गुजरातने मुंबईला गुंडाळले

 • First Published :11-January-2017 : 01:38:31

 • इंदूर : युवा सलामीवीर पृथ्वी शॉच्या आकर्षक अर्धशतकी खेळीनंतरही ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाचा डाव २२८ धावांत संपुष्टात आला. मंगळवारपासून प्रारंभ झालेल्या रणजी ट्रॉफी अंतिम लढतीत गुजरातच्या अचूक माऱ्यापुढे मुंबईचा डाव पहिल्याच दिवशी गडगडला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी प्रत्युत्तरात खेळताना गुजरातने बिनबाद २ धावा केल्या होत्या.

  गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जसप्रित बुमराहच्या अनुपस्थितीनंतरही गुजरातच्या अन्य वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सत्रात मुंबईच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मुंबई संघातील केवळ पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली.

  उपांत्य फेरीत पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी करणारा १७ वर्षीय पृथ्वी शॉने धावबाद होण्यापूर्वी ७१ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव (५७) यानेही अर्धशतक झळकावले. दरम्यान, यादवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या. या दोघांव्यतिरिक्त अष्टपैलू अभिषेक नायर (३५), सिद्धेश लाड (२३) व श्रेयस अय्यर (१४) दुहेरी धावसंख्या नोंदवण्यात यशस्वी ठरले.

  गुजरात संघातर्फे अनुभवी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग, मध्यमगती गोलंदाज चिंतन गजा व आॅफ स्पिनर रुजुल भट यांनी अनुक्रमे ४८, ४६ व ५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. रुस कलारिया व हार्दिक पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

  मुंबई संघालाही सुरुवातीलाच यश मिळाले असते पण गुजरातच्या डावातील पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये समित गोहलचा (नाबाद २) सोपा झेल पृथ्वी शॉ याला टिपण्यात अपयश आले. आजचा खेळ थांबला तेव्हा गोहल व प्रियांक पांचाल (०) खेळपट्टीवर होते.

  त्याआधी, आर. पी. सिंगने दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अखिल हेरवाडकरला (४) झटपट माघारी परतवत गुजरातल पहिले यश मिळवून दिले. पृथ्वीने मात्र संयमी फलंदाजी करीत एक बाजू सांभाळली. गजाने अय्यरला माघारी परतवत गुजरातला दुसरे यश मिळवून दिले. पृथ्वीने ५६ चेंडूंना सामोरे जाताना अर्धशतक पूर्ण केले आणि सूर्यकुमारच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. पृथ्वीने हार्दिक पटेलच्या गोलंदाजीवर षटकार वसूल केला, पण पुढच्याच चेंडूवर तो धावबाद झाला. पृथ्वीने ९३ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार लगावले. (वृत्तसंस्था)

  कर्णधार आदित्य तारेला (४) मोठी खेळी करण्यात अपयश आले. सूर्यकुमार वैयक्तिक ३५ धावांवर असताना सुदैवी ठरला. त्याचा लाभ घेत त्याने अर्धशतक साकारले. गजाच्या गोलंदाजीवर पुलचा फटका मारण्याचा प्रयत्नात तो बाद झाला. आर. पी. सिंगने लाडला तंबूचा मार्ग दाखवला. नायरला दुसऱ्या टोकाकडून योग्य साथ लाभली नाही. नायर बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला.

  धावफलक

  मुंबई पहिला डाव : पृथ्वी शॉ धावबाद ७१, अखिल हेरवाडकर पायचित गो. सिंग ०४, श्रेयस अय्यर झे. पटेल गो. गाजा १४, सूर्यकुमार यादव झे.एच.पी. पटेल गो. गाजा ५७, आदित्य तारे झे. भट्ट गो. एच.पी.पटेल ०४, सिद्धेश लाड झे. पार्थिव पटेल गो. सिंग २३, अभिषेक नायर झे. पार्थिव पटेल गो. कलारिया ३५, बी.एस. संधू झे. मेराई गो. भट्ट ०६, एस.एन. ठाकूर झे. मेराई गो. भट्ट ००, व्ही.व्ही. दाभोळकर धावबाद ०३, व्ही.के.डी. गोहिल नाबाद ००. अवांतर (११). एकूण ८३.५ षटकांत सर्वबाद २२८. बाद क्रम : १-१३, २-५४, ३-१०६, ४-१२८, ५-१६९, ६-१७९, ७-२०२, ८-२०४, ९-२०७, १०-२२८. गोलंदाजी : आर. पी. सिंग २१-६-४८-२, कलारिया २०.५-५-६६-१, सी. गजा १६-६-४६-२, एच. पटेल २१-४-५४-१, भट्ट ५-१-५-२.

  गुजरात प. डाव : एस.बी. गोहेल खेळत आहे ०२, पी.के. पांचाल खेळत आहे ००. एकूण १ षटकात बिनबाद २. गोलंदाजी : ठाकूर १-०-२-०.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS