Drunk in a drunken teacher's school | मद्यपी शिक्षकाच्या शाळेतच डुलक्या

ठळक मुद्देगावकऱ्यांनी केले ‘स्टिंग आॅपरेशन’ : जि.प.च्या साखरा पोड शाळेतील प्रकार

आॅनलाईन लोकमत
वणी : वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या साखरा पोड येथील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकी शाळेतील एका मद्यपी शिक्षकाच्या प्रतापाने सारे गाव हैराण झाले आहे. वैतागलेल्या गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीने सदर शिक्षकाचे प्रताप मोबाईलमध्ये कैद केले. तशी तक्रारही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र आठवडा उलटूनही सदर शिक्षकाविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने शिक्षण विभाग सदर शिक्षकाला पाठिशी तर घालत नाही ना, अशी शंका गावकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
मधुकर देवाळकर असे सदर शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक नेहमीच शाळेत दारू पिवून येत असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तो दारूच्या नशेत राहत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. आतापर्यंत त्याने इंग्रजी विषयाचा एकही पाठ विद्यार्थ्यांना शिकविला नसल्याचे शाळा शिक्षण समितीचे म्हणणे आहे. ३० नोव्हेंबरला मधुकर देवाळकर हा नेहमीप्रमाणे शाळेत मद्य प्राशन करून आला. तो व्हरांड्यातच खुर्ची टाकून त्यावर निद्रीस्त झाला. ही बाब कळताच, गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांनी शाळेत येऊन हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. त्यानंतर गावातील श्रीराम पाटील आत्राम यांनी देवाळकरला आवाज देऊन उठविले. यापूर्वीदेखील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण आत्राम यांनी देवाळकरला शाळेतच मद्यधुंद अवस्थेत झोपून असताना रंगेहात पकडले होते.
यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने ३० नोव्हेंबरलाच पुराव्यासह वणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली होती. मात्र आठवडा उलटूनही सदर शिक्षकाविरुद्ध कोणतीच कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीत देवाळकर ‘सैराट’
साखरा पोड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आर.एम.धुर्वे यांना अनेकदा मिटींग अथवा शालेय कामासाठी बाहेर जावे लागते. अशावेळी दोन शिक्षकी शाळा असल्याने शाळेवर देवाळकरचेच अधिराज्य असते. मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीत तो वेळेच्या आधीच शाळेला सुटी देतो व शाळा बंद करून निघून जातो, असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने तक्रारीतून केला आहे. १५ नोव्हेंबरला दुपारी एक वाजताच देवाळकर शाळेला टाळे ठोकून निघून गेला. २९ नोव्हेंबरला मुख्याध्यापक धुर्वे हे शालेय कामकाजासाठी रासा येथे बँकेत गेले असता, दुपारी २ वाजतानंतर शाळा बंदच होती. दुपारनंतर मुख्याध्यापक धुर्वे शाळेत परत आले तेव्हा शाळा बंद आढळली. मुख्याध्यापकांनी घडलेला प्रकार केंद्रप्रमुख नवनाथ देवतळे यांना सांगितला.

मागील वर्षभरापासून मधुकर देवाळकर यांच्या वर्तनाने विद्यार्थी वेठिस धरले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचे शैैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी केल्या. यासंदर्भात शिक्षक देवाळकर यांना मुख्याध्यापक म्हणून समज देण्याचा प्रयत्न केल्यास ते अश्लिल भाषेत शिविगाळ करतात. वरिष्ठांनी याविषयी कारवाई करावी.
-आर.एम.धुर्वे,
मुख्याध्यापक, साखरा पोड