दुष्काळ पाण्याचा का नियोजनाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:18 PM2019-01-18T15:18:05+5:302019-01-18T15:18:32+5:30

जानेवारी महिना उजाडला की नेमिची येतो उन्हाळा याप्रमाणे आमच्याकडे पाण्याची भीषणता जाणवायला लागते. विहिरीच्या घशाला कोरड पडते. बोअर उचक्या ...

Why planning for drought? | दुष्काळ पाण्याचा का नियोजनाचा ?

दुष्काळ पाण्याचा का नियोजनाचा ?

Next

जानेवारी महिना उजाडला की नेमिची येतो उन्हाळा याप्रमाणे आमच्याकडे पाण्याची भीषणता जाणवायला लागते. विहिरीच्या घशाला कोरड पडते. बोअर उचक्या द्यायला लागतात. पाणीपुरवठा करणारे बंधारे,तलाव,पाणवठे अक्षरश: शुष्क होतात. मग शासन, प्रशासनाकडून नियोजन सुरू होते. सामान्य नागरिक आता चार-दोन आठवडे पुरेल इतकाच पाणीपुरवठा धरणात शिल्लक अशी बातमी वाचल्यानंतर आता पाणी चार दिवसातून एकदा येणार याची जाणीव होताच खडबडून जागा होतो. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आपण सारे अनुभवत आहोत. मागे तीन-चार वर्षांपूर्वी रेल्वेने पाणी आणून लातूरकरांची तहान भागवलेलीही आपण पाहिली. खरंतर या गोष्टीचं कौतुक करावं की शरम वाटून घ्यावी हाच खरा प्रश्न आहे.

कौतुक एवढ्यासाठी की केलेला प्रयत्न कमालीचा प्रामाणिक होता आणि शरम यासाठी की देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर काही ठोस उपाययोजना झाली नाही. वापराविषयी काही संहिता नाही. जलपुनर्भरण तितकंसं होत नाही. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेत नेमकं काय अडलं  आणि काय जिरलं ? ते कळलंच नाही. मोठमोठे जलाशय भरण्याइतकाही पाऊस होत नाही. सरासरी पाऊस बरा झाला असला तरी काही जिल्ह्यात अगदीच कमी पाऊस झाला आहे.

शहरात माणसं राहतात त्यांच्यासाठी तत्काळ योजना सर्व पातळीवर कामास लागते. पण ग्रामीण भागाचं विदारक वास्तव ही कोणी तेवढं जाणिवेनं जाणून घेताना दिसत नाही. टँकरमुक्त जिल्हा अशा बातम्याही येतात पण रोज हंडाभर पाण्यासाठी दूरवर जाणारी वृद्ध माणसं शाळा सोडून पाण्याच्या रांगेत थांबलेली आमची पोरं, गुराढोराचे हाल पाण्यासाठीची झोंबाझोंबी, मारामारी चेंगराचेंगरी सर्वांना इतकी सवयीची झाली की बातमी वाचून खरंच काही वाटत नाही. हे सत्य आहे.  शाळेत शिकतानाचा प्रश्न पडतो की पृथ्वीवर ७१% पाणी आहे मग दुष्काळ कसा पडतो? पिण्यायोग्य ३ % पाण्याचं किती टक्के नेमकं नियोजन केले जाते?

पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाºया नद्या महापुरात वाहून जाणारे पाणी यावर प्रशासन पातळीवर खरंच गांभीर्याने विचार करणं ही काळाची गरज बनलीय आणि पाण्याच्या वापरासंबंधीही आज चिंतन करावं लागेल. पाण्याचा वापर मुख्यत्वे शेती, कारखाने उद्योगधंदे,बहुतांशाने प्रत्येक उद्योगांना पाण्याची गरज असते. ऊसासारख्या पिकांना तसेच मोटार उद्योगात मोठ्या प्रमाणात पाणी लागते. दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या या प्रश्नावर आम्ही सारे सु (?) शिक्षित लोक कमालीचे बेफिकीर आहोत. 

केवळ शाळांच्या भिंतीवर ‘जल है तो कल है ’ असं लिहून चालणार नाही. तर शासनाने नद्याजोड प्रकल्प कार्यान्वित करण्याची गरज आहे. जलसंहिता बनवावी लागेल.जलसाक्षरता अभियान राबवावे लागेल पाण्याच्या थेंबा थेंबाचे मूल्य जाणून ते वाचवावे लागेल. कारण घशाला कोरड पडल्यावर नाण्यांचा खणखणाट ना सोन्याची झळाळी कामाला येणार नाही तर पाण्याचा एक घोट येईल. तेव्हा पाण्याच्या वापराबाबत दक्षता घेणे प्रत्येकाची गरज आहे. दुष्काळी परिस्थितीतही लोकं गाड्या वारंवार धुणे हे ही समजू शकतो आपण पण रस्त्यावर, झाडावर अतोनात पाणी मारतात त्यांनी क्षणभर विचार करावा. महात्मा गांधीजींनी शतकापूर्वी दाखवलेली अर्धा ग्लास पाण्याबाबतची संवेदनशीलता आज दाखवावीच लागेल.

चार दिवसांनी पाणी येणार म्हटलं की शिळे पाणी म्हणत भडाभडा सांडणाºयांना पाणी शिळं होत नसतं हे शिकवावे लागेल.  परत एकदा मी एकट्यानं विचार करून काय उपयोग ? असा विचार न करता मी एकटातरी करून पाहीनच असं म्हणावं लागेल. उन्हाळ्याचं नियोजन पावसाळ्यात करावं लागेल म्हणजे तहान लागल्यावर आड खोदण्याची वेळ येणार नाही. भूमातेच्या काळजाला पाण्यासाठी आणखी किती वेदना देणारी?  त्यापेक्षा ओंजळभर पाणी वाचवून तिची ओटी भरूया. ‘आज वाचवा उद्या वापरा’ हे नियोजन करावे लागेल. या साºया बाबींचा विचार केल्यास नक्की जाणवेल आणि आपणही विचार कराल की  खरंच दुष्काळ पाण्याचा की नियोजनाचा..?
-रवींद्र देशमुख,
(लेखक सृजनशील शिक्षक आणि अभ्यासक आहेत.)

Web Title: Why planning for drought?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.