दुकानातले पुतळे तुम्हाला छळताहेत!

 • First Published :17-May-2017 : 15:42:02

 •  मॉलमधले, दुकानातले देखणे पुतळे, त्यांच्या अंगावरचे भारीतले कपडे पाहून तुम्हाला असं वाटतं का..आपली फिगर काही खास नाही,आपण ढब्बे आहोत, जाडे आहोत, बारकुडे, लुकडेसुकडे आहोत. तर मग वेळीच सावध व्हा!

  - माधुरी पेठकर
  कपड्यांच्या दुकानातले देखणे कपडे घातलेले पुतळे पाहून तुम्हाला काय वाटतं?
  काय वाटणार? फार तर फार त्या पुतळ्यांच्या अंगावर आहेत तसे कपडे आपणही घ्यावेत असं वाटतं. 
  पण यापेक्षाही अधिक काही वाटत असेल तर?
   
   
  विश्वास नाही बसत, पण अनेकांना तसं वाटतं. वाटू शकतं. उंच, स्लीमट्रीम फिगर असलेल्या पुतळ्यांकडे पाहून अनेक तरुण मुलांना विशेषत: तरुणींना आपल्या फिगरची लाज वाटू लागते. पुतळ्यांच्या अंगावर दिसणारे कपडे आपण घालायचे तर आपली फिगरही तशीच असायला हवी असं वाटू लागतं. नुसती तशी इच्छाच नाही, तर मग तसे प्रयत्नही त्या करायला लागतात.
  वरकरणी सोपं आणि साधं वाटतं हे पण कालांतरानं त्यातून बॉडी इमेजची समस्या निर्माण होते. आपल्या फिगरविषयी, आपल्या शरीराच्या ठेवणीविषयी संकोच आणि लाज वाटायला लागते. आपल्या या शारीरिक अस्तित्वाविषयी कमालीचं असमाधान वाटू लागतं.
   
   
  कपड्यांच्या दुकानातले स्त्री- पुरुषांचे पुतळे विशेषत: स्त्रियांचे पुतळे हे अतिशय बारीक चणीचे असतात. यावर जगभरातून आजवर बरीच टीकाही झाली. आता मात्र हा विषय परत एकदा चर्चेला आला आहे. त्याचं कारण म्हणजे अमेरिकेतल्या ‘जर्नल आॅफ इटिंग डिसआॅर्डर’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक अभ्यास. हा अभ्यास सांगतो की, कपड्यांच्या दुकानातल्या पुतळ्यांमुळे तरुण-तरुणींमध्ये ‘इटिंग डिसआॅर्डर’ नावाचा मानसिक आजार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या पुतळ्यांच्या फिगरच्या मापांचा खरंच काही विचार होणार आहे की नाही? या पुतळ्यांमुळे तरुण-तरुणींमध्ये अतिबारीक होण्याचं वेड भिनतं आहे. तरुण-तरुणींवरचा हा अतिबारीकपणाचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्यांच्याभोवतीचं वातावरण प्रयत्नपूर्वक बदलावं लागेल. आणि ते बदलायचं म्हटलं तर आधी कपड्यांच्या दुकानातल्या त्या अतिबारीक पुतळ्यांचीही तब्येत जरा सुधारायला हवी.
   
   
  हा अभ्यास असं स्पष्ट सांगतो की, अतिबारीक पुतळ्यांकडे पाहून विकृत शरीरप्रतिमेची अर्थात नकारात्मक शरीरप्रतिमेची समस्या (सेल्फ इमेज प्रॉब्लेम) निर्माण होते. ही समस्या निर्माण झालेल्यांना आपण कोणत्याच अ‍ॅँगलमधून छान दिसत नाही. आहे तसं स्वीकारण्याची ताकद कमी होते. आणि आजूबाजूचं सर्व काही विसरून, स्वत:च्या आयुष्यातले प्राधान्यक्रम मागे सारून फक्त स्लीम-ट्रीम फिगरच्या मागे पळणं सुरू होतं. प्रयत्न करून कितीही बारीक झाले तरी या लोकांना आपण जाड झाल्यासारखंच वाटतं. नकारात्मक शरीरप्रतिमेचा हा मानसिक आजार इतर मानसिक आजारांनाही सोबत घेऊन चालतो. 
  त्यातलाच एक म्हणजे इटिंग डिसआॅर्डर. हा इटिंग डिसआॅर्डर वर वर साधा वाटणारा मानसिक आजार आहे. पण नीट लक्ष दिलं नाही, वेळीच उपचार केले नाही तर बळावतो आणि यामुळे रुग्ण दगावतोही.
   
   
  या अभ्यासात पाहणी केलेल्या तरुण-तरुणींपैकी १५ टक्के मुलांमध्ये पुतळे, सेल्फ इमेज आणि इटिंग डिसआॅर्डर ही चेन सापडली. म्हणूनच हा अभ्यास असं सुचवतो की, कपड्यांच्या दुकानातले ते आकर्षक फिगरमधले पुतळे एकतर समाजानं पुढाकार घेऊन बदलावेत, ते बदलत नसतील तर तरुण-तरुणींनी पुतळ्यांकडे बघण्याची आपली नजर बदलावी. पुतळ्यांची ती आकर्षक फिगर ही खोटी आणि फसवी आहे. त्यांच्याकडे पाहावं आणि विसरून जावं. आपण जसे आहोत तसं आपल्याला स्वीकारावं. अन्यथा हे निर्जीव पुतळे तरुण जगण्याचा रस, तारुण्यावस्थेतील ऊर्जा, स्वत:वर प्रेम करण्याची ताकद हे सर्व काढून घेतील. 
  इटिंग डिसआॅर्डर म्हणजे काय?
   
  इटिंग डिसआॅर्डर ही समस्या अनेक कारणांनी निर्माण होते. मात्र हा काही एकाएकी निर्माण होणारा आजार नाही. नकारात्मक शरीरप्रतिमा जशी हळूहळू रुग्णाच्या मनाचा ताबा घेते तशीच इटिंग डिसआॅर्डरची समस्या वाढते. या समस्येची लक्षणे दिसतात आणि ओळखताही येतात.
   
  १. इटिंग डिसआॅर्डर असलेली व्यक्ती अतिशय बारीक दिसते. तरीही वजन आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते.
   
  २. जेवण न करता डाएट पिल्स घेतल्या जातात.
   
  ३. खायचं नाही किंवा खाल्लं तरी नावापुरतंच इतकं कमी खायचं.
   
  ४. अति व्यायाम करणं.
   
  ५. सतत आपण खात असलेलं अन्न आणि त्यातून मिळणाऱ्या कॅलरीजची गोळाबेरीज करत राहणं.
   
  ६. काही विशिष्ट पदार्थच थोडे थोडे खात राहणं.
   
  ७. जेवायला बसलं की जेवण न करता उगाच ताट फिरवत राहणं.
   
  ८. नवीन नवीन पाककृती शिकणं, घरातल्यांसाठी त्या बनवणं, पण स्वत: मात्र अजिबात न खाणं.
   
  ९. इतर कोणासमोर कधीच काही न खाणं.
   
  १०. सतत वजन आणि खाणं पिणं याबद्दल बोलत राहणं.
   
  ११. मित्रमैत्रिणींमध्ये न मिसळणं, त्यांना टाळणं.
   
  बॉडी इमेजचा घोळ होतो
  म्हणजे काय?
  एका वाक्यात सांगायचं तर, आपलं शरीर जसं आहे तसं अजिबातच न आवडणं. स्वत:चा तिरस्कार करणं, कमी लेखणं आणि राग राग करणं. ही समस्या असलेले सतत स्वत:ची तुलना आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा मॉडेल, नटनट्या आणि अगदी दुकानातले पुतळे यांच्याशी करत राहतात. 
  आपल्यात हा प्रॉब्लेम आहे का हे कसं ओळखायचं तर स्वत:ला दोन प्रश्न विचारायचे. १. टीव्ही-सिनेमे पाहून किंंवा इतरांनी सांगितल्यामुळेच मला माझ्या शरीराचा आहे तो आकार आवडत नाही का? २. मी येताजाता स्वत:वर, स्वत:च्या दिसण्यावर टीकाच करत राहतो का?
  या दोन प्रश्नांची उत्तरे जर होकारार्थी आली तर आपलाही बॉडी इमेजचा घोळ आहे असं समजावं. 
  (माधुरी लोकमतच्या पुरवणी विभागात सहायक उपसंपादक आहे.madhuripethkar29@gmail.com )


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS