Three Health Centers by 11.80 crores | ११.८० कोटींतून साकारतेय तीन आरोग्य केंद्र

ठळक मुद्देकामांची पाहणी : गुणवत्ता राखण्याच्या सूचना

आॅनलाईन लोकमत
वर्धा : ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली. याद्वारे जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. ११ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून हे तीनही आरोग्य केंद्र साकारत आहे.
शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत शासकीय रुग्णसेवा भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातूनच जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला. यातील वायगाव (नि.) येथे कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र साकारत आहे. यासाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तळेगाव (टा.) आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ६१ लाख रुपये तर पोहणा येथील आरोग्य केंद्रासाठी ४ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट यांच्या पुढाकाराने ही कामे प्रगतिपथावर आहेत.
जि.प. बांधकाम विभागाद्वारे केले जात असलेल्या या बांधकामावर सभापतींचे लक्ष आहे. शिवाय संबंधित अभियंत्यांनाही कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देत दर्जेदार बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ५ मार्च रोजी जि.प. सभापती जयश्री गफाट, शाखा अभियंता डोळे, आरोग्य विस्तार अधिकारी राठोड यांनी बांधकामांना भेटी देत पाहणी केली. याप्रसंगी कामे वेळेत पूर्ण करून आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेत रूजू करावे, अशा सूचनाही दिल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम वेळेत पूर्ण करून ते रुग्णांच्या सेवेत रूजू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कामांची वेळोवेळी पाहणी केली जात असून अभियंत्यांना बांधकामाची गुणवत्ता तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
- जयश्री गफाट, सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, जि.प. वर्धा.


Web Title: Three Health Centers by 11.80 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.