मेळघाटातील इको-फ्रेण्डली राख्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:04 AM2018-08-20T04:04:06+5:302018-08-20T04:04:37+5:30

बांबू, बिया आणि रेशीम यांचा वापर करून पूर्णपणे इको-फ्रेण्डली राख्या नूतन ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत.

Eco-Friendly Numbers in Melghat | मेळघाटातील इको-फ्रेण्डली राख्या बाजारात

मेळघाटातील इको-फ्रेण्डली राख्या बाजारात

Next

- जान्हवी मोर्ये

कल्याण : बांबू, बिया आणि रेशीम यांचा वापर करून पूर्णपणे इको-फ्रेण्डली राख्या नूतन ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. वापर केल्यानंतर हीच राखी कुंडीत टाकली, तर त्यामध्ये वापरलेल्या बिया रुजतील आणि निसर्गाचे देणे निसर्गालाच परत मिळेल, असे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
बांबू केंद्र लवादा मेळघाट आणि नूतन ज्ञानमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक राख्या बनवण्याची सृष्टीबंध कार्यशाळा शाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे राख्या बनवल्या. तृप्ती गोडसे आणि रूपाली हर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. मुलांनी आपल्या सुप्तगुणांचा वापर करून वैविध्यपूर्ण राख्या तयार केल्या. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमधील गुणांना विकासाची संधी देणारी एक पर्वणीच ठरली. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे यांनी केले. शिक्षकांनीही राख्या बनवण्याचा आनंद घेतला.
सध्या बाजारात उपलब्ध राख्यांमधील ८० ते ९० टक्के राख्या या चीनमधून आलेल्या आहेत. या राख्या आपण खरेदी करतो. त्याऐवजी आपल्या आदिवासीबांधवांनी तयार केलेल्या राख्या विकत घेतल्या, तर त्यांना दोन पैसे मिळतील. त्यांची प्रगती साधली जाईल, या उद्देशाने नूतन ज्ञानमंदिर विद्यालयाने हे पाऊल उचलले आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक राख्यांचा प्रचार आणि प्रसार करावा, हाच यामागील उद्देश आहे.
या राख्यांमध्ये काचेचे मणी, वनस्पतीच्या बिया, बांबू आणि रेशीम या घटकांचा वापर केला आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या राख्यांमध्ये चिनी मणी किंवा कोणत्याही कृत्रिम वस्तूंचा वापर केला नाही.

नागरिकांनी जपावी सामाजिक बांधीलकी
मेळघाटातील लवादा गावातील आदिवासी या राख्या तयार करतात. हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. मेळघाट आणि कुपोषण यांचे नाते सर्वश्रुत आहे. या आदिवासीबांधवांकडे उपजत कलागुण आहेत. त्यांची एक कला, कल्पना आणि भावविश्व आहे.
आदिवासी बांधवांनी त्यांची कला हजारो वर्षांपासून जपली आहे. योग्य संधीअभावी त्याचे रूपांतर व्यावसायिकतेत झालेले नाही. सुनील आणि निरुपमा देशपांडे यांनी आदिवासी बांधवांच्या या कलेला बाजारपेठ उपलब्ध करून दिली.
आदिवासींना त्यांच्या कामाचा मोबदला मिळावा व कुपोषणाची समस्या समूळ नष्ट व्हावी, हा त्यांचा प्रयत्न आहे. नागरिकांनी या कार्यास सामाजिक बांधीलकी म्हणून हातभार लावणे गरजेचे आहे, असे आवाहन शाळेने केले आहे.

Web Title: Eco-Friendly Numbers in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.