तहान

 • First Published :14-March-2017 : 09:14:31

 • - वैद्य विनय वेलणकर

  अनेक गोष्टी घडत असताना त्याकडे आपलं लक्ष नसतं. परंतु त्याची तीव्रता वाढली की परिणामकारकता जाणवते. जसे रोज प्रत्येक क्षणाला श्वास चालू असतो तोपर्यंत कळत नाही. परंतु तो घेण्यास अडचण निर्माण झाली किंवा त्याची गती वाढली की मग त्याचं महत्त्व लक्षात येतं. तसंच तहान लागण्याचं आहे. दिवसभरात आपण तहान लागल्यावर पाणी पीत असतो. परंतु त्याचं प्रमाण वाढल्यावर लक्षात येतं की सारखी तहान लागते आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे.

  साधारणत: प्रत्येक व्यक्ती दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी पितो. ऋतूनुसार यामध्ये फरक पडतो. थंडीमध्ये अन् पावसाळ्यात पाणी पिण्याचं प्रमाण कमी असतं, तर उन्हाळ्यात याचं प्रमाण अधिक असतं. हे निसर्गाचे संकेत आपण पाळले पाहिजेत. 

  दिवसाला चार लिटर पाणी प्यायला हवं असं आजकाल अनेक तज्ज्ञ सांगतात. पण हे सांगणं निसर्गाला धरून आणि आरोग्याला हितकर नाही. आयुर्वेदानं ‘स्वस्थोऽपि आमश: पीवेत्।’ असा संकेत दिला आहे. म्हणजे निरोगी माणसानंसुद्धा मर्यादित पाणी प्यावं. आणि याचं प्रमाण व्यक्तिसापेक्ष, प्रकृतिसापेक्ष, ऋतुसापेक्ष अन् देशकालपरत्वे बदलतं. म्हणूनच तहान जास्त लागल्यास आयुर्वेदानं त्याचा स्वतंत्र व्याधी म्हणून उल्लेख केला आहे. अति पाणी प्यायल्यानं अग्निमांद्य म्हणजेच भूक न लागणं, अजीर्ण, आम्लनिर्मिती, अपचन, अंगावर सूज येणं, श्वास लागणं यासारख्या व्याधी उत्पन्न होतात.

  सध्या किडनीच्या विकाराचे रोगी मोठ्या प्रमाणात दिसतात. आता तज्ज्ञांनी किडनी विकारात मर्यादित पाणी प्या असं सांगण्यास सुरुवात केली आहे. एक लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नका असं ते सांगतात. आपण लक्षात घ्यायला हवं की अति पाणी पिणं हेच किडनी विकाराचं सूत्र आहे. 

  वरचेवर पाणी पीत राहूनही समाधान होत नाही, पुन्हा पुन्हा पाणी पिण्यांची इच्छा होत राहते अशा व्याधीला तृष्णा (तहान लागणं) असं म्हणतात. याचे विविध प्रकार आयुर्वेदानं वर्णन केले आहेत.

  तृष्णेची कारणं आणि लक्षणं

  अति श्रम करणं, भीती वाटणं, शोक, अति राग येणं, अति उपवास करणं, अति मद्यपान, क्षारयुक्त पदार्थांचं अति प्रमाणात सेवन करणं, अतिशय तिखट, आंबट, खारट आणि रुक्ष असे पदार्थ खाणं, पचनास जड पदार्थ अति प्रमाणात खाणं, उलट्या आणि जुलाब अति प्रमाणात होणंं, शरीरातील अन्य धातूंचा क्षय होणं या सर्व कारणांमुळे तृष्णा ही व्याधी उत्पन्न होते. 

  या व्याधीमध्ये ओठ, कंठ, टाळू याठिकाणी कोरडेपणा येतो. शोष पडतो. क्वचित टोचल्यासारखं जाणवतं. अन्न नकोसं वाटतं. आवाज ओढल्यासारखा होतो. पाणी पिऊनही समाधान होत नाही. कंठ, जीभ या अवयवांना खरबरीतपणा येतो. अंग गळून गेल्यासारखं होतं. क्वचित डोळ्यापुढे अंधारी येते. चक्कर येते. क्वचित तापही येतो.

  अन्य व्याधींचा परिणाम म्हणूनही तृष्णा ही व्याधी उत्पन्न होते. जसे ज्वर असणं, श्वासकास (खोकला येणं), अतिसार, ग्रहणी, क्षय होणं, प्रवाहिका यासारख्या व्याधींचा परिणाम म्हणूनसुद्धा तृष्णा ही व्याधी होते. अती रक्तस्त्राव झाला तरीही तहान अति प्रमाणात लागते. 

  तहान तहान होत असेल तर..

  तृष्णा ही व्याधी उत्पन्न झाल्यास अति थंड पाणी प्यायलं जातं. पण अति थंड पाणी प्यायलावर खरंतर तृष्णेत वाढच होण्याची शक्यता असते. कारण यामध्ये वात आणि पित्त यांची दुष्टी असते. मध+पाणी एकत्र प्यायल्यास तहान कमी होते. मधपाणी पिऊन उलटी केल्यास पित्त बाहेर पडून गेल्यामुळे लवकर आराम वाटतो.

  डाळिंबाचे दाणे चघळून खावेत किंवा त्याचा रस जिरे, सैंधव मीठ टाकून प्यावा त्यामुळे तहान कमी होते. काळ्या मातीचे वा नवीन कोरे खापर लाल होईपर्यंत तापवून विझवावं. असं पाच सहा वेळा करून कोमट झालेलं पाणी पिण्यास दिल्यानं तत्काळ तहान कमी होते. याचप्रमाणे सुवर्ण किंवा चांदी तापवून पाण्यात भिजवून दिल्यास तृष्णा कमी होते.

  द्राक्षं, डाळींब, आवळा, ज्येष्ठमध, पिंपळी, सुंठ, लिंबू यासारख्या फळांचे रस, सरबत प्यायला दिल्यास तहान कमी होते. आलं-लिंबाचं सरबत गरम पाण्यात करून प्यावं. 

  दह्यावरची निवळी त्यात सुंठ, जिरे, सैंधव मीठ टाकून पिण्यास द्यावी. 

  ताजं ताक जास्त पाणी टाकून पिण्यास द्यावं. 

  सुंठ, नागरमोथा यासारख्या औषधींचं चूर्ण टाकून पाणी गरम करून ते पिण्यास द्यावं. यामुळे तहान तत्काळ कमी होते. 

  द्राक्षासव, उशिरासव यासारखी औषधं द्यावीत. प्रवाळ भस्म, मौतिक भस्म, सूतशेखर, चंद्रयात यासारख्या प्रभावी औषधांचा उपचार तृष्णा व्याधीत उपयुक्त ठरतो.

  या विकारातील सर्वात प्रभावी औषध म्हणजे साळीच्या लाह्या. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला ज्या लाह्या वापरतात त्यास साळीच्या किंवा भाताच्या लाह्या म्हणतात. या लाह्या नुसत्या कोरड्या खाव्यात यामुळे तहान कमी होते. नाही तर पाणी उकळून त्यात लाह्या आणि साखर थोडी टाकून ते पाणी पिण्यास द्यावं आणि लाह्या खाण्यास द्याव्यात. दुधात किंवा ताकात लाह्या भिजवून दिल्यास उत्तम गुण येतो.

  या सर्व उपचारांनी आराम न वाटल्यास थंड पाण्यानं स्नान करण्यास सांगावं. शीत जलस्नान हा या व्याधीमधील प्रभावी उपचार आहे. आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा.

  vd.velankar@gmail.com (लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत.) महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS