो काढ, असे म्हणत होता. दुर्गोत्सवाच्या काळात ऑर्केस्ट्रा बघताना मयंकने व्हिडीओ काढला होता. त्याचाच राग शिक्षकाच्या मनात होता आणि त्यातूनच त्याला मारहाण झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

Web Title: crime filed against teacher for brutally beaten up student until he became unconscious, bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.