ठळक मुद्देसंपूर्ण शेतमाल सरकार खरेदी करु शकत नाही, असे सांगून त्यासाठी एक नवे मॉडेल अवलंबिणार यापूर्वी रस्तेच चांगले बनविले नसल्याने खड्डे पडत आहेत़ खड्डे पडणे हे काही नवीन बाब नाही़

उस्मानाबाद : गेल्या तीन वर्षांत शेतमालाचे उत्पादन प्रचंड वाढले आहे़ सरकार काही व्यापारी नाही जो इतका शेतमाल खरेदी करु शकेल़ मात्र, चांगला भाव मिळावा यासाठी मोठ्या कंपन्यांना खरेदीसाठी आंमत्रित करुन त्यांच्या मार्फत चांगला भाव मिळवून देण्याचे मॉडेल लवकरच अवलंबिण्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी उस्मानाबादेत दिले़

खड्डेमुक्तीच्या आढावा बैठकीसाठी महसूलमंत्री गुरुवारी सकाळी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी चांगल्या पावसामुळे व गाळ उपसल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होवून शेतमालाचे उत्पादन प्रचंड वाढल्याचे सांगितले़ हा संपूर्ण शेतमाल सरकार खरेदी करु शकत नाही, असे सांगून त्यासाठी एक नवे मॉडेल अवलंबिणार असल्याचेही ते म्हणाले़ रस्त्यांबाबत बोलताना पाटील म्हणाले, यापूर्वी रस्तेच चांगले बनविले नसल्याने खड्डे पडत आहेत़ खड्डे पडणे हे काही नवीन बाब नाही़ मात्र, आता केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात २२ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, साडेसहा हजार किलोमीटरचे सहापदरी रस्ते भारतमाला योजनेंतर्गत व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून काही असे जवळपास ३८ हजार किलोमीटरचे पक्के रस्ते येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहेत़ या रस्त्यांवर पुढची दहा-बारा वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत, असा दर्जा राखण्यात येणार आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़

असे असेल शेतमाल खरेदीचे मॉडेल़़
कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्यांशी सरकार शेतमाल खरेदीसंदर्भात करार करेल़ त्यांना बाजारात उतरुन चांगल्या दराने शेतमाल खरेदी करावयास लावेल़ या शेतमालातून ते  जे उत्पादन तयार करतील त्यातून त्यांना फायदा झाला तर तो त्यांचा़ जर नुकसान होत असेल तर त्यांची बॅलन्सशीट पाहून सरकार त्यांना मदतीचा विचार करेल़ लवकरच्या या मॉडेलचा अवलंब करण्याचा प्रयत्न सरकार करेल, असे संकेत महसूलमंत्र्यांनी दिले.