पोलिसांचे हप्त्याचे रेटकार्ड

 • First Published :19-June-2017 : 02:43:02

 • लोकमत न्यूज नेटवर्क

  मुंबई : काळे धंदेवाल्यांशी काही पोलिसांचे असलेले आर्थिक लागेबांधे हे कायम चर्चेचा विषय असताना नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हप्त्याचे ‘रेटकार्ड’ चव्हाट्यावर आले आहे. या ठिकाणी अमली पदार्थ विक्री करणारे व अन्य दोन नंबरवाल्यांकडून रोज कोण कोठून व किती रक्कम घेतो, महिन्याला लाखोंची कमाई कशी होते, वरच्या अधिकाऱ्यापर्यंत कसे पैसे पोहोचविले जातात, याची नोंद असलेली एका पोलिसाच्या डायरीतील माहिती उघड झाली आहे.

  दक्षिण मुंबईतील मुस्लीमबहुल वस्ती असलेले नागपाडा पोलीस ठाणे हे एक महत्त्वपूर्ण पोलीस ठाणे आहे. या ठिकाणच्या हप्ताखोरीचा प्रकार उघड झाल्याने याबाबत चौकशी करून तातडीने संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

  नागपाडा पोलीस ठाण्यापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल सागरजवळील एका पानपट्टीच्या दुकानातून सर्व वसुली केली जाते. गांजा, नशेची गोळी, गुटखा याची तस्करी करणाऱ्यांकडून रोज ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतची वसुली करण्यात येते. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५०० पानपट्टीची दुकाने असून त्यापैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी हे अंमली पदार्थ विकले जात असल्याचे डायरीत नमूद आहे. त्याचबरोबर मदनपुरा परिसरातील एका हॉटेलात गोमांस उपलब्ध होत असून पोलीस या हॉटेलवाल्याकडून नियमितपणे हप्ता घेतात. त्याचप्रमाणे ब्युटी पार्लर, बिल्डरांकडूनही वसुली घेतली जाते. कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, रमेश साळुंखे हे वसुली करीत असल्याचे डायरीत नमूद केले आहे. त्यामध्ये काही कोडवर्डही आहेत, तर काही ठिकाणी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोबाइल क्रमांक लिहिलेला आहे.

  केव्हा होते वसुली?

  रोज पोलिसांची सकाळची शिफ्ट संपल्यानंतर पोलीस साध्या वेशात जाऊन संबंधितांकडून वसुली करतात. पैसे वसूल करण्याची जवळपास १०० ठिकाणे आहेत. तेथे हप्ता घेण्यासाठी डीबी, मिल्क स्पेशल, गुंडा पथकातील अधिकारी, अंमलदार यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे हद्दीत अनधिकृत झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. त्या ठिकाणी अमली पदार्थाची राजरोसपणे विक्री करण्यात येत आहे. मात्र पोलीस त्याकडे कानाडोळा करतात. चरस, एमडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

  हप्त्याच्या रेटकार्डबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बस्वत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘अशी काही वसुली होते, हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे त्याबाबत काही सांगू शकत नाही,’ असे सांगितले.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS