पोलीस अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच ‘स्ट्रेस-फ्री’ प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:01 PM2019-06-10T13:01:24+5:302019-06-10T13:04:17+5:30

नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच तणाव विरहित (स्ट्रेस-फ्री) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.

First time 'stress-free' training for Police officers | पोलीस अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच ‘स्ट्रेस-फ्री’ प्रशिक्षण

पोलीस अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच ‘स्ट्रेस-फ्री’ प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देमहासंचालकांची संकल्पना तणाव, आरोग्य, कुटुंब, डायट, गुंतवणुकीवर सल्ला, संपूर्ण शरीराची तपासणी

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच तणाव विरहित (स्ट्रेस-फ्री) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या तुकडीचे हे प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरी तुकडी सोमवारी १० जून रोजी प्रशिक्षणासाठी खंडाळा येथे रवाना होणार आहे.
कोणतेही प्रशिक्षण म्हटले की वैताग येतो. त्यात पोलिसांचे प्रशिक्षण असेल तर परेड, शारीरिक कवायतींनी आणखी तणाव वाढतो. परंतु आता पहिल्यांदाच पोलिसांशी संबंधित तमाम विषय दूर ठेऊन पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी अशा प्रशिक्षणांची आवश्यकता विशद करून ही प्रशिक्षणे लगेच सुरूही केली. फौजदार ते पोलीस निरीक्षक या श्रेणीतील पदोन्नतीस पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पदोन्नती देण्यापूर्वी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथील अकादमी आणि पुणे येथील महाराष्ट्र इन्टेलिजन्स अकादमीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलीस निरीक्षक दर्जाच्या ३३ अधिकाऱ्यांची पहिली तुकडी खंडाळा येथे बोलविण्यात आली होती. २९ अधिकारी या प्रशिक्षणाला हजर होते. १३ दिवस प्रशिक्षण चालले. त्यातील तीन दिवस या अधिकाऱ्यांना परिवारासह प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला महासंचालक सुबोधकुमार जायसवाल स्वत: तर समारोपाला परिवारासह उपस्थित होते. या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपूर्ण शरीराची तपासणी (होलबॉडी स्कॅन) करण्यात आली.

प्रशिक्षण अविरत सुरू राहणार
जेवण व झोपण्याच्या अनियमित वेळांमुळे बहुतांश पोलिसांचे पोट निघते. अशा पोलिसांनी आपले आरोग्य कसे सांभाळावे, तणावमुक्त कसे रहावे, डायट कसे असावे, सेवानिवृत्तीनंतर जीवनमान कसे असावे, निवृत्तीचा पैसा भविष्यासाठी कुठे गुंतवणूक करावा, इतरांसाठी प्रेरणादायी कसे बनावे यासह कौटुंबिक सलोखा व अन्य विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने अविरत सुरू राहणार आहे.

पोलीस अधिकाऱ्यांमध्ये समाधान
पोलीस अधिकाऱ्यांनी महासंचालकांच्या या नव्या पिकनिक स्टाईल प्रशिक्षण संकल्पनेचे जोरदार स्वागत केले असून समाधानही व्यक्त केले आहे. २० ते ३० वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रशिक्षण अनुभवायला मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रशिक्षण दहा-पंधरावर्षाआधी सुरू झाले असते तर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गुणात्मक बदल झाला असता व त्यांच्या कुटुंंबासह पोलीस खात्यासाठी हा बदल फायद्याचा ठरला असता, अशा प्रतिक्रीया अधिकाऱ्यांमधून ऐकायला मिळाल्या.

Web Title: First time 'stress-free' training for Police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस