कायमचा कार्यकारी अभियंता द्या हो

  • First Published :17-February-2017 : 00:13:08

  • रविंद्र साळवे / मोखाडा

    विक्रमगड मधील खुडेद येथील मंगल कार्यालय चोरीला गेल्याचे प्रकरण व ठकरबाप्पा योजनेत १०० कोटींचा झालेला भ्रष्टचार लोकमतने उघडकीस आणल्यानंतर त्या प्रकरणी जव्हारचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे यांच्यावर गुन्हा दाखल होताच ते कार्यालयात फिरकलेले नाहीत. प्रभारी म्हणून नियुक्त असलेले वसईकर हे कार्यकारी अभियंता मोठ्या मिन्नतवारीने शुक्रवारी कार्यालयात अल्पकाळ आले.

    पालवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने ते सात ते आठ महिने कार्यालयाकडे फिरकलेले नाहीत. या कालावधीत जव्हार येथील कार्यकारी अभियंत्याचे पद भरण्यात आलेले नाही भ्रष्टचाराचे कुरण अशी ओळख असलेल्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाला कार्यकारी अभियंता कसा मिळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो काय? मग आम्ही तुम्हाला कार्यकारी अभियंताच देत नाही. त्याद्वारे तुमची विकासात्मक कोंडी करून तुम्हाला धडा शिकवतो. असा तर पवित्रा सार्वजनिक बांधकामने घेतलेला नाही ना. असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

    जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा आदी तालुक्यात विकास कामांच्या नावाखाली करोडोचा उलाढाल केली जाते. या तालुक्यांसाठी हे कार्यकारी अभियंता पद महत्वाचे आहे. कारण या पदा शिवाय काहीही घडू शकत नाही.

    परंतु अजून पर्यत कायम स्वरूपी कार्यकारी अभियंता नियुक्त झालेला नाही त्यात मार्च एंडिग आला आहे. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे. एकीकडे नवीन कामे निघत नाहीत, निघालेल्या कामांची निविदा निघत नाही. झालेल्या कामांची बिले निघत नाहीत आणि दुसरीकडे असलेला निधी परत जातो आहे अशी स्थिती यामुळे निर्माण झाली आहे. तात्पुरता अधिकारी या पदाला न्याय देऊ शकत नसल्याने ठेकेदारांंची गोची झाली आहे.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma