कागदात बांधली सोन्याची अंगठी अन् कागद उघडताच निघाले दगड, वायगाव-वर्धा रस्त्यावरील घटना

By चैतन्य जोशी | Published: March 30, 2023 06:07 PM2023-03-30T18:07:54+5:302023-03-30T18:09:05+5:30

तोतया पोलिसांकडून फसवणूक

fake police looted a man on waygaon-wardha route | कागदात बांधली सोन्याची अंगठी अन् कागद उघडताच निघाले दगड, वायगाव-वर्धा रस्त्यावरील घटना

कागदात बांधली सोन्याची अंगठी अन् कागद उघडताच निघाले दगड, वायगाव-वर्धा रस्त्यावरील घटना

googlenewsNext

वर्धा : पुढे लूटमार होऊ शकते... बोटांतील सोन्याची अंगठी काढून ठेवा, आम्ही पोलिस आहोत, असे म्हणत व्यक्तीच्या बोटातील सोन्याची अंगठी एका कागदात बांधून त्याच्या बॅगमध्ये ठेवली. व्यक्तीने वर्धा येथे पाेहोचल्यानंतर बॅगमधील कागदाची पुडी उघडून पाहिली असता, त्यात सोन्याच्या अंगठीऐवजी चक्क दोन दगड निघाले. या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने याबाबतची तक्रार सावंगी पोलिस ठाण्यात दाखल केली. सावंगी पोलिसांनी या प्रकरणी तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली असून, आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार, गजानन वामन मानकर (५१, रा. वरुड) हे दुचाकीने वायगाव ते वर्धा रस्त्याने जात असताना सेलुकाटे परिसरात मागाहून एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी एकाने केली. गजानन यांनी कशाला थांबविले, असे विचारले असता त्यांनी ‘तुमच्यासोबत समोर लूटमार होऊ शकते. तुम्ही बोटातील सोन्याची अंगठी काढून बॅगमध्ये ठेवा,’ असे म्हटले.

गजानन यांनी हातातील ६ ग्रॅम वजनाची अंगठी काढून आरोपींच्या हातात दिली. तोतया पोलिसांनी एका कागदात अंगठी बांधून ती पुडी गजानन यांना परत केली. गजानन यांनी कागदाची पुडी बॅगमध्ये ठेवली व तेथून सरळ वर्धा येथील एचडीएफसी बॅंकेत आले. त्यांनी बॅंकेत पोहोचताच बॅगमधील कागदाची पुडी उघडून पाहिली असता, त्या पुडीत सोन्याच्या अंगठीऐवजी दोन दगड होते. पोलिस असल्याचे सांगून आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात येताच गजानन यांनी थेट सावंगी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली.

पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी लगेच याची दखल घेत या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना केल्याची माहिती दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Web Title: fake police looted a man on waygaon-wardha route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.