मारहाणीची तक्रार करणाऱ्यावरच खुनी हल्ला: आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 08:48 PM2018-11-28T20:48:02+5:302018-11-28T20:56:16+5:30

मारहाण करणा-याने राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरुन त्याला कशेळी खाडी पूलावरुन खाली फेकून त्याच्या खूनाचा प्रयत्न करणा-या शब्बीर शेख याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली आहे.

Accused of half murder arrested by Thane crime branch | मारहाणीची तक्रार करणाऱ्यावरच खुनी हल्ला: आरोपीस अटक

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईकशेळी खाडी पूलावरुन फेकले खालीजीव बचावल्यानंतर केली होती तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आपल्याला झालेल्या मारहाणीची तक्रार करणा-या गोविंद चितळगिरी (२६) यालाच जबर मारहाण करुन कशेळी ब्रिजवरुन फेकून खूनाचा प्रयत्न करणा-या शब्बीर शेख याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने नुकतीच अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या गोकूळनगर भागात राहणारे चितळगिरी आणि शब्बीर तसेच इतर चौघेजण यांच्यामध्ये २९ सप्टेंबर २०१८ रोजी वादावादी झाली होती. यातूनच शेख आणि त्याच्या साथीदारांनी चितळगिरी याला मारहाण केली होती. या मारहाणीबाबत चितळगिरी याने शेख आणि त्याच्या चार साथीदारांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्ध तक्रार दिली म्हणून चितळगिरीविरुद्ध शेखचा राग होता. २ नोव्हेंबर २०१८ रोजी चितळगिरी हा सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास येऊर येथे मित्रांसमवेत ताडी पित असतांना त्याला शेख आणि त्याच्या साथीदारांनी रिक्षात कोंबून कशेळी ब्रिजवर नेले. तिथे त्याला जबर मारहाण करुन ब्रिजवरुन खाडीमध्ये खाली फेकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातूनही कसाबसा जीव वाचल्यानंतर चितळगिरी याने याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.
हा गुन्हा दाखल झाल्यापासून मात्र शब्बीर शेख हा पोलिसांना हुलकावणी देत होता. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही त्याच्या मागावर होते. शेख कळवा नाका येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक विक्रांत कांबळे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे उपायुक्त दिपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे,नाईक विक्रांत कांबळे, रिझवान सय्यद आणि पठाण आदींच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी त्याला कळवा नाका येथील बस थांब्याजवळून अटक केली.

Web Title: Accused of half murder arrested by Thane crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.