वनक्षेत्रपालाच्या बचावासाठीच दस्तान डेपो छापा प्रकरणात हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:52 AM2018-08-18T01:52:49+5:302018-08-18T01:52:57+5:30

शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

vasai virar news | वनक्षेत्रपालाच्या बचावासाठीच दस्तान डेपो छापा प्रकरणात हस्तक्षेप

वनक्षेत्रपालाच्या बचावासाठीच दस्तान डेपो छापा प्रकरणात हस्तक्षेप

googlenewsNext

- वसंत भोईर
वाडा -  शहरातील एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा अवैध साठा सापडला असून एवढा मोठा साठा मिळाला असतानाही फक्त एका वनपालाला यात दोषी धरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र वनक्षेत्रपाल हेही त्यास तेवढेच जबाबदार असतानाही त्यांना वाचवण्यासाठी वरिष्ठांची चालढकल सुरू आहे. या कारवाईबाबत वन विभागाच्या दक्षता पथकानेच आक्षेप नोंदवून कारवाईच्या सूचना केल्या असतानाही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाडा मनोर या महामार्गावरील ठाणगेपाडा येथे असलेल्या एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकूडसाठा असल्याची खबर दक्षता पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी ११ जुलै २०१८ रोजी सायंकाळी डेपोवर धाड टाकली. या धाडीत लाकडाचा साठा जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी स्थानिक वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना कारवाई करण्याची सूचना केली. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी सापळे यांनी तो दास्तान डेपो सील करून २० जुलै २०१८ पासून कारवाई करण्यास सुरु वात केली. या कारवाईला विलंब झाल्याने सापळे यांच्याबाबत संशय व्यक्त केला असून विभागीय दक्षता पथकाचे विभागीय अधिकारी संतोष सस्ते यांनी जव्हारच्या उपवनसंरक्षकांना ३० जुलै रोजी पत्र काढून वनक्षेत्रपालाविरोधात आक्षेप नोंदवले आहे व कारवाई करण्याची सुचना केली आहे.
वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांना ११ जुलै रोजी डेपोची तपासणी करून अनियमितता असल्यास कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ही कारवाई २० जुलै रोजी केली आहे. प्रकरणी गांभीर्य लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल यांनी तत्काळ कार्यवाही करणे अपेक्षित होते. पंरतु गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आक्षेप पत्रात नोंदवला आहे. स्थळ पंचनाम्यानुसार वन उपजाचे मोजमाप केले असता जागेवर जवळपास १०१५ घनमीटर इतका अवैध वनउपजाचा साठा आढळून आला आहे. हा दास्तान डेपो वनपरिक्षेत्र अधिकारी वाडा यांचे कार्यालयापासून काही अंतरावर आहे.
डेपोवरील आवक जावक रजिस्टरची तपासणी केली असता एकदाही वनक्षेत्रपाल यांनी तपासणी केल्याची नोंद नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वनोपजाची वाहतूक होऊन डेपोवर साठा होत असताना वनक्षेत्रपाल यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. यावरून कर्तव्यात टाळाटाळ केल्याचे सिध्द होत असल्याचा आक्षेप पत्रात नोंदवण्यात आला आहे.

लाकडे कोणत्या जंगल अथवा मालकी क्षेत्रातील हे गुढच
'
वनगुन्हा दाखल होऊनही विनापरवाना माल कोणत्या जंगलातून अथवा मालकीतून आला याची चौकशी झालेली नसून ठोस कारवाई करण्याबाबत वनक्षेत्रपाल टाळाटाळ करीत असल्याचा आक्षेप दक्षता पथकाचे विभागीय वनअधिकारी संतोष सस्ते यांनी उपवनसंरक्षक जव्हार यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. वनक्षेत्रपाल यांचेवर वनसंरक्षणात्मक कामात हलगर्जीपणा केल्याचा आक्षेप पत्रात नोंदवले आहेत.

दरम्यान, वनक्षेत्रपालावर कारवाई करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. ही कारवाईच संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्या बाहेरील वनअधिकाºयाकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात यावा अशी मागणीही वक्षप्रेमी करीत आहेत.

Web Title: vasai virar news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.