मनसेची लोकसभा निवडणुकीची भूमिका ९ मार्च रोजी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:43 AM2019-03-06T00:43:52+5:302019-03-06T00:44:01+5:30

येत्या ९ मार्च रोजी मुंबईत मनसेचा १३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत.

MNS to play Lok Sabha elections on March 9 | मनसेची लोकसभा निवडणुकीची भूमिका ९ मार्च रोजी ठरणार

मनसेची लोकसभा निवडणुकीची भूमिका ९ मार्च रोजी ठरणार

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे 
ठाणे : येत्या ९ मार्च रोजी मुंबईत मनसेचा १३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत. त्याच दिवशी ठाण्यातून ही निवडणूक कोणता उमेदवार लढणार हेदेखील स्पष्ट होणार आहे. परंतु, सध्या या निवडणुकीसाठी मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे जिल्हाअध्यक्ष संदीप पाचंगे व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे या चार जणांची नावे चर्चेत आहे. मात्र, पक्ष याबाबत कोणता निर्णय घेईल, याची मनसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने तयारीला लागला आहे. यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. यापूर्वी राज यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत मनसे स्वतंत्र निवडणूक लढविणार? आघाडीसोबत जाणार की ती लढविणारच नाही? याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट न झाल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
एकीकडे पक्षाच्या भूमिकेबाबत मनसैनिकांत गोंधळाचे वातावरण असले तरी दुसरीकडे याच मनसैनिकांमधून चार नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढविणार असल्याचे जाहीर केल्यास तीसाठी ठाणे लोकसभा मतदार संघातून पानसे हेच आमचे उमेदवार असतील अशी भूमिका जिल्हा अध्यक्ष जाधव यांनी स्पष्ट केली आहे. तर त्यांच्या या भूमिकेला काळे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. या आधी ही निवडणूक लढविणाऱ्यांनीच ती लढवावी असे मत त्यांनी लोकमतशी बोलताना नोंदविले. दुसरीकडे जाधव यांच्या चाहत्यांनी ही निवडणूक त्यांनीच लढवावी असा जोर धरला आहे. परंतु, निवडणुकीत उतरण्याची त्यांनी तयारी दाखवलेली नाही.
काळे यांच्याबरोबर पक्षस्थापनेपासून पक्षात कार्यरत असणाऱ्या पाचंगे यांचे नावही मनसैनिकांच्या मुखी आहे. त्यामुळे कोणता चेहरा समोर येईल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. २०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला शुन्यावर यावे लागल्याने पक्षाने विविध आंदोलने हाती घेऊन पक्षाला नवी उभारी दिली. त्यामुळे या निवडणुकीत उतरल्यावर मनसे आपली किती ताकद लावते, याबाबत ठाणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे.

Web Title: MNS to play Lok Sabha elections on March 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.