दाभडी ते पांढरकवडा...आश्वासनांतून आश्वासनांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:07 PM2019-02-17T22:07:32+5:302019-02-17T22:08:34+5:30

‘मन की बात’ हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पांढरकवड्यातील जाहीर सभेलाही ‘मन की बात’चेच स्वरुप दिले. सुरक्षेच्या नावाखाली ‘आम’ माणसांपासून चार हात राखून वागले म्हणजे माणूस ‘खास’ बनतो. कदाचित हेच सूत्र अवलंबून पांढरकवड्यात मोदींनी कुणाच्या निवेदनांनाही स्वत:पर्यंत पोहोचू दिले नाही.

Dabdi to whiteboard ... promises from the promises | दाभडी ते पांढरकवडा...आश्वासनांतून आश्वासनांकडे

दाभडी ते पांढरकवडा...आश्वासनांतून आश्वासनांकडे

Next
ठळक मुद्देजन की बात

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘मन की बात’ हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पांढरकवड्यातील जाहीर सभेलाही ‘मन की बात’चेच स्वरुप दिले. सुरक्षेच्या नावाखाली ‘आम’ माणसांपासून चार हात राखून वागले म्हणजे माणूस ‘खास’ बनतो. कदाचित हेच सूत्र अवलंबून पांढरकवड्यात मोदींनी कुणाच्या निवेदनांनाही स्वत:पर्यंत पोहोचू दिले नाही. विचारतो तेवढे सांगा, अशा आविर्भावात ‘मैने काम किया हैं की नही?’ असे प्रश्न विचारून आज्ञाधारक विद्यार्थ्यांना गप्प करून दाखविण्याची किमया मात्र साधली.
वास्तविक बचतगटांच्या महिलांशी संवाद, असे या सभेचे स्वरुप आधी जाहीर करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही तसेच फलक झळकले होते. पण हा संवाद एकतर्फी झाला. बचतगटाच्या ७०-८० हजार महिला हजर राहिल्या. पण आधीच दिलेल्या आज्ञेप्रमाणे केवळ ‘मोदी मोदी’ असा नारा देण्यापलिकडे त्यांना संवाद करता आला नाही. बोलले ते केवळ पंतप्रधान. पंतप्रधानांनी बोलण्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण संवाद असे नाव देऊन एकतर्फी भाषण झाल्याने अनेकांनी खंत व्यक्त केली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी दाभडी (ता. आर्णी) गावात आले होते. अन् आता २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ते पांढरकवडा गावात येऊन गेले. विशेष असे की, ही दोन्ही गावे आर्णी-केळापूर या विधानसभा आणि चंद्रपूर-आर्णी या लोकसभा मतदारसंघात येतात. पाच वर्षापूर्वी ते या मतदारसंघात आले तेव्हा त्यांनी विकासाची वचने दिली. तर पाच वर्षानंतर आल्यावर त्यांना या मतदारसंघातील जात समूहांच्या बोलीभाषांचा आधार घ्यावा लागला. कोलामी, गोंडी, बंजारा बोलीतून त्यांनी दोन-चार वाक्ये खुबीने फेकली. लोकांना बरेही वाटले. पण राष्ट्रव्यापी पक्षाचे, महाकाय देशाचे नेतृत्व करणाºया पंतप्रधानांवर प्रादेशिक अस्मितांना गोंजारण्याची वेळ का आली? हा प्रश्न गर्दीतून उपस्थित झाला.
‘तुम्ही विचार करीत असाल आज मी पांढरकवडा का आलो? माता भगिनींना तर भेटायचेच होते, पण २० मार्च २०१४ ला मी दाभडीतही आलो होतो...’ अशी दोन वाक्यात मराठी पेरून त्यांनी पुढे ‘मी काय केले’ हे सांगून टाकले अन् बचतगटाच्या महिलांकडून वदवूनही घेतले. ‘मैने दाभडी मे किया वादा निभाया की नही निभाया?’ हा त्यांचा प्रश्न येताच पुढची ‘जमलेली’ गर्दी केवळ ‘हो’च म्हणू शकली. जे गेल्या काही वर्षांपासून दाभडीतील आश्वासने अपूर्ण राहिले म्हणत आहे, ते पांढरकवड्याच्या दुसºया टोकावर संकटमोचन मंदिरात आंदोलन करीत बसले होते. संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने घडलेला हा विसंवाद होता.
दाभडी गावात गेल्यावेळी पंतप्रधान शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन देऊन गेले होते. तेच आश्वासन पूर्ण झाल्याचे सांगताना पांढरकवड्यात मोदी म्हणाले, आता कास्तकारांना दर वर्षी सहा हजार रुपये मी देणार आहो. दाभडीच्या आश्वासनाचा अन् पांढरकवड्यातील वल्गनेचा अर्थाअर्थी संबंध नाही, हे लक्षात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. प्रत्यक्ष दाभडी गावातील शेतकरी आश्वासन पूर्ण झाले नाही, असे सांगत असताना पंतप्रधान मात्र माझी आश्वासने पूर्ण झालीच, असे ठणकावून सांगून गेले. त्यातल्या त्यात या मतदारसंघाचे खासदार ना. हंसराज अहीर यांनी तर प्रास्ताविकातच दाभडीतील आश्वासने पूर्ण झाल्याचे मोदींच्या पुढेच कबूल करून टाकले. त्यामुळे ‘मैने किया की नही किया’ या मोदींच्या प्रश्नाला सर्वसामान्य नागरिकांतून ‘नाही’ असे उत्तर येणार तरी कसे?
सभा संपवून घरी जाणाºया नागरिकांच्या मनात मात्र एक प्रश्न कायम राहिला. दाभडीची आश्वासने नक्की पूर्ण झाली की नाही? त्या आश्वासनांचे तर असो; पण पांढरकवड्यात नवे आश्वासन मिळाले. प्रत्येकाला घर मिळणार म्हणजे मिळणारच, पण २०२२ पर्यंत. अन् हे आश्वासन वाटतानाही मोदी २०१९ साठी जनतेचा आशीर्वाद मागायला विसरले नाहीत.

Web Title: Dabdi to whiteboard ... promises from the promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.