राज्यात तयार होतेय शैक्षणिक उपक्रमांची बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:51 AM2018-02-23T11:51:28+5:302018-02-23T11:53:49+5:30

चांगल्या शिक्षकांनी आपले उपक्रम त्यात ‘डिपॉझिट’ करायचे आणि गरजू शिक्षकांनी ते अभ्यासून अध्यापनात सुधारणा करायची, अशी ही उपक्रम पेढी विद्या प्राधिकरण साकारणार आहे.

Bank of educational activities that are ready in the state | राज्यात तयार होतेय शैक्षणिक उपक्रमांची बँक

राज्यात तयार होतेय शैक्षणिक उपक्रमांची बँक

Next
ठळक मुद्देविद्या प्राधिकरण साकारणार अध्यापनाच्या आगळ्या हातोटीची शाळा-शाळांमध्ये देवाण घेवाण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसे शिक्षक तितक्या अध्यापनाच्या पद्धती. प्रत्येक गुरुजीची शिकविण्याची हातोटी वेगळी असते. परंतु, अशा प्रभावी अध्यापनाच्या ‘ट्रिक’ ठाऊक नसलेलेही हजारो शिक्षक आहेत. अशा शिक्षकांसाठी आता राज्यस्तरावर आगळीवेगळी बँक तयार होत आहे. चांगल्या शिक्षकांनी आपले उपक्रम त्यात ‘डिपॉझिट’ करायचे आणि गरजू शिक्षकांनी ते अभ्यासून अध्यापनात सुधारणा करायची, अशी ही उपक्रम पेढी विद्या प्राधिकरण साकारणार आहे.
विशेष म्हणजे, उत्तम शैक्षणिक उपक्रम देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पुण्याच्या विद्या प्राधिकरणाचा संशोधन विभाग उपक्रमांच्या संकलनासाठी तयारीला लागला आहे. नव्या शैक्षणिक सत्रापासून उपक्रमांची बँक राज्यभरातील प्रत्येक शिक्षकासाठी सज्ज होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील चांगले उपक्रम संकलीत करण्यासाठी विद्या प्राधिकरणाने ‘नवोप्रकम स्पर्धा’ घोषित केली आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावरील कोणत्याही शिक्षकाला त्यात सहभागी होता येणार आहे. त्यासोबतच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, डायटचे अधिव्याख्याता, डीएडचे शिक्षक आदींसोबतच प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनाही यात सहभागाची संधी आहे. त्यासाठी प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड यांनी लिंक ओपन केली असून त्यावर स्पर्धकांनी आपले उपक्रम आॅनलाईन अपलोड करण्याचे आवाहन केले आहे.
संकलन पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाच्या वेबसाईटवर ही बँक प्रकाशित होणार आहे. त्यामुळे गरजू शिक्षकांना हे उपक्रम हवे तेव्हा ‘रेफर’ करून आपल्या अध्यापनात सुधारणा करता येणार आहे. उत्कृष्ट उपक्रम देणाऱ्या प्रत्येक गटातील पाच शिक्षकांना जिल्हास्तरावर, त्यानंतर राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेत चांगले अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणार आहे. तर खेड्यापाड्यातील शिक्षकांच्या संशोधन प्रवृत्तीला चालनाही मिळणार आहे.

Web Title: Bank of educational activities that are ready in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.