ब्राम्हण समाजात भीतीचे वातावरण..संरक्षण द्याच!

By रवींद्र देशमुख | Published: March 11, 2024 05:58 PM2024-03-11T17:58:11+5:302024-03-11T17:59:41+5:30

अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा..सत्ताधारी आमदाराला निवेदन.

the atmosphere of fear in the brahmin society give protection people demand in solapur | ब्राम्हण समाजात भीतीचे वातावरण..संरक्षण द्याच!

ब्राम्हण समाजात भीतीचे वातावरण..संरक्षण द्याच!

रवींद्र देशमुख, सोलापूर: गेल्या वर्षभरापासून ब्राह्मण समाजावर सातत्याने टीका केली जात आहे समाजाची हेटाळणी केली जात आहे त्यामुळे ब्राह्मण समाजामध्ये अस्वस्थतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याला प्रतिबंध होण्यासाठी ब्राह्मण समाजाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यासाठी ब्राह्मण समाजाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी, विशेष विशेष बाब म्हणून ब्राह्मण समाजातील ज्या व्यक्ती शस्त्र परवान्याची मागणी करतील तातडीने देण्यात यावा  अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे या निवेदनात करण्यात आली आहे.

कुणाच्याही अध्यात- मध्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जात आहे. तसेच या समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जात आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  राज्यात सध्या समाजात दुहीचे विष पेरून असंतोष पसरवण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु ब्राह्मण समाज हा मुख्यतः बुद्धिजीवी आणि शांतता प्रिय समाज आहे. तमाम जनतेच्या हितासाठी ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींनी तन-मन-धनाने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उत्तम सेवा केली आहे आणि करतही आहे. 

तसेच या समाजातील कोणाही व्यक्तीने कोणत्याही समाजास कसल्याही प्रकारे नुकसान पोहोचविलेले नाही.  अशी वस्तुस्थिती असतानाही इतर समाजातील काही व्यक्ती व संघटना अल्पसंख्य असणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ब्राह्मण समाजास धमकावणी देत आहे. त्यामुळे लोक प्रतिनिधी या नात्याने ब्राह्मण समाजास संरक्षण मिळावे यासाठी कायद्यामध्ये तरतुदी कराव्यात असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देताना  बजरंग कुलकर्णी, विक्रम ढोनसळे, अमृता गोसावी, मीनाताई चाटी, संपदा जोशी, रामचंद्र तळवळकर, दत्तात्रय आराध्ये, सुहास देशपांडे,  वामन कुलकर्णी, मुकुंद मुळेगावकर, भरत काटीकर, संतोष पंतोजी यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या.

Web Title: the atmosphere of fear in the brahmin society give protection people demand in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.