बंद साखर कारखाने, सूत गिरण्यांवर भाजपाचा डोळा

By admin | Published: June 26, 2017 12:49 AM2017-06-26T00:49:00+5:302017-06-26T00:49:00+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि वसंत सहकारी साखर कारखान्यावर आपल्या पक्षाचा अध्यक्ष

BJP's eye on closed sugar factories, yarn mills | बंद साखर कारखाने, सूत गिरण्यांवर भाजपाचा डोळा

बंद साखर कारखाने, सूत गिरण्यांवर भाजपाचा डोळा

Next

सहकारात सत्तेच्या विस्ताराचे वेध : जिल्हा बँक, ‘वसंत’मध्ये डाव यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि वसंत सहकारी साखर कारखान्यावर आपल्या पक्षाचा अध्यक्ष बसविण्याची खेळी यशस्वी झाल्यानंतर भाजपाने आता जिल्ह्यातील बंद सहकारी साखर कारखाने आणि सूत गिरण्यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सत्तेच्या विस्तारासाठी लक्ष केंद्रीत केले आहे.
जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आणि सोबतीला पालकमंत्रीपद आहे. पाहता पाहता युती सरकारची तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पहिल्या दोन-अडीच वर्षात भाजपाला फार काही मिळविता आले नसले तरी आता मात्र भाजपाच्या नेत्यांना जिल्ह्यात सत्तेच्या विस्ताराचे वेध लागले आहे. जिल्हा परिषदेत भाजपाने उपाध्यक्षपद मिळविले. त्यासोबतच आता सहकार क्षेत्रावर जोर दिला जात आहे. त्यातूनच भाजपाने पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्हा बँक व वसंत साखर कारखान्यात सत्तेचा गड सर केला आहे. २५ पैकी अवघे तीन संचालक असताना भाजपाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद अमन गावंडे यांच्या रुपाने खेचून आणले. गेल्या दहा वर्षातील ‘कारभारा’मुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांना कारवाईची वाटणारी भीती आणि ती होऊ नये म्हणून हवे असलेले युती सरकारचे संरक्षण याबाबी भाजपासाठी फायद्याच्या ठरल्या. या बँकेतील उपाध्यक्ष पदही भाजपाकडेच आहे. आपल्या तिसऱ्या संचालकाचेसुद्धा बँकेतील आणखी एखाद्या महत्वाच्या पदावर पुनर्वसन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बँके पाठोपाठ उमरखेड तालुक्याच्या पोफाळी येथील आजारी असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाजपाच्या ताब्यात आल्याचे मानले जाते. कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपाच्या जिल्हा सहकारी आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. माधवराव माने यांची बिनविरोध निवड करुन घेण्यात भाजपाची खेळी यशस्वी ठरली. बँक व कारखान्यावर मिळालेल्या या दोन विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातूनच भाजपाने आता सहकारातील बंद असलेले साखर कारखाने, सूत गिरण्या, खरेदी विक्री संघ तसेच बाजार समित्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने चाचपणी चालविली आहे. जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोदेगावचा जय किसान सहकारी साखर कारखाना बंद आहे. महागाव तालुक्याच्या गुंज येथील सुधाकरराव नाईक (पुष्पावंती) साखर कारखाना नॅचरल शुगरला विकला गेला आहे. पुसद येथील सूत गिरणी २५ वर्षांपासून बंद आहे. तर पिंपळगावची सूत गिरणी कशीबशी सुरू आहे. बंद सूत गिरणीच्या जागेवर राजकीय नेत्यांचा डोळा असल्याचे बोलले जात असले तरी जिल्हा प्रशासनाने तेथे प्रशासकीय इमारत उभारणीचे फर्मान काढल्याने या नेत्यांची अडचण झाली आहे.

भाजपाला रोखणार कोण ?
सत्तेच्या वाटेवर भाजपाची विजयी घौडदौड सुरू आहे. ती रोखणार कोण असा प्रश्न आहे. कारण भाजपाला कुठेही कुणीही आडवे जात नसल्याचे चित्र आहे. आडवे जाण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपाला जिल्हा मध्यवर्ती सारख्या महत्वाच्या सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची खुर्ची स्वत:हूनच बहाल केल्याचे विसंगत चित्र पहायला मिळत आहे. युतीचे सरकार पाच वर्ष टिकणार असा विचार करून काँग्रेसची नेते मंडळी घरात बसून आहे. त्यातील काहींनी आपल्या शेतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेसमधील तरुण मंडळीसुद्धा निवेदने आणि फोटो सेशेन पुरत्या नैमित्तिक आंदोलनापुरती मर्यादित आहे. दुसरा विरोधी पक्ष जणू भाजपाच्या गळ्यातील ताईत बनला आहे. बहुतांश भाजपाच्या सोईची भूमिका घेतली जात असल्याने राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळतो आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गेल्यापासून शिवसेनाही बॅकफुटवर आल्याचे जाणवते आहे. नगरपरिषद सभागृहात भाजपाला विरोध होत असला तरी प्रत्यक्ष रस्त्यावर व इतर विषयात शिवसेनेची तेवढी आक्रमकता दिसून येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यात भाजपाच सर्वकाही असे चित्र पहायला मिळत आहे. निष्प्रभ विरोधक हे त्यामागील सर्वात मोठे मानले जाते.

 

Web Title: BJP's eye on closed sugar factories, yarn mills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.