मध्यप्रदेशातील माठ उस्मानाबादेत ! पांढऱ्या माठांना मिळतेय अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 07:46 PM2019-03-15T19:46:38+5:302019-03-15T19:49:06+5:30

मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

Madhya Pradesh's earthen pots are in Osmanabad! | मध्यप्रदेशातील माठ उस्मानाबादेत ! पांढऱ्या माठांना मिळतेय अधिक पसंती

मध्यप्रदेशातील माठ उस्मानाबादेत ! पांढऱ्या माठांना मिळतेय अधिक पसंती

googlenewsNext

उस्मानाबाद : दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल माठ खरेदीकडे वाढला आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिकांसोबतच अहमदाबाद, मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

उन्हाळ्याची चाहूल लागताच स्थानिक विक्रेते बाजरपेठेत लहान-मोठे माठ विक्रीसाठी घेऊन येतात. यंदा स्थानिक विक्रेत्यांसोबतच मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. पांढऱ्या मातीपासून तयार केलेले व सुबक नक्षीकाम असलेल्या या माठांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. स्थानिक कारागिरांनी काळ्या मातीपासून बनविलेल्या माठांनाही बऱ्यापैकी मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठांच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्यात आहे. १४० रूपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत किंमती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे पांढऱ्या व लाल मातीपासून बनविलेल्या माठांच्या किंमती जास्त आहेत. अडीचशे ते तीनशे रूपयांपासून माठाची किंमत सुरू होते. विक्रेत्यांकडेन सातशे रूपयांपर्यंत माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माठांच्या विक्रीत घट...
जारच्या पाण्याचा मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण थंड पाण्यासाठी माठ न घेता जार घेणेच पसंत करीत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत माठ विक्री बऱ्यापैकी घटली आहे. त्यामुळे अनेक कारागीर या व्यवसायातून बाहेर पडल्याचे विक्रेते महादेव कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

रांजण ‘पाणपोई’पुरताच...
पूर्वी पाणी साठविण्यासाठी रांजणाचा उपायोग केला जात होता. परंतु, रांजणाची जागा आता प्लास्टिकच्या टाक्यांनी घेतली आहे. शहरांसोबतच हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोंचले आहे. त्यामुळे मातीचे रांजण आता केवळ ‘पाणपोई’पुरतेच मर्यादित राहिले आहेत, असे विक्रते बोलून दाखवितात. 

सुरई होतये दुर्मिळ...
 तीन व्यक्तीची एका वेळेची तहान शमविण्याइतपत पाणी मावणारी सुरई सध्या दुर्मिळ होताना दिसत आहे. बाजारातही क्वचित विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षात तर सुरईचा वापर बंद झाल्यात जमा आहे, असे विक्रेते सांगतात.

Web Title: Madhya Pradesh's earthen pots are in Osmanabad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.