वक्तृत्व स्पर्धेत सुजाता चव्हाण यांना प्रथम पारितोषिक; साडेचार वर्षीय आर्वीच्या वक्तृत्वाने जिंकली रसिकांची मने 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 26, 2022 05:01 PM2022-09-26T17:01:24+5:302022-09-26T17:03:32+5:30

वक्तृत्व स्पर्धेत अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धक निवडले गेले होते. त्यांनी ऑनलाइन शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज , किल्ले रायगड, भारत माझा देश आहे आणि अशी ही ज्ञानेश्वरी या विषयांवर प्रभावी भाषणे केली.

Sujata Chavan first prize in elocution competition; Four and a half year old Arvi's eloquence won the hearts of fans | वक्तृत्व स्पर्धेत सुजाता चव्हाण यांना प्रथम पारितोषिक; साडेचार वर्षीय आर्वीच्या वक्तृत्वाने जिंकली रसिकांची मने 

वक्तृत्व स्पर्धेत सुजाता चव्हाण यांना प्रथम पारितोषिक; साडेचार वर्षीय आर्वीच्या वक्तृत्वाने जिंकली रसिकांची मने 

Next


ठाणे: अभिनय कट्ट्यावर वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सुजाता चव्हाण यांनी पटकावला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते आर्वी चोरगे या साडेचार वर्षाच्या मुलीचे वक्तृत्व. तिने शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या तावडीतून सुटका या विषयावरील भाषण सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

वक्तृत्व स्पर्धेत अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धक निवडले गेले होते. त्यांनी ऑनलाइन शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज , किल्ले रायगड, भारत माझा देश आहे आणि अशी ही ज्ञानेश्वरी या विषयांवर प्रभावी भाषणे केली. ही स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली होती. सर्वप्रथम सोनाली हिंगे यांनी आणि त्यानंतर आयुष राऊत या मुलाने ऑनलाइन शिक्षण या विषयावर, तर आयुष धोत्रेने छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर भाषण केले. कीर्ती खांडे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणातील एक प्रसंग उपस्थित श्रोत्यांसमोर ओघवत्या पद्धतीने सादर केला. 

सुजाता चव्हाण आणि मंजुषा पाटील यांनी अतिशय ओघवत्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. स्मिता तोरस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे असामान्य कर्तृत्व हा विषय या स्पर्धेसाठी निवडला होता. विहान चव्हाण, मोहन पानसरे आणि मुक्ता भानुशाली यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरील भाषण अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. स्पर्धेत द्वितीय पारितोषिक विहान चव्हाण याने तर तृतीय पुरस्कार कीर्ती खांडे आणि मोहनपानसरे यांनी विभागून देण्यात आले. सोनाली हिंगे यांना विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. 

स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध साहित्यिक र. म. शेजवलकर आणि अभिनेते दिग्दर्शक राजन मयेकर यांनी परीक्षण केले. त्याचबरोबर उपस्थित प्रेक्षकांसोबत निकाल जाहीर होण्यापूर्वी सुसंवाद ही साधला. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असून भविष्यात चांगले वक्ते घडवण्याच्या दृष्टीने व समाजातील विविध विषयांचा अभ्यास व्हावा याकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन किरण नाकती यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेले होते असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्विजय चव्हाण यांनी केले.

 

Web Title: Sujata Chavan first prize in elocution competition; Four and a half year old Arvi's eloquence won the hearts of fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे