छत्रपतींच्या जयघोषाने यवतमाळ दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 09:54 PM2018-02-19T21:54:04+5:302018-02-19T21:54:30+5:30

शिवछत्रपतींचा जयघोष, भगवे फेटे, झेंडे आणि ढोलताशांचा गजर करणारे जथ्थे.. हे चित्र कुठल्या गडकिल्ल्यावरचे नव्हेतर, यवतमाळच्या शिवतिर्थावर दिसले.

Yavatmal Dumdumle by Chhatrapati Shivaji | छत्रपतींच्या जयघोषाने यवतमाळ दुमदुमले

छत्रपतींच्या जयघोषाने यवतमाळ दुमदुमले

googlenewsNext
ठळक मुद्देरन फॉर शिवाजी : गडकिल्ले, छायाचित्रे, झाँकीने जीवंत केली शिवशाही, शिवरायांच्या इतिहासाला उजाळा

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शिवछत्रपतींचा जयघोष, भगवे फेटे, झेंडे आणि ढोलताशांचा गजर करणारे जथ्थे.. हे चित्र कुठल्या गडकिल्ल्यावरचे नव्हेतर, यवतमाळच्या शिवतिर्थावर दिसले. सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच शहरात उत्साह संचारला होता. तर आदर्श शोभयात्रा जणू ‘राजेंची स्वारी’च ठरली.
‘रन फॉर शिवाजी’ शिवमॅराथॉन स्पर्धेने या उत्सवाला अक्षरश: उत्साहाचे भरते आले होते. या स्पर्धेत युवक आणि युवतींचा सर्वाधिक सहभाग पाहायला मिळाला. २२०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. पालकमंत्री मदन येरावार आणि विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरूवात केली.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिव मॅराथॉन स्पर्धा शहरात पार पडली. यासोबतच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नव्या पिढीला स्वयंरक्षणाचे धडे मिळावे यासाठी कराटे स्पर्धा घेण्यात आली. छायाचित्र स्पर्धेमध्ये ‘शिवरायांच्या स्वप्नातील आजचे मावळे’ या विषयावर चित्र रेखाटण्यात आले. तर रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनातील प्रसंग आणि महापुरूष, संत यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या.
‘शिवकालीन गडकिल्ले’ ही अभिनव स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. शिवरायांनी काबिज केलेले गडकिल्ले कसे होते, त्यांची रचना कशी होती हे मांडण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी केला. यामुळे शिवरायांच्या इतिहासाला उजाळा मिळाला.
यवतमाळ आयडॉलच्या धर्तीवर शिवसंगीत सम्राट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शिवसामान्यज्ञान स्पर्धा, शिवनिबंध स्पर्धा, राज्यस्तरीय शिवकाव्य स्पर्धा, विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, नृत्य स्पर्धा, राज्यस्तरीय शिवनाट्य स्पर्धेचे आयोजन छत्रपती महोत्सवात करण्यात आले होते.
आयोजन समितीचे प्रमुख डॉ. दिलीप महाले, सुदर्शन बेले, सुनिल कडू, प्रवीण भोयर, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, विशाल चुटे, पंकज राऊत, निखिल धबगडे, अंकुश वानखडे, विनोद डाखोरे, महेश ठाकरे, संजय कोल्हे, संतोष जगताप, अमित नारसे, प्रवीण देशमुख, संगीता घुईखेडकर, वैशाली सवई, प्रणिता खडसे, संगीता होनाडे, अर्चना देशमुख, विद्या खडसे आदी कार्यकर्ते झटत आहेत.
जिल्ह्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आले. मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
आदर्श शोभायात्रा
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने सोमवारी आदर्श शोभायात्रा काढून एक नवा इतिहास रचला. यामध्ये विविध झाँकी सादर करण्यात आल्या. शिस्तबद्ध पद्धतीने शिवरायांचा जयघोष करणारे शिवप्रेमी पाहायला मिळाले. शहरात विविध ठिकाणी शोभायात्रेचे जंगी स्वागत झाले. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या शोभायात्रेचा समता मैदानात समारोप झाला. आकर्षक देखाव्यांनी शिवरायांच्या इतिहासाला उजाळा दिला. यामुळे ही शोभायात्रा अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

Web Title: Yavatmal Dumdumle by Chhatrapati Shivaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.