कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर; नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By संतोष वानखडे | Published: March 19, 2023 06:04 PM2023-03-19T18:04:29+5:302023-03-19T18:04:53+5:30

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर पडत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

 Due to the strike of the employees, the crop panchnama is getting delayed and the farmers are suffering losses | कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर; नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पीक पंचनामे लांबणीवर; नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

googlenewsNext

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर दुसरीकडे कर्मचारी संपामुळे नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेही लांबणीवर पडत आहेत. यामुळे शासनदरबारी अहवाल केव्हा  पोहचतील आणि मदत केव्हा मिळेल? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात १४ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर १७ मार्चला मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. १८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजतानंतर वाशिमसह जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह उच्चस्तरीय यंत्रणेने दिलेले आहेत. मात्र, सध्या जून्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक सहभागी झाले आहेत. पीक पंचनाम्याच्या प्रक्रियेत नेमके हेच कर्मचारी अग्रस्थानी असतात. जवळपास ९० टक्क्यापेक्षा अधिक संख्येने तलाठी, ग्रामसेवक, कृषी कर्मचारी संपात असल्याने, पंचनाम्यासाठी प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परिणामी, नुकसानग्रस्त भागातील पीक पंचनामेदेखील लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  
 
शेतात गारपिटीचा खच! 
१८ मार्चला मंगरूळपीर, मानोरा , कारंजा, वाशिम तालुक्यात अवकाळी पावसासह गारपिट झाली. मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतात गारपिटीचा खच पडून असल्याचे पाहावयास मिळाले. गारपिटीमुळे गहू, हरभऱ्यासह फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांचे  प्रचंड नुकसान झाले.


 

Web Title:  Due to the strike of the employees, the crop panchnama is getting delayed and the farmers are suffering losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.