५० हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:40 PM2018-06-12T21:40:49+5:302018-06-12T21:40:49+5:30

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावली असताना जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये किमान ५० हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर पडून आहे. तूर आणि हरभरा ओला झाल्याने आता त्याला कोंबे फुटू लागली आहे.

50 thousand quintals of commodities open | ५० हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर

५० हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देकोंबे फुटली : हरभरा खरेदीची मुदत वाढली अन् बारदाना संपला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने सतत हजेरी लावली असताना जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये किमान ५० हजार क्विंटल शेतमाल उघड्यावर पडून आहे. तूर आणि हरभरा ओला झाल्याने आता त्याला कोंबे फुटू लागली आहे.
जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आत्तापर्यंत ३१ हजार क्विंटल तूर आणि २१ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मात्र गोदामात जागा नसल्याने हा शेतमाल बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर पडून आहे. हा शेतमाल गोदामात ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे शेतमाल ओला होत आहे. आधीचाच शेतमाल उघड्यावर असल्याने नव्याने खरेदीसाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर हरभरा खरेदी करायचा कसा, असा प्रश्न केंद्रांपुढे निर्माण झाला आहे. हमी केंद्रांवर खरेदीच्या वाढीव मुदतीचे पत्र धडकल्यानंतरही हरभऱ्याची खरेदीच सुरू झाली नाही. परिणामी आर्णी केंद्रावर उघड्यावर असलेल्या तुरी पाण्यात सापडल्या. आता त्यांना कोंबे फुटत आहे.
नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली. मात्र २९ मेपासून ती बंद करण्यात आली होती. आता या खरेदीला १३ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. तसे आदेश खरेदी केंद्रावर धडकले आहेत. याच सुमारास धान्य खरेदीचा बारदाना संपला. शनिवारी काही केंद्रांना मोजका बारदाना मिळाला. इतर केंद्रांवर हा बारदाना अद्याप पोहोचला नाही. शेतमाल ठेवण्यासाठी गोदामात जागाही शिल्लक नाही. यामुळे हरभरा खरेदीच्या मुदतवाढीची तारीख आल्यानंतरही जिल्ह्यातील केंद्रावर हरभºयाची पूर्ण खरेदी होईल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात आहे.
नऊ हजार शेतकरी हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात १५ मार्चपासून २९ मेपर्यंत केवळ तीन हजार ३९८ शेतकऱ्यांचा ४५ हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील १२ हमी केंद्रांवर १२ हजार ८९८ शेतकऱ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी तीन हजार ३९८ शेतकऱ्यांना हरभरा विकता आला. नऊ हजार शेतकरी अद्यापही विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्याकडे दोन लाख क्विंटल हरभरा बाकी आहे. हा हरभरा १३ जूनपर्यंत खरेदी करण्याच्या सूचना आहेत. दरम्यान, पाऊस आल्याने अनेक केंद्रांना खरेदी सुरू करता आली नाही. विक्रीस आलेला हरभरा ठेवण्यासाठी गोदामही शिल्लक नाही. यामुळे हरभरा उघड्यावर पडून आहे. त्याला आता कोंबे फुटू लागली आहे.

Web Title: 50 thousand quintals of commodities open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.