तुम्ही काय वाचता?

 • First Published :17-May-2017 : 15:28:40

 • निर्माण आणि आॅक्सिजन

  उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब... या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
   
  गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
  म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
  त्यातला हा पाचवा प्रश्न : तुम्ही काय वाचता? वाचनाचा उपयोग काय? 
   
  काय वाचतोय सध्या?
  असा प्रश्न विचारता का तुम्ही कधी कुणाला? किंवा तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला?
  आजकाल मित्र - मैत्रीणी भेटल्यावर आपण विचारत असतो की, ‘काय ? कसं काय चाललंय ? कशी आहेस?’ कुठलाही संवाद सुरु करायला हे शब्द कामी पडतात. पण एकदा माझ्या मित्राने मला खूप दिवसांनी फोन केला आणि विचारले ‘काय ? कसा आहेस ? काय वाचतोय सध्या ?’ मला खूप छान वाटलं त्या प्रश्नानं ! खरंच किती सुरेख संकल्पना आहे ना ही कुठ्ल्याही संवादाची सुरूवात करायची ? दैनंदिन गोष्टींबद्दल तर आपण बऱ्याच वेळा विविध लोकांशी बोलत असतो पण पुस्तकांविषयी आपल्या मोजक्याच मित्र - मैत्रिणींशी बोलत असतो. 
  वाचनप्रेमी लोकांचा हा परिघ आता हळुहळू रुंदावत आहे ! फक्त वाचनापासून सुरु झालेला प्रवास आता मनाला भिडणाऱ्या वाचनापर्यंत आला आहे. माझ्या मते तेच वाचन चांगलं जे तुमचा वास्तवाशी संबंध घडवून आणतं. पिढ्यान - पिढ्या चालत आलेल्या चुकीच्या गोष्टींचे जोखड काही क्षणांत दूर करतं, माणसं दूर लोटायला नव्हे तर ती माणसं जवळ करायला , त्यांना समजावून घ्यायला मदत करतं! 
  लहानपणी वडिलांनी हाती दिलेल्या तानाजी एकोंडेंच्यां ‘उगवत्या सूर्याचा देश जपान ’हे पुस्तक वाचताना सुरु झालेला वाचन प्रवास आज मला आयन रँडच्या ‘फाऊंटन हेड’ या पुस्तकापर्यन्त घेऊन आलेला आहे. काल्पनिक विश्वाला गवसणी घालणारी पुस्तकंसुद्धा मी वाचली आहेत पण मला वाचनाचे आंतरिक समाधान फक्त वैचारिक पातळीवर खरं उतरणाऱ्या पुस्तकांकडूनच मिळालं ! जी पुस्तकं वाचून मला प्रश्न पडतात ती पुस्तकं मला काही तरी गुपित देऊन जातात. आणि मग सुरु वात होते त्या गुपितांची उकल शोधण्याच्या प्रवासाची ! 
  वाचनाने मला भिन्न-अंगी विचार करायला आणि अनुभवायला शिकवलं. यात मोलाची भर पडली ती ‘निर्माण’च्या सोप्या- सुटसुटीत विचारांनी. ‘ निर्माण’मुळेच पुस्तकांसोबतचा हा प्रवास एकदम सोपा झाला, निर्भेळ झाला ! वाचन आणखी प्रगल्भ कसे असावे याची ओळख ‘निर्माण’ शिबिरांमध्ये झाली. मला आठवतोय ‘पूर्वीचा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा मी आणि मला आठवतोय आताचा मी. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांनी विज्ञानाशी ओळख झालेला. आजमितीला मी आस्तिक आहे आणि भक्त तो फक्त विज्ञानाचा, सामाजिक भावनेचा, कलेचा आणि निसर्गाचा! या सर्वांचा सुयोग्य मेळ मला माझ्या वाचनात सापडला आहे. 
  पुस्तकं- वाचन हे अवघड गोष्टींना सोपं करून टाकतं . दैनंदिन आयुष्यात मोठी वाटणारी किती तरी आव्हानं आपण वाचनानं सहज पार करू शकतो. मग यात ‘तोत्तोचान’सारखी रचनावादी शिक्षणाला गवसणी घालणारं पुस्तक असो किंवा ‘अ‍ॅनिमल फार्म’ मधील मानवी स्वभावांचे सर्व बाजूंनी केलेलं चित्रण असो. अशी असंख्य उदाहरणं आपल्या समोर मांडता येतील. अजूनही हा वाचन प्रवास चालू आहे! नव-नवीन विषयांना अजूनही वाचायचे बाकी आहे . हा प्रवास अखंड चालू राहतो..हॅप्पी रीडिंग मित्रहो !!!
  पंकज सरोदे, निर्माण ५
   
  वाचन बदललं, तसं आपणही बदलतो!
  आज वाचतोय ते उद्या आवडेलच असं नाही,
  दुसरं काही आवडेल, पण एक गोष्ट कायम आवडते ती म्हणजे वाचन.
  मला वाटतं चांगलं वाचन हेच आहे किंवा तेच आहे हे सांगणं अवघड आहे. कारण वाचन ही खूप पर्सनल आणि रिलेटिव्ह गोष्ट वाटते मला. मला जे चांगलं वाटतं ते तुम्हाला वाटेलंच असं नाही. मी जेव्हा वाचायला सुरवात केली तेव्हा जे हाती पडेल ते वाचून काढायचो त्यात कुठलंच सिलेक्शन आणि क्रायटेरिया नव्हता. मला ते इतक आकर्षित करायचं की मी रात्र रात्र जागुन ते वाचून काढायचो, आख्या रात्री संपलेल्या मला कळल्या नाहीत. ते मला मी खऱ्या अर्थाने जगलेले दिवस वाटतात, त्या लेखकाचे अनुभव, त्या व्यक्तिचं जगणं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. ते वाचन, ते अनुभवणं, ते जगणं एक पॅशन होती. पण नंतर आपण सिलेक्टिव होत जातो, आपल्यालाच कळायला लागतं हे चांगलं आहे आणि हे नाहीये. या गोष्टी अनुभवायच्याच आहेत. त्या कोणी सांगू शकत नाही. हा अनुभव स्वत:च घ्यायला हवा. आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण आपल्या भावविश्वाच्या बाहेर येऊन विचार करतो. तोपर्यंत आपल्याला माहीतच नसतं की हे जग असंही आहे. आपण खूप प्रभावित होतो, आपण तसाही विचार करून पाहतो, थोड्याच काळासाठी का होईना आपण ते जगणं जगून घेतो. माझं वाचन तर कथा-लघुकथा ते कादंबऱ्या ते पॉलिटिकल आणि एडिटोरीअलपर्यंत कधी आलं मला देखील कळल नाही. आधी खूप साहित्यिक आणि काव्यत्मक आवडायचं. आता ते बिलकुल वाचलं नाही जात. आपल्याबरोबर आपलं वाचन पण खूप बदलत जातं. 
  आपल्यातला बदल पाहणं खूप विलक्षण असतं. कोणी काय चांगलंय हे सांगू नाही शकत पण तो हा अनुभव घ्यावा हे मात्र जरूर सांगू शकतो. वपु आणि जी.ए पासून झालेला हा प्रवास आता रामचंद्र गुहा, अमर्त्य सेन, जॉर्ज ओरवेलपर्यन्त आलाय. आता टिपिकल फेमस पुस्तकांपेक्षा ग्रामीण बाजाची, स्वानुभवाची, खडतर परिश्रमाची आणि व्यवस्थेविरु द्धच्या बंडखोरीची, दाबला गेलेल्या आवाजाची, नवीन आॅप्शन देणाऱ्या सिस्टीमवर लिहलेली पुस्तक आवडू लागलीत. अजून पुढे काय आवडेल किंवा परत हे सगळंही जुनाट आणि टिपिकल वाटू लागेल किंवा काय ते माहिती नाही. पण एक नक्की, आयुष्यभर असंच वाचत राहायचंय. प्रत्येक वेळेस एक नवीन मी भेटण्यासाठी...
  - वैभव बागल निर्माण ७
   
  स्वत:पलिकडचं दाखवणारा रस्ता
  वाचून काय मिळतं यापेक्षा काय दिसतं ते पहा.
  ‘वाचाल तर वाचाल’ हे बाबासाहेबांनी म्हटलेलं वाक्य खरंच किती अर्थपूर्ण आहे. चांगलं वाचन म्हणजे नक्की काय याची प्रत्येकाची वेगळी व्याख्या असते. माझ्या मते चांगले वाचन ते जे विचार करायला लावतं, आनंद देतं, वास्तवाची जाणीव करून देतं, आयुष्याची दिशा देतं, निर्णय घेण्यास मदत करतं. उदा. मी उदास असेन, अशा वेळी मी जर अनिल अवचटांचे ‘माणसं’ हे पुस्तकं वाचलं तर मी विचार करते की मी माझ्या थोड्याफार दु:खाना कवटाळून बसले आहे. पण समाजातला कितीतरी मोठ्या वर्गाचं आयुष्य हेच असंख्य अडचणी, दु:खांचं बनलेलं आहे. मग मी माझं वलय मोडून त्यापलीकडे विचार करते. मला एखादी गोष्ट अगदी मनापासून करायची असते पण कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही. अशातच कुठल्यातरी पुस्तकात किंवा वर्तमानपत्रात त्याच प्रकारचं काम करत असलेल्या अनुभवी व्यक्तीचा प्रवास वाचतो आणि आपल्याला अगदी १०० टक्के मार्ग नाही सापडला तरी निदान त्या दिशेनं वाटचाल सुरु होण्यास नक्कीच मदत होते.
  मी एखाद्या पठडीतलंच वाचन न करता समोर जे येईल ते वाचून पाहते. त्यात अगदी वृत्तपत्र, मासिकापासून कथा, कादंबरी, आत्मचरित्र, वास्तवदर्शी असे अनेक प्रकार येऊ शकतात. शेवटी कोणत्याही प्रकारच वाचन केलं तरी ते नक्कीच फुकट जात नाही हे खरं.
  निसर्ग वाचणं हे देखील एक उत्तम प्रकारचं वाचनच आहे असं मला वाटतं आणि आवडत देखील. आपण मुद्दाम सुट्टी काढून निसर्गरम्य ठिकाणी जातो हे चांगलंच पण रोजच्या जीवनात आपल्याला निसर्गाने कितीतरी गोष्टी वाचायला काढून ठेवलेल्याच असतात. पिंपळाच्या झाडांना नुकतीच फुटलेली पालवी असो, बहरलेली बोगनवेल किंवा बहावा, गुलमोहर असो, पहिल्याच पावसानंतर फुटलेला अंकुर असो, मुंग्यांची शिस्तीत चाललेली रांग असो, डोंगरांच्या तटस्थ रंग असोत, समुद्राच्या लाटा असोत या सर्व गोष्टी आपल्याला काय सुचवू इच्छितात? निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत, कृतीत एक संदेश असतोच, फक्त आपल्याला तो वाचता आला पाहिजे.
  नमिता भावे, निर्माण ७
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS