योग्य उपचारांअभावी डोंबिवलीत मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 01:34 AM2019-04-14T01:34:33+5:302019-04-14T01:34:37+5:30

सर्पदंश झालेल्या सहा वर्षांच्या मुलीला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात अतिदक्षता विभाग बंद असल्याने अन्य रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले.

Dombivilita's death due to the right treatment | योग्य उपचारांअभावी डोंबिवलीत मुलीचा मृत्यू

योग्य उपचारांअभावी डोंबिवलीत मुलीचा मृत्यू

googlenewsNext

डोंबिवली : सर्पदंश झालेल्या सहा वर्षांच्या मुलीला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात अतिदक्षता विभाग बंद असल्याने अन्य रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे तिला वेळेत उपचार न मिळाल्याने शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत मुलीच्या नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर शनिवारी ठिय्या आंदोलन केले. मुलीच्या मृत्यूस जबाबदार धरून या रुग्णालयातील डॉक्टर आणि पालिका आयुक्तांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.
स्वरा प्रमोद वाघमारे (रा. डोंबिवली पश्चिम) या मुलीला शुक्रवारी सर्पदंश झाला होता. तिचे वडील रिक्षाचालक आहेत. उपचारासाठी तिला शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात तातडीने उपचार आवश्यक होते. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर आणि अपुरे कर्मचारी बळ यामुळे हा विभागाच मृत्युशय्येवर असल्याने स्वरावर प्राथमिक उपचार करून तिला कळवा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यास सांगितले. त्यानंतर, नातेवाइकांनी तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारांदरम्यान शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्वराच्या नातेवाइकांनी शास्त्रीनगर रुग्णालयात शनिवारी सकाळी धाव घेऊ न स्वराच्या मृत्यूस शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. स्वराच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर व आयुक्तांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
>डॉक्टरांनी वाचला असुविधांचा पाढा
शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर सावकारे म्हणाले की, स्वराला रुग्णालयात दाखल केल्यावर तिच्यावर अत्यावश्यक उपचार सुरू केले. तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला अतिदक्षता विभागात ठेवणे आवश्यक होते. अतिदक्षता विभाग रुग्णालयात आहे; मात्र तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने हा विभाग बंद आहे. त्यामुळे स्वराला पुढील उपचारांसाठी कळवा रुग्णालयात नेण्यास सांगितले. आमची काही चूक नाही. रुग्णालयास १०८ नंबरची रुग्णवाहिका देण्यात आली होती. ती काढून घेण्यात आली आहे. फोन केल्यावर ही रुग्णवाहिका रुग्णास अन्य रुग्णालयात तातडीने नेते. रुग्णालयात आधीच कर्मचारी कमी आहेत. त्यातले काही कर्मचारी निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले आहेत, असेही डॉ. चंद्रशेखर सावकारे यांनी सांगितले.

Web Title: Dombivilita's death due to the right treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.