मोहोळ येथे गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरसह तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 03:19 PM2019-03-05T15:19:13+5:302019-03-05T15:29:16+5:30

मोहोळ : गर्भलिंग निदान चाचणीला बंदी असतानाही गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा प्रकार मोहोळच्या पंढरपूर रोडवरील विहान हॉस्पिटलमध्ये सोमवारी उघडकीस ...

Police detained three doctors with a diagnosis of miscarriage in Mohol | मोहोळ येथे गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरसह तिघांना पोलीस कोठडी

मोहोळ येथे गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरसह तिघांना पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देरिक्षाचालकासह एका महिलेचा सहभाग; आधी सोलापूर, पंढरपुरात घेतले बोलावून, त्यानंतर फुटले बिंगविहान रुग्णालयातील सोनोग्राफीची मशीन व संबंधित सर्व रेकॉर्ड असा सुमारे पाच लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मोहोळ : गर्भलिंग निदान चाचणीला बंदी असतानाही गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा प्रकार मोहोळच्या पंढरपूर रोडवरील विहान हॉस्पिटलमध्ये सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी डॉ. सत्यजित म्हस्केसह मदत करणाºया दोघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात स्वत:च्या फायद्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करून  फसवणूक करीत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणातील तिघांना मोहोळ न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ येथे माया अष्टूळ गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे काम करत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विधी अधिकारी अ‍ॅड. राजेश्वरी माने यांच्यासह वैद्यकीय विभागातील एक पथक तयार करून एका डमी गर्भवती महिलेस सहभागी करून त्या महिलेमार्फत माया अष्टूळशी संपर्क साधला. त्यानुसार माया हिने दोन मार्च रोजी प्रथम संबंधित गर्भवती महिलेस सोलापूर येथे बोलावून घेऊन तिची चौकशी केली व सोलापूरमध्ये काम होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर ३ मार्च रोजी सकाळी पंढरपूर येथील बसस्थानकावर संबंधित गर्भवती महिलेला बोलावून घेतले.

पंढरपूर येथेही सोलापूर सारखीच परिस्थिती झाली असून, येथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्या महिलेसह माया मोहोळ येथे बसस्थानकावर सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आली. त्या ठिकाणी माया अष्टूळच्या संपर्कात असलेला रिक्षावाला आप्पा गणेश आदलिंगे यास रिक्षा घेऊन बोलावले. गर्भवती महिलेसह सर्वजण विहान हॉस्पिटल येथे आले. गर्भवती महिलेला तत्काळ गर्भलिंग निदान विभागात नेण्यात आले. त्यावेळी माया हिने सदर गर्भवती महिलेस या चाचणीसाठी १४ हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्यातील तेरा हजार रुपये हे डॉक्टरांना देण्यासाठी व एक हजार रुपये बक्षीस म्हणून मला द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार ठरलेल्या रकमेपैकी आठ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स घेण्यात आला. त्यापैकी दोन हजार रुपये डॉक्टर म्हस्के यांना देण्यात आले, तर सहा हजार रुपये माया हिने ठेवून घेतले. उर्वरित रक्कम रिपोर्ट देताना देण्याचे ठरले.

दरम्यान, म्हस्के यांनी संबंधित गर्भवती महिलेची लिंग निदान चाचणी करून कागदोपत्री रिपोर्ट न देता तोंडी पुरुष जातीचे अर्भक असल्याचे सांगितले. त्यावेळी बाहेर दबा धरून बसलेल्या वैद्यकीय पथकाने धाड टाकली. याबाबतची फिर्याद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पी. पी. गायकवाड यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. विहान हॉस्पिटलचे डॉक्टर सत्यजित म्हस्के यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्यांची साथीदार माया अष्टूळ व रिक्षाचालक आप्पा आदलिंगे यांच्या मदतीने शासनाने गर्भलिंग निदान करण्यास बंधन घातले असतानाही गर्भलिंग निदान चाचणीसाठी  १४ हजार रुपये ठरवून हे कृत्य केले व सरकारी काम करीत असताना आत्महत्या करण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. महिलेच्या पोटात पुरुष जातीचा गर्भ असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. सत्यजित म्हस्के, माया अष्टूळ व आप्पा आदलिंगे या तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर करत आहेत.

सोनोग्राफी मशीनसह मुद्देमाल सील

  • - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांच्या पथकाने विहान रुग्णालयातील सोनोग्राफीची मशीन व संबंधित सर्व रेकॉर्ड असा सुमारे पाच लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सील केला आहे. याबाबतची पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून  सांगण्यात आले.

डॉक्टरांनी दिली आत्महत्येची धमकी

  • - कारवाई झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर म्हस्के यांच्यासह संबंधित माया अष्टूळ हिने आम्ही आत्महत्या करू, येथे काहीच घडलेले नाही, असा कांगावा करत कारवाई पथकाला शासकीय काम करताना अडथळा निर्माण केला.

Web Title: Police detained three doctors with a diagnosis of miscarriage in Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.