Only if the anchor is rotated, then only get rid of the bollworm | कपाशीवर नांगर फिरवा, तरच बोंडअळीतून सुटका

ठळक मुद्देशेतकरी परिषद : फेलोमन ट्रॅप अन ट्रायकोकार्ड वापरा

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले. या संकटातून सुटका करवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता फरदडच्या मागे न लागता कपाशीवर नांगर फिरवून शेत साफ करावे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. यामुळे किमान पुढील हंगामात किडींवर नियंत्रण मिळविता येईल असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
बळीराजा चेतना अभियान आणि कृषी विभागातर्फे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात गुरूवारी शेतकरी परिषद घेण्यात आली. त्यात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन परिसंवाद आणि जलयुक्त शिवार अभियानावर विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कापसावर संशोधन करणारी मंडळी आणि शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे यांनी गुलाबी बोंडअळीच्या समूळ उच्चाटनासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सांगितल्या. बीटी तंत्रज्ञानाने विकसीत बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी काही संकेत पाळले नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची प्रतिकारशक्ती वाढल्याचे त्यांनी सांगितले.
गुलाबी बोंडअळीला नियंत्रित करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना गरजेच्या असून नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यास डिसेंबर अखेरपर्यंत कपाशी उपटून फेकावी. त्याचा अंशही शेतात राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी कपाशी जाळावी. नंतर नांगरणी करून जमिनीची उलथापालथ करावी. यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा हल्ला होणार नाही, असे डॉ. नेमाडे यांनी स्पष्ट केले.
शेतकºयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच या नुकसानीपासून बचाव करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. असाच सल्ला कापूस संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधक टी. एच. राठोड, सीआयसीआरचे किटकशास्त्रज्ञ डॉ. नगराळे यांनीही दिला. या परिषदेला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विश्लेष नगराळे, अ‍ॅड. रामकृष्ण पाटील, विनोद जिल्हेवार, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कैलास वानखेडे, डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

शास्त्रज्ञ म्हणतात ...
गुलाबी बोंडअळीचे माहेरघर भारत आहे. येथूनच या अळीने जगभर उद्रेक केला. इतर ठिकाणी त्याचा उद्रेक थांबला. मात्र भारतात त्याचा उद्रेक कायम आहे.
गत तीन वर्षांपासून देशातील विविध राज्यात गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाला. गुजरातमध्ये त्यावर नियंत्रण करण्यात आले. त्याच पद्धतीने नियंत्रण केले, तर गुलाबी बोंडअळीवर मात शक्य आहे.
शेतकऱ्यांनी कपाशीची मान्सून पूर्व पेरणी टाळावी
शेतकऱ्यांनी शक्यतो अर्ली व्हेरायटीचा अवलंब करावा
फरदडचे उत्पादन घेण्याचा मोह टाळावा
शेतात फेलोमेन ट्रॅप लावावा, नुकसानाची पातळी ओळखावी
डोमकळ्या दिसताच त्यांचा कुचकरा करावा
ट्रायकोकार्डचा जादा वापर करावा
लाईट ट्रॅपचा वापर करावा, यामुळे गुलाबी बोंडअळीपासून होणारे नुकसान टाळता येईल.
बोंडअळीचे व्यवस्थापन गरजेचे