वाजपेयींना सरस्वतीचा वरदहस्त, राम कस्तुरे यांनी जागवल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:23 AM2018-08-18T02:23:46+5:302018-08-18T02:24:10+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काही निवडक कवितांना सुलेखनाचा साज चढवण्याचे काम शहरातील प्रख्यात सुलेखनकार राम कस्तुरे यांनी केले.

Memories of Vajpayee news | वाजपेयींना सरस्वतीचा वरदहस्त, राम कस्तुरे यांनी जागवल्या आठवणी

वाजपेयींना सरस्वतीचा वरदहस्त, राम कस्तुरे यांनी जागवल्या आठवणी

Next

- प्रशांत माने
डोंबिवली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काही निवडक कवितांना सुलेखनाचा साज चढवण्याचे काम शहरातील प्रख्यात सुलेखनकार राम कस्तुरे यांनी केले. काही वर्षांपूर्वी त्यांनी सुलेखन केलेला हा काव्यसंग्रह वाजपेयी यांना सर्मपित केला होता. ‘माझ्या कविता ज्यांना समजत नसतील त्यांनी माझ्या काव्यांना सुलेखनाचा साज चढविणारे राम कस्तुरे यांचे अक्षरचित्र जरूर पाहावे,’ अशी शाबासकीची थाप वाजेपयी यांनी त्यावेळी दिली होती. अटलजींच्या निधनानंतर कस्तुरे यांनी अशा भावस्पर्शी आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्यांचे अंत:करण भरून आले.
राम कस्तुरे हे मूळचे नांदेडचे. पण १९८५ मध्ये डोंबिवलीत वास्तव्याला आले. सुलेखनकार म्हणून आज त्यांची ओळख आहे. कस्तुरे यांच्यावर वाजपेयींच्या कवितांचा विशेष प्रभाव होता. त्यांच्या कवितांमधला गर्भीत अर्थ सुलेखनाच्या माध्यमातून यथार्थपणे प्रगट करावा, अशी तळमळ कस्तुरे यांना होती. या भावनेने त्यांनी अटलजींच्या निवडक ३५ कविता घेऊन त्याला सुलेखन कलाकृतीचा साज चढविला. उँचाई, आओ मन की गाँठे खोले, जीवन बीत चला, मौत से ठन गई, अमर आग है, बुँद, आओ फिरसे दिया जलाये यांचा यात समावेश होता. या कवितांमधून वाजपेयी यांचे सकारात्मक, निसर्गावर प्रेम करणारे, स्वातंत्र्यसेनानींच्या प्रती आदरभाव असलेले व्यक्तीमत्त्व समोर उभे राहते. या कवितांचा संग्रह करण्यात कस्तुरे यांना डोंबिवलीचे पहिले नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांची मोलाची साथ लाभली.
२६ फेब्रुवारी २००६ ला कस्तुरे यांची वाजपेयींशी प्रत्यक्ष भेट झाली. संस्कार भारतीच्या माध्यमातून ही भेट घडली. त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि उद्योगपती बिमल केडीया यांचे कस्तुरे यांना सहकार्य लाभले. यावेळी तीन तास त्यांनी वाजपेयींबरोबर संवाद साधला. या कलाकृतीत वेदमंत्रांचाही समावेश होता. ते पाहून वाजपेयी भारावले. ‘मंै बहोत खुश हू, कविताओं को अक्षररूप एक कलाकार दे सकता हे ये मैंने कभी सोचा नहीं था, इस लुप्त होती कला को जीवित रख, उसे नये आयाम देकर आप कला-जगत की सराहनीय सेवा कर रहे है,’ अशा शब्दांत त्यांनी कस्तुरे यांचे कौतुक करीत त्यांना प्रशस्तीपत्रक दिले.
कस्तुरे यांनी सुलेखन केलेल्या आठ कविता वाजपेयी यांनी स्वत:च्या संग्रहित ठेवल्या. यानंतर या ३५ कवितांचा संग्रह ‘चुनी हुअी कविताएँ’ या पुस्तकरूपात शब्दबद्ध झाला. तत्कालीन उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. या पुस्तकाची एक प्रत तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनाही पाठवली, तेव्हा त्यांनी त्यांच्या उर्दू कवितांनाही सुलेखनाचा साज चढवावा, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे कस्तुरे म्हणाले.

प्रदर्शनातून वाहणार श्रद्धांजली
अटलजींना भेटल्यानंतर माझी कॅलिओग्राफी अधिक फुलली, असे कस्तुरे सांगतात. कस्तुरे यांनी सुलेखन केलेल्या ३५ कवितांचे प्रदर्शन डोंबिवलीत २५ डिसेंबरला अटलजींच्या वाढदिवशी बालभवनमध्ये भरवण्यात आले होते.

या प्रदर्शनासाठी तत्कालीन उपमहापौर राहुल दामले, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला होता. आताही सुलेखन प्रदर्शनाद्वारे अटलजींना श्रद्धांजली वाहण्याची इच्छा असल्याचे कस्तुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Memories of Vajpayee news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.