पोलिसांच्या खमक्या वर्दीला साहित्याचा हळवा स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 09:22 PM2019-01-12T21:22:36+5:302019-01-12T21:23:04+5:30

धावपळीच्या अन् शुष्क जगातल्या पोलिसांनाही यवतमाळच्या अखिल भारतीय संमेलनाने साहित्याचा हळवा स्पर्श घडविला आहे. पोलिसी खाक्यावर ही साहित्य सुगंध दरवळला तरी कसा?

Tender touch of literature to the uniform of the police | पोलिसांच्या खमक्या वर्दीला साहित्याचा हळवा स्पर्श

पोलिसांच्या खमक्या वर्दीला साहित्याचा हळवा स्पर्श

Next
ठळक मुद्देचित्रकारितेचा स्टॉल, कविसंमेलन, पथनाट्यातही सहभाग

अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : दंडुका, पिस्तुल, हातकड्या हेच त्यांच्या कामाचे साहित्य... चोरांची गर्दी आणि तक्रारदारांची अर्जी हेच त्यांचे संमेलन.. पण अशा धावपळीच्या अन् शुष्क जगातल्या पोलिसांनाही यवतमाळच्या अखिल भारतीय संमेलनाने साहित्याचा हळवा स्पर्श घडविला आहे. पोलिसी खाक्यावर ही साहित्य सुगंध दरवळला तरी कसा?
पोलीस अधीक्षक कार्यालयालगतच साहित्य संमेलनासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी’ वसविण्यात आली आहे. या नगरीला चार भव्य प्रवेशद्वारे आहेत. त्यातील एक प्रवेशद्वार पोलीस नियंत्रण कक्षाच्या दारातून जाणारे आहे. या दारातून दररोज हजारो साहित्य रसिकांच्या दिवसभर येरझारा सुरू आहेत. शिवाय, प्रत्यक्ष संमेलनस्थळी ‘ड्यूटी’ लागलेले पोलीस कर्मचारीही खुश आहेत. तैनात असतानाच रसिकांशी साहित्य-गप्पा करता येत आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क चित्रकलेचा स्टॉलच संमेलनस्थळी लावला आहे. पोलीस म्हणून कठोर होणारे शेखर वांढरे यांनी चित्रकलेचा स्टॉल संमेलनात लावून रसिकांना सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा स्टॉल संमेलनात असावा, यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आयोजकांना सांगितले. ‘आदिवासी वारली चित्रकला’ हे त्यांचे दालन रसिकांची गर्दी खेचत आहे. अनेक रसिक त्यांना ही चित्रे विकत द्या म्हणून आग्रह धरत आहे. पण वांढरे म्हणतात, नाही हे फक्त प्रदर्शनासाठी आहे. विक्री केली तर रसिकांना काय दाखवू?
लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेचा छंद जडला. २००६ मध्ये त्यांची मुंबईत ‘ड्यूटी’ लागल्यावर त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत भेट दिली आणि वारली चित्रकलेची ओढच लागली. आपल्या प्रमाणेच पुढच्या पिढीलाही चित्रकलेचा छंद लागावा म्हणून ते यवतमाळात कार्यशाळाही घेतात. वणी, राजूर, म्हसोलासारख्या गावात जाऊन ते विद्यार्थ्यांसाठी शिबिर घेतात. आजवर हजार मुलांनी त्यांनी प्रशिक्षण दिले. पोलिसांच्या धावपळीच्या जीवनातून ते पहाटे ४ वाजता उठून चित्र काढतात.
याच साहित्य संमेलनात दोन पोलिसांमधील हळवा कवीही दिसला. यवतमाळ येथील प्रकाश देशमुख आणि दारव्हा येथील वंदना साळवे या दोन पोलीस कर्मचाºयांनी चक्क कविसंमेलनात जागा मिळविली. त्यांच्या रचनांनी रसिकही मंत्रमुग्ध झाले. तर महिला सेलच्या विजया पंधरे यांनी पथनाट्य सादर करून साहित्याचे प्रांगण खुश केले.

Web Title: Tender touch of literature to the uniform of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.