शेत, धुऱ्यावरील आगीने वृक्षांना धोका

By admin | Published: April 18, 2017 01:20 AM2017-04-18T01:20:56+5:302017-04-18T01:20:56+5:30

खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता.

Farm, dust, fire, danger to trees | शेत, धुऱ्यावरील आगीने वृक्षांना धोका

शेत, धुऱ्यावरील आगीने वृक्षांना धोका

Next

खत करण्याकडे कानाडोळा : शेतकऱ्यांच्या मानसिकतेत बदल गरजेचा
वर्धा : खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या काढणीनंतर निघणाऱ्या तुराट्या, पऱ्हाट्या, तुरीचे खुंटले यासह अन्य पिकांच्या काडी कचऱ्याचा पूर्वी इंधन म्हणून वापर केला जात होता. यासाठी प्रसंगी मजूर लावून शेतातील काडीकचरा गोळा केला जात होता. त्याचे ढिग लावून ते एकाच वेळी बैलबंडीतून घरी नेले जात होते वा शेतातील गोठ्यांत ठेवले जात होते; पण हल्ली हा काडीकचरा शेतातच जाळण्याचे फॅड आले आहे. शिवाय धुरेही पेटविले जात आहेत. परिणामी, पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणाऱ्या वृक्षांची मोठी हानी होत आहे. याकडे लक्ष देत गुन्हे दाखल करण्याऐवजी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे झाले आहे.
शनिवारी व रविवारी शेतकऱ्यांनी धुरे पेटविल्याने शेतातील गोठ्यांची राखरांगोळी झाली. यात अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीसाहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने पूढील हंगामासाठी नव्याने साहित्याची जुळवाजुळव करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे प्रकार नित्याचे झाल्याने अनेक ठिकाणी गोठ्यांना आग लागले, झाडे जळण्याच्या घटना घडत आहेत. शेजारचे शेतकरी असे प्रकार घडल्यास तक्रारी करीत असून मग, दोषी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचे रविवारच्या प्रकरणावरून दिसून येते. यामुळे आपसातील वाद वाढीस लागत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे. शेतातून निघणाऱ्या काडीकचऱ्यापासून खत निर्मिती करणे, त्याचा सरपण म्हणून वापर करणे, कोळसा निर्माण करणे आदी प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणेच गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

गॅस सिलिंडरमुळे इंधन म्हणून वापरही कमी
सेवाग्राम : इंधन म्हणून पऱ्हाट्या, तुऱ्हाट्या आणि तुरीच्या खुुंटल्यांचा उपयोग केला जात होता; पण नव्या व्यवस्था व सुविधांमुळे ते शेतातच जाळण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर आला आहे. याचा परिणाम लगतच्या झाडांवर होऊ लागला असून लाखमोलाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत.
भारतात कृषी व्यवस्था प्रमुख साधन व माध्यम झाले. काळाच्या ओघात परिवर्तन व कृषी संशोधन होऊन क्रांती घडू लागली. याचा परिणाम मानवाच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. शेतातील साधन साहित्य जीवनाचा आधार आणि दैनिक गरजा भागविणारा होता. यात इंधन एक साधन होते. शेतातील बाभूळ पऱ्हाट्या, तुराट्या व तुराट्यांचे खुंटले याचा सरपण म्हणून सर्वाधिक उपयोग केला जात होता. घरी, गावात शेतात ठेवण्यासाठी जागा होत्या. उलंगवाडी होताच इंधनाची व्यवस्था शेतकरी व शेतमजूर लावत होते. याच इंधनावर घरातील पाणी गरम करणे ते स्वयंपाक होत होते. आता गॅस सिलिंडरने इंधनाची जागा घेतली आहे. यामुळे तुराट्या, पऱ्हाट्यांच्या मागणीत घट झाली आहे. उपडायला व न्यायला कुणीच तयार होत नसल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने ढिगारे करून ते शेतातच पेटवित आहे. यातून साधन साहित्याचे नुकसान होत आहे. शेतकरी शेतमजुरांचा सिलिंडरमुळे खर्च मात्र वाढला.(वार्ताहर)

खरडे व प्लायवूड निर्मितीसाठी उपयोग
मध्यंतरी शेतातील तुराट्या, पऱ्हाट्या व तुरीच्या खुंटल्यांचा वापर खरडे व प्लायवूड निर्मितीकरिता करण्याचा प्रयत्न झाला. यात ऊसाच्या पाल्याचाही समावेश होता. या प्रयोगाचे नेमके काय झाले, हे पूढे आले नाही. हा प्रयोग यशस्वी ठरून शेतकऱ्यांपयृंत पोहोचला असता तर तुराट्या, पऱ्हाट्यांची किंमतही वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता यावर कुठलेही संशोधन होत नसल्याने हा काडीकचरा जाळला जात आहे. शिवाय यातून होणारे प्रदूषण टाळता आले असते. सध्या पऱ्हाट्या, तुराट्या व खुंटल्यांचा उपयोगच होत नसल्याने नाईलाजास्तव ते पेटवावे लागते आहे. परिणामी, दररोजच शेतात, धुऱ्यांवर काडीकचरा पेटविला जात असल्याने परिसर धगधगताना दिसतो.

Web Title: Farm, dust, fire, danger to trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.