पहिल्याच पावसात महावितरणची झाली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:41 PM2019-06-15T23:41:50+5:302019-06-15T23:42:04+5:30

झाडे व फांद्यामुळे वीज पुरवठा खंडित; उष्म्यामुळे नागरिक त्रस्त, बॅँक व ऑनलाईन व्यवहार ठप्प

The first rainy season was passed by MSEDCL | पहिल्याच पावसात महावितरणची झाली परीक्षा

पहिल्याच पावसात महावितरणची झाली परीक्षा

Next

विरार : मान्सून पूर्व तयारी म्हणून महावितरणतर्फे वृक्ष छाटणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसाच्या सरित मोठ-मोठी झाडं खांबावर व विद्युत तारांवर पडल्याने तालुक्यातील अनेक भागात विजेचा लंपडाव सुरु झाला आहे.

पावसाळा पूर्वकाळामध्ये महावितरणतर्फे सर्व कामे पूर्ण करून घेण्यात आली होती. फक्त पाणी लागल्यानेच नाही तर झाडांच्या फांद्या पडल्याने देखील विद्युत यंत्रणा खंडीत होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन महावितरणने उंच व विजेच्या तारांना लागणारी झाडांची छाटणी केली. तसेच ज्या झाडांमुळे वादळ वारा आल्यावर जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान होऊ शकते अशा झाडांची देखील छाटणी केली. परंतु, महावितरणची वृक्ष छाटणी प्रक्रिया पहिल्याच पावसात फसली आहे.

वसई विरार शहरात पावसासोबतच वादळी वाऱ्यांनीदेखील हजेरी लावली तर यावेळी मोठ मोठी झाडं विजेच्या तारांवर व विद्युत यंत्रणांवर पडली. सोमवारी १२ तास, मंगळवारी १५ तास तर त्यानंतर सतत वीज पुरवठा खंडित होत होता. वृक्षांची छाटणी करून देखील झाडांमुळे विद्युत यंत्रणा बांधित झाली. विरार पूर्वेला अनेक ठिकाणी फांद्या, ट्रान्सफॉर्मर पडले व वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांना या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महावितरण विभागाने संपूर्ण तयारी केली होती. मात्र, महावितरणच्या तयारीला यश आलेले नाही.

‘‘आमच्या परिसरात झाड पडलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडून मदत न मिळाल्यामुळे आम्हीच ते झाड उचलून बाजूला केले असे भारती जोग यांचे म्हणणे आहे. अर्नाळा, विराट नगर, मानवेल पाडा, यशवंत नगर, जकात नका इत्यादी ठिकाणी झाडं पडून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांना उष्म्याचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी सोसायटीमध्ये देखील झाडं पडली होती.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना उष्म्यामध्ये दिवस काढावे लागत आहेत. मात्र, पडलेली झाडे उचलून वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्याचे काम देखील महावितरण लवकर करत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

सोमवार, मंगळवारी झाडांमुळे इतके नुकसान झाल्याने व वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी वृक्ष छाटणीसाठी महापालिकेला पाचारण केले. महावितरण विभागाने व्यवस्थित तपासणी न करता वृक्ष छाटणीचे काम केले असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वीज यंत्रणा बाधित झाल्याची टिका होत आहे.

वादळ वारा होता त्यामुळे झाडं पडली. महावितरणा विभागाला जी झाडं धोकादायक वाटली त्यांची छाटणी करण्यात आली आहे. नागरिकांना पुन्हा त्रास होणार नाही यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत.’’
- ए. एस. मिर्झा, महावितरण विभाग अधिकारी

Web Title: The first rainy season was passed by MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.