अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला

By महेश सायखेडे | Published: March 29, 2023 06:33 PM2023-03-29T18:33:22+5:302023-03-29T18:34:38+5:30

वर्धा येथील जिल्हा न्यायालयाचा निकाल

Harsh imprisonment and fine on accuse for sexually abused minor girl | अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्यास सश्रम कारावास, दंडही ठोठावला

googlenewsNext

वर्धा : अल्पवयीन मुलींसोबत अतिप्रसंग करीत त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवून त्यास दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. स्नेहल ऊर्फ छोटू पुरुषोत्तम मून (रा. सिंदी) (मेघे) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून, हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही.टी. सूर्यवंशी यांनी दिला.

आरोपी स्नेहल ऊर्फ छोटू पुरुषोत्तम मून याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम कलम ४ सह कलम १८ अन्वये दहा वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ४४९ अन्वये पाच वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३६३ अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३६६ (अ) अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३४२ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आठ दिवसांचा कारावास. भादंविच्या कलम ५०६ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर पीडितेला नुकसानभरपाई म्हणून दंड रकमेतून दहा हजार रुपये देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.

पीडितेचा भाऊ होता प्रत्यक्ष साक्षीदार

पीडिता तसेच तिचा लहान भाऊ आणि पीडितेची मैत्रीण घराच्या आवारात खेळत होते. दरम्यान, आरोपीने तेथे येत पीडिता व तिच्या मैत्रिणीला पीडितेच्या घरात नेत त्यांचे लैंगिक शोषण केले. ही बाब पीडितेच्या लहान भावाने खिडकीतून डोकावून बघितली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घटनेची माहिती कुणाला सांगितल्यास पीडितेसह तिच्या मैत्रिणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपी सीसीटीव्हीत झाला होता कैद

पीडितेच्या आईला घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी तपासादरम्यान घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासात ते ताब्यात घेतले. याच सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी हा पीडिता व तिच्या मैत्रिणीला खोलीत नेत असताना कैद झाला होता. हे चित्रीकरण न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आले होते.

प्रकरण साक्ष-पुराव्यावर असताना फिर्यादीचा झाला मृत्यू

या प्रकरणी पीडितेच्या आईने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नाेंदविली. अत्याचाराचे हे प्रकरण साक्ष-पुराव्यावर असताना पीडितेच्या आईचे निधन झाले. त्यामुळे या प्रकरणी फिर्यादीची साक्ष नोंदविण्यात आली नाही. परंतु, पीडित, तिची मैत्रीण व प्रत्यक्षदर्शी आदींची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.

पीडितेच्या मैत्रिणीवर अत्याचार; ४ एप्रिलला होणार युक्तिवाद

या प्रकरणातील पीडितेच्या मैत्रिणीवरही आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचे पुढे आल्याने तिचा वेगळा खटला न्यायालयात युक्तिवादासाठी ४ एप्रिल २०२३ ला ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढे काय होते याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महिला अधिकाऱ्यांनी केला तपास

संबंधित प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रीती आडे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून राजेश थुल यांनी काम पाहिले.

१४ साक्षीदारांची तपासली साक्ष

या प्रकरणी एकूण १४ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. प्रथम नऊ साक्षीदारांची साक्ष जिल्हा शासकीय अभियोक्ता गिरीश व्ही. तकवाले यांनी तपासले, तर नंतरच्या पाच साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी तपासून युक्तिवाद केला. दोन्ही बाजू व पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीला बुधवारी (दि. १९) शिक्षा ठोठावली.

Web Title: Harsh imprisonment and fine on accuse for sexually abused minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.