आईपासून दुरावलेल्या चिमुकल्याची अखेर वीस दिवसांनी झाली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 12:56 PM2022-04-02T12:56:44+5:302022-04-02T13:12:46+5:30

कोमल ही २० दिवसांपासून तिच्या बाळाच्या भेटीच्या प्रतीक्षेत होती. पतीने वाद करून तिला घराबाहेर हकलून दिले व बाळाला घेऊन तो दुसरीकडे राहण्यास गेला. तो कुठे गेला याचा तिला थांगपत्ता नव्हता. ती बाळाचा अन् पतीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकली.

a child, who was separated from her mother over disputes between parents finally met after twenty days | आईपासून दुरावलेल्या चिमुकल्याची अखेर वीस दिवसांनी झाली भेट

आईपासून दुरावलेल्या चिमुकल्याची अखेर वीस दिवसांनी झाली भेट

Next
ठळक मुद्देचाईल्ड लाईनचा पुढाकार बालकल्याण समितीने केली मदत

वर्धा : घरगुती कलहातून झालेल्या वादात आई आणि चिमुकले बाळ एकमेकांपासून दुरावले... यातूनच तब्बल २० दिवस बाळ आईपासून दूर राहिले. अखेर आईच्या दु:खाला पाहून सामाजिक कार्यकर्ता नम्रता भोंगाडे यांनी चाईल्ड लाईन व बाल संगोपन समितीकडे धाव घेत त्या मातेची तिच्या चिमुकल्या बाळाशी भेट घडवून आणली. अन् पाणावलेल्या डोळ्यांनी आईने बाळाला कुशीत घेत मिठी मारली.

कोमल अनुप पाटील (रा. बल्लारशा) ही मागील २० दिवसांपासून तिच्या बाळाच्या भेटीच्या प्रतीक्षेत होती. पतीने वाद करून तिला घराबाहेर हकलून दिले होते. बाळाला घेऊन तो दुसरीकडे राहण्यास गेला होता. तिच्याकडे पैसे, मोबाईल काहीच नव्हते. तरी ती बाळाचा अन् पतीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकली. अखेर हताश होऊन ती वर्ध्याला माहेरी आली आणि दुसऱ्याच दिवशी घरच्यांना घेत पुन्हा तिच्या बाळाला शोधण्यासाठी बल्लारशा येथे गेली.

बाळ कुठेही दिसत नसल्याने अखेर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण पती कुठे राहायला गेला याचा थांगपत्ता नव्हता. अखेर फोनवरुन संपर्क करुन पतीला पोलीस ठाण्यात बोलाविले. बाळाला घेऊन येण्याऐवजी तो वकिलाला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. आणि बाळ कोर्टातूनच देईल असे म्हणून पोलीस ठाण्यातून निघून गेला.

पोलिसांनीही कोर्टातून बाळाची कस्टडी मिळवा, असे सांगितल्याने विवाहिता निराश होऊन वर्ध्याला परत आली. चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांच्या मदतीने बालकल्याण समितीकडे प्रकरण जाताच अखेर आईची तिच्या बाळाशी भेट झाली.

...अन् सल्ला ठरला मोलाचा

विवाहिता तिच्या आईला घेऊन सामाजिक कार्यकर्ता नम्रता भोंगाडे यांच्याकडे गेल्या. त्यांनी चाईल्ड लाईनचे आशिष मोडक यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मोडक यांनी आठ ते दहा दिवसांत बाळ मिळेल, असे आश्वासन दिले. सल्ला ऐकून चाईल्ड लाईनची मदत घेतली. शीतल घोडेस्वार यांनी प्रकरण बालकल्याण समितीकडे दाखल केले. तेथील अलका भूगल, अॅड. नीना वन्नलवार, रेखा भोयर, अॅड. जंगमवार यांच्या मदतीमुळे योग्य तो निकाल देऊन अखेर बाळ आईच्या स्वाधीन केले.

चाईल्ड लाईनची मदत घेण्याचे आवाहन

चाईल्ड लाईन व बालसंगोपन समितीच्या कार्याची माहिती अनेकांना नसते. अनेक वर्षे न्यायालयात प्रकरण प्रलंबित असते. अशा प्रकरणात बालमनावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकरणात महिलांनी चाईल्ड लाईन व बाल संगोपन समितीची मदत घ्यावी, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नम्रता भोंगाडे यांनी केले.

Web Title: a child, who was separated from her mother over disputes between parents finally met after twenty days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.