बेड्डी, जुपनं, कसाटी म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:06 PM2017-08-20T22:06:51+5:302017-08-20T22:07:51+5:30

कृषीवलांचा सर्वात मोठा सण पोळा साजरा होतोय. खेडे सोडून शहरात स्थिरावलेले ‘शेतीबाह्य’ शेतकरीपुत्रही गोडधोड खावून पोळा दरसाल ‘एन्जॉय’ करतातच.

Beddy, Junken, Cassati is what Ray Brother? | बेड्डी, जुपनं, कसाटी म्हणजे काय रे भाऊ?

बेड्डी, जुपनं, कसाटी म्हणजे काय रे भाऊ?

googlenewsNext
ठळक मुद्देराजेश अंगाईतकर : शेतीशी नाळ तुटलेल्यांकरिता काष्ठशिल्पांचा खजिना

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषीवलांचा सर्वात मोठा सण पोळा साजरा होतोय. खेडे सोडून शहरात स्थिरावलेले ‘शेतीबाह्य’ शेतकरीपुत्रही गोडधोड खावून पोळा दरसाल ‘एन्जॉय’ करतातच. पण बेड्डी, जुपनं, शिवळ, कसाटी, मुस्कं, टापर म्हणजे काय? शेतीत त्यांचा कशासाठी उपयोग होतो? बैलाच्या साजशृंगारात कोणत्या वस्तू असतात? हे प्रश्न नव्या पिढीला कधीच पडत नाही. पडले तरी त्याचे निट उत्तर देणारे आजूबाजूला कोणीच आढळत नाही. शेती आणि शहर यात निर्माण झालेला हा ‘गॅप’ भरून काढण्यासाठी एका संवेदनशील शेतकºयाने पोळ्याच्या निमित्ताने आगळा वेगळा खजिना आणलाय.. काष्ठशिल्पांचा!
राजेश हनुमंतराव अंगाईतकर या शेतकºयाने कृषी जीवनातील प्रत्येक साहित्याचे काष्ठशिल्प तयार केले आहे. स्वत: एम.कॉम. झाल्यावरही नोकरीपेक्षा त्यांनी कास्तकारीत जीव ओतला. वाटखेड बु. (ता. बाभूळगाव) येथील आपल्या शेतीत कधीच तोटा आला नाही, असे ते सांगतात. पण नवी पिढी एकदा शिकली की परत शेतीकडे वळूनही पाहात नाही. शेतीच्या भरवशावर देश तगला, जगला. पण धनधान्यासोबतच शेती संस्कृतीने असंख्य शब्दांचा खजिनाही दिला आहे. बेड्डी, जुपनं, शिवळ, कसाटी, मुस्कं, टापर... असे कितीतरी शब्द आज यांत्रिकीकरणाच्या सपाट्यात बाद होत आहेत. नव्या पिढीला शब्दच माहिती नाहीत, तर त्या वस्तू तरी कशा माहिती असणार? म्हणूनच अंगाईतकर यांनी चक्क या वस्तूंचीच सुंदर काष्ठशिल्पे साकारली आहे.
वडिलांनी एकदा बासिंग बनविले होते. ते पाहून आपणही सर्व वस्तू तयार करण्याची प्रेरणा मिळाल्याचे अंगाईतकर म्हणाले. माझ्या स्वत:कडे दोन बैलजोड्या आहे. पोळ्यापुरतेच नव्हेतर वर्षभर त्यांची काळजी वाहतो. शेतीतील लाकडी अवजारांचे महत्त्व आजही कायम आहे. पण लोकांना सर्वकाही तत्काळ पाहिजे. म्हणून खाचरापासून वखरापर्यंत प्रत्येक वस्तू लोखंडी विकत घेतली जात आहे. बैल पोसायलाही कुणी तयार नाही, अशी खंतही अंगाईतकर यांनी व्यक्त केली. शेतीच्या भरवशावरच आज प्राची आणि प्रिया या दोन्ही मुलींना मी अभियांत्रिकीपर्यंत शिकवू शकलो, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. पोळ्याच्या दिवशी बैलांना सजविण्यासाठी लागणारी झूल, गेरु, बेगड, बाशिंग, मटाट्या, घुंगरु अशा साहित्याची नवीन पिढीलाही पूर्ण माहिती देण्याचा अंगाईतकर यांचा प्रयत्न आहे.
नव्या पिढीसाठी प्रदर्शनाचा प्रयत्न
वर्षानुवर्षे लाकडाचा शोध घेऊन अंगाईतकर यांनी नांगर, वखर, तिफन, डवरा, सरते, रुमणे, जोखड, टापर, टाळ, बेड्डी, ताठी, मथाटी, काडवन, खांजाय, तुत्या, तिपाई, मुस्कं, रासुंड्याचा डेक, माळोशी, मचाण, सराटा, कुदळ, कुºहाड, विळा, पावडे, घुंगरं या सर्व वस्तू हुबेहुब साकारल्या आहेत. मशागत, पेरणी ते काढणीपर्यंतच्या कामात येणारी प्रत्येक वस्तू त्यांनी तयार केली आहे. यात खाचराला जुंपलेली बैलजोडी तर अप्रतिम आहे. या सर्व वस्तू नव्या पिढीला प्रत्यक्ष पाहाता याव्या, याकरिता जाहीर प्रदर्शन भरविण्यासाठी अंगाईतकर यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी बळीराजा चेतना अभियानाची आस आहे.
बैलाचं मनोगत
माझ्या जन्मातच लिहिले होते
जगणे तुझ्यासाठी
माझ्या आईचे दुध मिळायचे तुला
मी निजायचो उपाशीपोटी
मोठा झाल्यावर मग मी
खायला लागलो चारापाणी
नाकात माझ्या वेसण घालून
सुरू झाली शिकवणी
आता झालो होतो
तुझ्या औताचा मी बैल
ओझं घेऊन खांद्यावर
चालायचो कित्येक मैल
दिवस रात्र राबलो मी
तुझ्यासाठी शेतात
काळ्या मातीतून दिले
मोती काढून हातात
उमेदीत केले तू माझ्या
सण पोळ्याचे साजरे
किती चढविल्या झुली
रंगीबिरंगी कासरे
तू गोंजारले कधी
कधी दिला काठीचाही मार
कधी दिला शाप
कधी शिव्यांचा भडीमार
मी सोशिला मार
परि बोललो ना काही
उभा देह झिजविला
काही मागितले नाही
माझा थकला आता जीव
नाही त्राण माझ्या पायाला
थोड्या पैशासाठी नको
विकू मला कसायाला
मला येऊ दे मरण
माझा जवळ आला काळ
तू सुखी राहा सदा
कधी पडोना दुष्काळ

- राजेश अंगाईतकर

Web Title: Beddy, Junken, Cassati is what Ray Brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.