'तुतारी'च्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी कराळे मास्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 10:52 PM2024-03-29T22:52:13+5:302024-03-29T23:00:14+5:30

कराळे मास्तर आता वर्ध्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे दिसून येते.

Before the announcement of Sharad Pawar's list, wardha Karale master 'Tutari' in NCP | 'तुतारी'च्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी कराळे मास्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

'तुतारी'च्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी कराळे मास्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

मुंबई - आपल्या हटके विदर्भीय स्टाईलने शिकवण्याच्या पद्धतीमुळे फेमस झालेले खासगी क्लासेसचे कराळे मास्तर यांनी काही दिवासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी कराळे मास्तरांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. आता, कराळे मास्तरांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे, कराळे मास्तर आता वर्ध्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे दिसून येते.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आपण भाजपाच्या विरोधात आवाज उठवणार असून महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळेल, असा विश्वासही कराळे मास्तर यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या माध्यमातून कराळे मास्तर विदर्भातील वर्धा येथे ट्यूशन घेतात. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याने या कालावधीत त्यांची शिकवण्याची हटके स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हापासून ते खदखदफेम कराळे मास्तर म्हणून चर्चेतला चेहरा राहिले आहेत. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी उद्या ३० मार्च रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी कराळे मास्तरांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने वर्ध्यातून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार साहेब व जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा प्रवेश घेण्यात आला आहे. केंद्रात सत्तेत असलेलं मोदी सरकार पाडण्यासाठी आपण एकजुटीने लढले पाहिजे. या भूमिकेतून मी हा निर्णय घेतल्याचेही कराळे मास्तरांनी पक्षप्रवेशानंतर म्हटले. तसेच, पुढील काही दिवसांत मी सोशल मीडियातून माझी भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

महायुती सरकारविरुद्ध उठवला आवाज

खदखद... स्टाईल फेमस कराळे मास्तर यांनी अनेकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यमान शिंदे सरकारवर आणि केंद्रातील मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. शेतकरी व तरुण वर्गांच्या समस्यांही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी कराळे मास्तर मातोश्रीवर आले होते. मात्र, मातोश्रीवर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे, उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने मास्तरांनी नाराजी व्यक्त केली होती. आता, ऐन लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर कराळे मास्तरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

वर्ध्यातून अमर काळेंना उमेदवारी?

निवडणूक अधिसूचना निघण्यापूर्वीच भाजपने उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर ‘वंचित’नेही उमेदवाराची घोषणा केली. मात्र, महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. वर्ध्याची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. मात्र, उमेदवार ठरविताना पक्षाच्या नाकीनऊ आले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना ‘तुतारी’वर लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे काळे यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश घेतला आहे. 

Web Title: Before the announcement of Sharad Pawar's list, wardha Karale master 'Tutari' in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.