इंग्रजी शाळेच्या मुलांची मराठी मोडकी-तोडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:48 PM2019-06-10T21:48:40+5:302019-06-10T21:49:18+5:30

फाडफाड इंग्रजी बोलू शकणारा मुलगा मायबापाच्या कौतुकाचा विषय ठरतोय. पण तोच मुलगा थैली घेऊन बाजारात गेला की, चक्रावून जातो. काय घ्यावे अन् किती रुपयांचे घ्यावे, हे त्याला कळेनासे होते. शेवटी घरी बाबाला विचारतो एक पाव म्हणजे किती? दहा म्हणजे टेनच ना? इंग्रजी शाळांमध्ये मराठीवर होणाऱ्या दुर्लक्षाचे हे परिणाम आहेत. भावी पिढीची भाषाविषयक जाणीव बिघडविणारे हे दुर्लक्ष दूरगामी नुकसान करणारे ठरत आहेत.

Marathi schoolgirls of English school children | इंग्रजी शाळेच्या मुलांची मराठी मोडकी-तोडकी

इंग्रजी शाळेच्या मुलांची मराठी मोडकी-तोडकी

Next
ठळक मुद्देशाळेतले जिनियस, व्यवहारात चक्रावले : शाळांच्या दुर्लक्षाने बिघडतेय मुलांची भाषाविषयक जाणीव

अविनाश साबापुरे/रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फाडफाड इंग्रजी बोलू शकणारा मुलगा मायबापाच्या कौतुकाचा विषय ठरतोय. पण तोच मुलगा थैली घेऊन बाजारात गेला की, चक्रावून जातो. काय घ्यावे अन् किती रुपयांचे घ्यावे, हे त्याला कळेनासे होते. शेवटी घरी बाबाला विचारतो एक पाव म्हणजे किती? दहा म्हणजे टेनच ना? इंग्रजी शाळांमध्ये मराठीवर होणाऱ्या दुर्लक्षाचे हे परिणाम आहेत. भावी पिढीची भाषाविषयक जाणीव बिघडविणारे हे दुर्लक्ष दूरगामी नुकसान करणारे ठरत आहेत.
यवतमाळातील बच्चे कंपनी, त्यांचे पालक, शिक्षक आदींच्या प्रतिक्रिया ‘लोकमत’ने जाणून घेतल्या, तेव्हा अत्यंत खेदजनक बाबी पुढे आल्या. प्रतिक्रिया देताना प्रत्येक जण म्हणाला, स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी आवश्यक आहे. पण घरात जेव्हा मुलाला मराठी बोलताना अडखळताना बघतो, तेव्हा वाईट वाटते. शाळेत हुशार असलेला मुलगा घरी घड्याळात किती वाजले हे सांगू शकत नाही. बारा वाजले असे त्याला सांगितले, तर तो विचारतो बारा म्हणजे किती? बाजारात त्याला घेऊन जावे आणि एक पाव भाजी घ्यावी, तर तो विचारतो एक पाव म्हणजे किती किलो? इंग्रजी शाळांमध्ये कौतुकाने मुलांना पाठविणारे पालक पोरांच्या मराठी भाषेविषयी सांगताना दु:खी झाले होते.
त्याचवेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया जाणून घेताना आणखीच गंभीर बाबी पुढे आल्या. इंग्रजी शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांना मराठीतून प्रतिक्रिया देताना शब्द सापडत नव्हते. नेमक्यावेळी कोणता शब्द बोलावा, हे सूचत नव्हते. मनातली भावना व्यक्त करताना अडचणी येत होत्या. शेवटी, ‘आम्हाला शाळेत जे सांगतात, तेच आम्ही करतो’ एवढे बोलून अनेक मुलांनी स्वत:ची सुटका करून घेतली.
इंग्रजी शाळांचे प्राचार्य मात्र ठामपणे म्हणाले, आमच्या शाळेत आम्ही मराठी शिकवतोच. आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. शाळेत नियमित मराठीच्या तासिका घेतल्या जातात, असे बहुतांश प्राचार्यांनी सांगितले. मात्र असे असतानाही मुलांना मराठी निट का बोलता येत नाही, या प्रश्नावर मात्र त्यांच्याकडे उत्तर नव्हते.
लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार यांनी गेल्या दीड वर्षापासून राज्य सरकारकडे मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. प्रत्येक शाळेत मराठी शिकविलीच पाहिजे, असा आग्रह त्यांनी सरकारकडे धरला आहे. त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसत असून मुख्यमंत्र्यांनीही नुकतीच याबाबतीत घोषणा केली. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक असून कोणत्याही शाळेने त्यात पळवाट शोधू नये, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने यवतमाळातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा आढावा घेतला. त्यात अनेक शाळांत मराठी शिकविली जात असल्याचा दावा प्राचार्यांनी केला. मात्र प्रत्यक्ष मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, मुलांची मराठी मोडकी-तोडकी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रत्येक शाळेत मराठीचे अध्यापन अधिक प्रभावी आणि सक्तीचे करणे आवश्यक झाले आहे.
मराठी बोलाल, तर इंग्रजी कशी शिकाल?
इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येक शाळेने ‘लोकमत’शी बोलताना आम्ही मराठी शिकवतोच असा दावा केला. प्रत्यक्षात मात्र शाळेत मराठी बोलू नये, अशी सक्ती केली जात असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळेत एकतर इंग्रजी किंवा हिंदीतच बोलण्यास सांगितले जाते. मराठीतून संवाद साधत राहिल्यास इंग्रजी संभाषण कौशल्य अवगत करण्यास वेळ लागेल, असा काही शाळांचा गैरसमज असल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुढे आली. शाळेत अधिकाधिक संवाद इंग्रजी किंवा हिंदीतच व्हावा, असा आग्रह धरणाऱ्या शाळा पालकांनाही घरी मुलांशी याच भाषांतून बोलण्याची सूचना देत असतात. असे केल्यासच तो इंग्रजी चांगला बोलू शकेल, त्याला सीबीएसईचा अभ्यासक्रम झेपेल, असा गैरसमज पालकांच्याही मनात पेरला जात आहे.

Web Title: Marathi schoolgirls of English school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.