Life of two families survived by the school child's action in Wardha | शाब्बास रे पठ्ठे ! वर्ध्यात शाळकरी मुलाच्या प्रसंगावधानाने वाचले दोन कुटुंबांचे प्राण; भीषण जिवीतहानी टळली

ठळक मुद्देपहाटे क्लासला जाताना दिसला घरातून निघताना धूरघरात ठेवलेला कापूस व सागवान जळाले

आॅनलाईन लोकमत
वर्धा: ट्यूशन क्लासला जायचे म्हणून निघालेल्या तेजसला एका घरातून धूर व आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दिसताच त्याने प्रसंगावधान राखून तात्काळ त्या घरातील सदस्यांना जागे केले व गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. ही घटना गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास पवनार येथे घडली.ली.
पवनार शहरात राहणाऱ्या हेमराज हिवरे व दौलत हिवरे हे दोन भाऊ शेजारीशेजारी राहतात. त्यांच्या घरातून निघत असलेला धूर व आगीच्या ज्वाळा पाहून त्यांच्या घरासमोरून पहाटेच ट्यूशन क्लासला निघालेला १५ वर्षांचा दहाव्या वर्गात शिकणारा तेजस मुकुंद करमरकर हा मुलगा क्षणभरासाठी स्तब्धच झाला. त्याने न घाबरता सर्वात प्रथम घराचे दार ठोठावून घरच्यांना जागे केले व बाहेर काढले. तोपर्यंत आगीने दोन्ही घरांना विळखा घातला होता. घरच्या मंडळींनी तात्काळ जवळपास मदतीसाठी धाव घेतली. गावकऱ्यांनीही तात्काळ जमेल ते साधन घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला. फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत त्या परिसरातील युवा शक्तीनेच अर्धी अधिक आग विझवली होती.
या भीषण आगीत घरात ठेवलेल्या सुमारे ७० क्विंटल कापसापैकी बराचसा कापूस, सागवानाचे फाटे व घरातील सामान जळून खाक झाले. आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र एका सजग मुलाच्या प्रसंगावधानाने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव हिवरे कुटुंबियांनी घेतला. 


Web Title: Life of two families survived by the school child's action in Wardha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.